स्टॅलिनचा स्वॅग दिसला कारण पेरियार,अण्णादुराई आणि करुणानिधींचा वारसा चालवायचा आहे
तामिळनाडूच्या विधानसभेत अभूतपूर्व राडा झाला. कारण तसं वेगळं नव्हतं. राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील वाद असा टिपिकल वाद. मात्र ज्याप्रकारे हे संपूर्ण प्रकरण घडलं त्याची चर्चा देशभर झाली.
राज्यपाल आर एन रवी सभागृहत भाषण करायला सुरुवात केली तेंव्हा त्यांनी त्यात सामाजिक न्यायाचा मुद्दा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख टाळला. त्यावर सत्ताधारी द्रमुक पक्ष आक्रमक झाला. राज्यपालांनी स्वामी विवेकानंद यांचा उल्लेख केल्यावर द्रमुक नेत्यांनी पेरियार आणि अण्णादुराई यांच्यानावाने घोषणा द्यायला सुरूवात केली. त्यामुळे चिढलेले राज्यपाल रागारागात सभागृहातून बाहेर पडले.
राज्यपाल जेव्हा वॉक आउट करत होते तेव्हा तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न न करता असल्याने आम्हाला काही फरक पडत नसल्याच्या अविर्भावात राज्यपालांकडे पाहत होते.
स्टॅलिन यांनी दाखवलेल्या या स्वॅगचा व्हिडिओला बॅकग्राउंड म्युझिक लावून अगदी साऊथच्या एखाद्या सुपरस्टारसारखे त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले. मात्र स्टॅलिन यांना सामाजिक न्यायाच्या मुद्यावर टफ स्टॅन्ड घेणं, पेरियार अण्णादुराई यांच्या उल्लेखासाठी आडून राहणं, कोणत्याही परिस्थितीत दिल्लीसमोर नं झुकणं या गोष्टी वारस्याने मिळाल्या आहेत.
आज जाणून घेउया तामिळनाडूतल्या द्रविडीयन राजकारणाचा वारसा जो आजही तितक्याच ताकदीने जपला आहे, कसं काय?
याची सुरवात होते पेरियार यांच्यापासून,
1879 मध्ये जन्मलेले इ व्ही रामस्वामी नाईकर म्हणजेच पेरियार यांना तामिळ लोकांचीआयडेंटिटी आणि स्वाभिमान पुम्हा मिळवून देण्याचे श्रेय दिले जाते. त्यांनीच सर्वप्रथम तमिळ लोकांसाठी द्रविडनाडूची म्हणजेच द्रविड मातृभूमीची कल्पना मांडली आणि त्यासाठी द्रविडर कळघम (डीके) हा राजकीय पक्ष सुरू केला.
त्याआधी पेरियार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांच्या जन्मगावी इरोड येथे काँग्रेस कार्यकर्ता म्हणून केली होती. काँग्रेसमध्ये असताना एक दिवस तिरुनेलवेलीजवळ चेरनमहादेवी येथील काँग्रेस नेते व्ही व्ही एस अय्यर यांच्या मालकीच्या शाळेत ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या जेवणाच्या प्रश्नावरून त्यांचे गांधींशी भांडण झाले. पालकांच्या विनंतीनुसार अय्यर यांनी ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था केली होती, ज्याला पेरियार यांनी विरोध केला.
मात्र गांधींनी एखाद्या व्यक्तीने दुस-यासोबत जेवण न करणे हे पाप असू शकत नाही. याउलट ते त्यांच्या श्रद्धेचा आदर करण्यासारखं आहे असा स्टॅन्ड घेतला.
काँग्रेसने घेतलेला हा स्टॅन्ड पटला नसल्यामुळे पेरियार यांनी 1925 मध्ये काँग्रेसमधून राजीनामा दिला आणि सामाजिक जीवनात ब्राह्मणांच्या वर्चस्वाला विरोध करणाऱ्या जस्टिस पार्टी आणि सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटमध्ये सहभागी झाले. 1924 च्या वैकोम सत्याग्रहादरम्यान पेरियारची ख्याती संपूर्ण दक्षिण भारतात पसरली. दलित समाजातील व्यक्तींना प्रसिद्ध वैकोम मंदिरात प्रवेश मिळावा या मागणीसाठी हे जनआंदोलन उभारण्यात आलं होतं.
1920 आणि 30 च्या दशकात,पेरियार यांनी सामाजिक आणि राजकीय सुधारणांवर एकत्र काम करण्यास सुरवात केली. पेरियार यांच्या मते तमिळ समाजव्यवस्था एक समतावादी आदर्श व्यवस्था होती जी जातिव्यवस्थेमुळे अपवित्र झाली.
तामिळनाडुतील जातिव्यस्थेचं मूळ शोधताना पेरियार सांगतात संस्कृत बोलणाऱ्या आणि उत्तर भारतातून आलेल्या आर्य ब्राह्मणांनी तमिळ प्रदेशात जात आणली. त्यामुळे त्यांनी ब्राह्मनाइज्ड हिंदू धर्माच्या विरोधातच आपला मोर्चा उघडला.
त्याचबरोबर 1930 च्या दशकात जेव्हा काँग्रेस सरकारांनी हिंदीची सक्ती करण्याची सुरवात केली तेव्हा हे द्रविडीयन प्रदेशांचे आर्यीकरण होत असल्याची टीका पेरियार यांनी केली. हा तमिळ आयडेंटिटी आणि स्वाभिमानावर हल्ला असल्याचं पेरियार यांचं म्हणणं होतं. त्यांच्या नेतृत्वाखाली द्रविडीयन चळवळ ही जातीविरोधातील संघर्ष आणि तमिळ राष्ट्रीय अस्मितेची प्रतिज्ञा बनली.
त्यामुळे पेरियार यांच्या नेतृत्वाखालीच द्रविडीयन चळवळ ही अँटी कास्ट, अँटी रिलिजन आणि अँटी हिंदी असे सर्व पदर असणारी एक तामिळ स्वाभिमानाची चळवळ म्हणून उभी राहिली. मात्र काही बाबतीत पेरियार यांची मतं हि अतिशय टोकाची होती.
पेरियार यांनी स्वतंत्र द्रविड देशासाठी सप्टेंबर 1945 मध्ये महान द्रविड विदुथलाई पडाई (प्रांतीय द्रविडियन लिबरेशन फोर्स) नावाची एक लढाऊ संघटना स्थापन केली आणि द्रविड कझगम त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना या संघटनेत सामील होण्याचे आवाहन केले.
त्याचबरोबर ऑगस्ट 1947 मध्ये देशाच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला स्वतंत्र द्रविडनाडू देण्यास ब्रिटिशांनी दिलेल्या नकारामुळे पेरियार यांनी स्वातंत्र्य दिन हा दु:खद आणि शोक दिवस म्हणून पाळण्याचे आवाहन केले. मात्र त्यांच्या ह्या टोकाच्या भूमिका आता त्यांच्याच कार्यकर्त्यांना पटत नव्हत्या. त्यामध्ये सर्वात पुढे होते पेरियार यांचे वैचारिक वारसदार म्हणून ओळखले जाऊ लागलेले अण्णादुराई.
पेरियार यांच्या या भूमिकांपासून काही प्रमाणात फारकत घेउन सी एन अण्णादुराई 1949 मध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) ची स्थापना केली. मास लीडर असलेले सी एन अण्णादुराई जनतेत अण्णा या टोपणनावे फेमस होते. त्यांनी स्वतंत्र भारतात लोकशाहीपद्धतीने होणाऱ्या निवडणुकांचे महत्व ओळखले होते.
त्यासाठी त्यांनी पेरियार यांच्या रॅडिकल भूमिकांना मवाळ स्वरूप देण्यास सुरवात केली. पेरियार यांच्या रॅडिकल भूमिकांपैकी एक भूमिका म्हणजे हिंदू देवतांच्या त्याग करण्यास सांगून त्यांची मूर्ती फोडण्याचे आंदोलन. मात्र अण्णादुराई यांनी या कट्टरतेला मवाळ करण्याचं धोरण स्वीकारलं. आर कन्नन अण्णा: द लाइफ अँड टाइम्स ऑफ सी एन अण्णादुराई या पुस्तकात अण्णादुराई सांगतात “मी गणेशमूर्ती फोडणार नाही पण त्याचबरोबर गणेश मूर्तीसमोर नारळ देखील फोडणार नाही”
स्वतंत्र तामिळ राष्ट्राच्या मागणीचे सुरवातीला अण्णांनी देखील समर्थन केले होते. १९६२ मध्ये राज्यसभेतील पहिल्याच भाषणात त्यांनी स्वतंत्र तामिळनाडूची मागणी केली होती. पण 1962 मधील चिनी आक्रमनामुळे त्यांना त्यांचे फुटीरतावादी विचार सोडले. भारत-चीन युद्धानंतर अन्नादुराई यांनी चेन्नईमधील मरीना बीचवर एका जाहीर सभेला संबोधित करताना म्हटले होते “जेव्हा देश धोक्यात असेल, तेव्हा आपण अलिप्ततावादाचा पुरस्कार करणे म्हणजे परकीयांना देशावर राज्य करण्यास आमंत्रित करण्यासारखे आहे”.
त्याचबरोबर पेरियार यांच्या अलिप्तवादाच्या भूमिकेला भविष्य नाही हे देखील त्यांच्या लक्षात आले होते. मात्र त्याचवेळी स्वतंत्र भारतात तामिळनाडू साठी जास्तीत जास्त स्वायत्तता मागून सामाजिक न्यायाच्या आणि तामिळ अस्मितेच्या मुद्यावर जास्तीत जास्त काम करण्याचे धोरण अण्णादुराई यांनी स्वीकारले.
अण्णादुराई यांच्या या प्रक्टिकल भूमिकेचा द्रमुकला मोठा राजकीय फायदा झाला आणि १९६७ मध्ये द्रमुक पहिल्यांदा तामिळनाडूमध्ये सत्तेत आली. अण्णादुराई यांनी मुख्यमंत्री म्हणून मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू केले. सामाजिक न्याय आणि बुद्धिप्रामाण्यवादाचे पुरस्कर्ते असणाऱ्या अण्णांनी सरकारी कार्यालयात धार्मिक चित्रे दाखवू नयेत असा आदेश दिला होता आणि ज्याची चर्चा देशभर झाली होती.
अण्णादुराई यांच्यानंतर त्यांचा वारसा आलं तो त्यांचे पट्टशिष्य असणाऱ्या एम करुणानिधी यांच्याकडे. सुपीक कावेरीखोऱ्यातील थिरुक्कुवलाई गावात 1924 मध्ये जन्मलेल्या करुणानिधींची सुरुवात सामान्यच होती. द्रविड चळवळीकडे आकर्षित होऊन ते १९३७-३९ च्या हिंदी विरोधी आंदोलनात विद्यार्थी म्हणून सामील झाले.
त्याचवेळी 1940 च्या दशकाच्या उत्तरार्धात द्रविड विचारवंतांनी चित्रपट जगतात प्रवेश केला आणि पटकथा लिहिण्यास सुरुवात केली. अण्णादुराई यांनी सिनेमा या माध्यमाचा उपयोग स्वतंत्र द्रविडियन चळवळीचा प्रसार मोठ्या प्रमाणात करून घेतला होता. करुणानिधी यांनी देखील तरुणपणी नाटकांची पटकथा लिहिली आणि त्यात अभिनय केला.
1943 पर्यंत त्यांनी हस्तलिखित जर्नल म्हणून मुरासोली सुरू केले, जे नंतरच्या काळात द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे मूकपत्र बनले. पुढे केवळ स्क्रिप्टच्या जोरावर करुणानिधी सुपरस्टार म्हणून पुढे आले. कलाइंगार म्हणजेच द आर्टिस्ट हे टायटल त्यांना देण्यात आलं.
त्यामुळे अण्णादुराई यांच्यानंतर त्यांचे वैचारिक वारसा म्हणून करुणानिधी पुढे आले आणि १९६९ मध्ये अण्णादुराई यांच्या मृत्यूनंतर वयाच्या ४४ व्य वर्षी करुणानिधी मुख्यमंत्री झाले.
मात्र पक्षावर पूर्ण कंट्रोल मिळवणं त्यांच्यासाठी सोप नव्हतं. म्ह्णूच या कमी त्यांनी इंदिरा गांधी यांची मदत घेत काँग्रेसशी युती केली.
डीएमकेची एका राष्ट्रीय पक्षाशी युती हा तामिळ राजकारणातला मेजर शिफ्ट होता. यामुळे द्रविडीयन चळवळीच्या भूमिका जाऊनच मवाळ झाल्या. मात्र तरीही स्वायत्तता, अँटी कास्ट आणि अँटी रिलिजन आणि अँटी हिंदीचा बाणा डीएमकेने सोडला नाही. सत्तेत आल्यानंतर करुणानिधींनी मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली. कोणतीही प्रशिक्षित व्यक्ती मग तो कोणत्याही जातीची असो हा मंदिराचा पुजारी होऊ शकतो असा कायदा केला.
मात्र पुढे कधीकाळी करुणानिधी यांच्या मागे भक्कमपणे उभे राहणाऱ्या सुपरस्टार एमजीआर यांनी आता करुणानिधी यांच्यापुढे आव्हान उभे केले. 1972 मध्ये एमजीआरने यांनी स्वत:चा पक्ष ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम किंवा AIADMK सुरू केला. मात्र यामुळे द्रविडीयन चळवळ कमजोर नं होता तामिळनाडूतील मेनस्ट्रीम चळवळ झाली कारण DMK आणि AIADMK हे दोनच पक्ष तामिळनाडूमध्ये प्रमुख ;पक्ष बनले ज्यांची कोअर आयडियॉलॉजी पेरियार आणि अण्णादुराई यांचे विचार होते. पुढे DMK आणि AIADMK च्या प्रमुखांनी राष्ट्रीय राजकारणात उतरण्यासाठी जरी काँग्रेस आणि भाजपशी सोयीस्कर युती केली असली काही मूळ तत्त्वांपासून दूर जाणं या पक्षांना परवडणारं नव्हतं.
त्याचं कारण म्हणजे द्रविडीयन चळवळीचा वारसा सोडण्यासारखं होतं.
या उलट या दोन पक्षांमध्ये कोण खरं द्रविडीयन चळवळीचा वारस आहे हे दाखवण्याची स्पर्धा निर्माण झाली.
करुणानिधींनी मागास जातीचे आरक्षण 25% वरून 31% वर वाढवले तर एमजीआर यांनी ते 50% नेले. याच्याही पुढे जाऊन जयललिता यांनी राज्यातील एकूण आरक्षण ६९% वर नेलं. जे देशात सर्वाधिक आहे. त्याचबरोबर श्रीलंकेतील तामिळ बंडखोरांना समर्थन देणं असू दे की आणीबाणीच्या काळात सरकारच्या विरोधात जाऊन आणीबाणी विरोधकांना आश्रय देणं. असा प्रत्येकवेळी तामिळनाडूने केंद्रापुढे झुकण्यास नकार दिल्याचं दिसतं.
मात्र पुढे करुणानिधी आणि जयललिता या दोन महत्वाच्या जाण्याने तमिळ राजकारणात द्रविडीयन चळवळीचा वारसा पुढे नेणाऱ्या नेत्याची पोकळी निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालं आणि या संधीचा पुरेपूर फायदा घेत आहेत एम के स्टॅलिन.
एम के स्टॅलिन यांचं राजकीय जीवन त्यांच्या वडिलांच्या छत्रछायेखाली गेलं. मात्र आज वयाच्या ६९ व्या वर्षी ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आहे आणि त्यानंतर त्यांनी अनेक मुद्यांवर केंद्रातील भाजपच्या विरोधात स्टॅन्ड घेतला आहे. यामध्ये NEET परीक्षेला विरोध, केंद्राच्या gst प्रणालीला विरोध, त्याचबरोबर हिंदीच्या सक्तीचं नावं जरी काढलं तरी आंदोलन या गोष्टींचा समावेश आहे.
त्यामुळे ९ तारखेला जेव्हा राज्यपाल आर एन रवी यांनी अलीकडेच तमिळनाडूचा उल्लेख तमिळगाम असा केला तेव्हा स्टॅलिन यांनी त्याला जोरदार विरोध केला. तमिळनाडू यातील ‘नाडू’ या तमीळ शब्दाचा अर्थ जमीन असा आहे. पण त्याच्या तमिळ देश असा वेगळा अर्थ काढला जातो. यातूनच राज्यपालांनी तमिळनाडू ऐवजी तमिळगाम असा राज्याचा उल्लेख केला होता.
त्याचबरबरोबर पेरियार आणि अण्णादुराई यांची नावं राज्यपालांनी घेतली नाहीत तेव्हा स्टॅलिन यांना विरोधासाठी उभं राहणं भागंच होतं कारण त्यांना वारसा चालवायचा होता तो पेरियार, अण्णादुराई आणि करुणानिधी यांचा…
हे ही वाच भिडू :
- पटोलेंचं म्हणणंय काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल पण कुणाच्या जोरावर ?
- ९० मुलींवर अत्याचार, १२० न्यूड व्हिडीओज… या जलेबी बाबाने जणू पॉर्न इंडस्ट्री उभारली होती!
- 2023 मध्ये विधानपरिषदेच्या २६ जागांवर खरा राजकीय आखाडा रंगणार…