टॅक्स रिफंड मधून IT कंपनी उभारणारे पुणेकर फॉर्ब्ज अब्जाधीश बनलेत
भारतातील आघाडीच्या आयटी कंपन्याची जर यादी पाहिली तर त्यात पुण्याच्या पर्सिस्टंट या कंपनीचा नक्की समावेश करता येईल. या कंपनीची स्थापना केली आनंद देशपांडे यांनी.
त्यांचा जन्म अकोल्याचा. वडील BHEL या सरकारी कंपनीत इंजिनियर म्हणून नोकरीला असल्यामुळे त्यांचे बालपण भोपाळ येथे गेले. वडिलांप्रमाणे एक मोठा इंजिनियर व्हायची जिद्द होती. शाळेत अभ्यास देखील जोमाने करायचे.
बारावी नंतर त्यांनी सगळ्या एंटरन्स एक्झाम पास केल्या.
त्यांची पुण्याच्या नॅशनल डिफेन्स अॅकडमी साठी निवड झाली. या सोबतच भोपाळ एनआयटीमध्ये देखील प्रवेश मिळत होता पण त्यांनी एडमिशन घेतलं आयआयटी खरगपूर येथे. एरोस्पेस इंजिनीयरिंगच्या झगमगत्या डिपार्टमेंटला त्यांना प्रवेश मिळाला.
जवळपास दोन वर्षात आनंद देशपांडे यांच्या लक्षात आले की आपली आवड विमान बनवण्यात नाही.त्यांनी मग थेट स्ट्रीम बदललं व कॉम्प्युटर इंजिनियरिंग घेतलं.
सत्तरच्या दशकाचा उत्तरार्ध सुरु होता. त्याकाळी कंप्युटर इंजिनियरिंगला काही विशेष किंमत नव्हती. एक तर भारतात कंप्युटरच अगदी थोडे होते, त्यात हे कंप्युटर माणसांचे रोजगार घालवतात या समाजवादी गैरसमजामुळे सरकारी जाचक बंधने या व्यवसायाला होती.
अगदी आयबीएम या जगातल्या सर्वात मोठ्या कंप्युटर कंपनीला जॉर्ज फर्नांडीस या उद्योगमंत्र्यांनी भारतातून पळवून लावलं होतं.
भारतात संधीची कमतरता असल्यामुळे आयआयटीमधून पास होणारे कंप्युटर इंजिनियर देशाबाहेर अमेरिकेला जाऊ लागले. यातच आनंद देशपांडे यांचा देखील समावेश होता. त्यांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेच्या इंडियाना विद्यापीठात प्रवेश घेतला.
१९८३-८४ साली त्यांना डेटाबेस या कन्सेप्टमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
इंडियाना विद्यापीठात मास्टर्स करत असतानाच ते पीएचडी साठी क्वालिफाय झाले. त्यांचा रिसर्च प्रोजेक्टसुध्दा रिलेशनल डेटाबेस हा होता. अवघी साडेचार वर्षात त्यांनी तो पूर्ण देखील केला.
अमेरिकेत कंप्युटर सायन्समध्ये पीएचडीधारक व्यक्ती म्हणजे पैसे छापायची मशीन समजली जाते. त्यांना कोणतीही दिग्गज कंपनी भरमसाठ पगारावर नोकरीला घेते. आनंद देशपांडे तर पीएचडी पूर्ण होण्याआधी एचपी सारख्या मोठ्या कंपनीत नोकरी करत होते. कंपनी त्यांच्यावर खुश होती, पगार वाढवणे, अमेरिकेत कायमच्या वास्तव्याचे ग्रीन कार्ड वगैरे ऑफर त्यांना देण्यात आले.
ग्रीन कार्डची ऑफर ऐकल्या ऐकल्या आनंद देशपांडे यांनी ठरवलं की बस झाल. आता हा हा सोन्याचा पिंजरा सोडून मायदेशी निघून यायचं.
ही घटना झाली तेव्हा आनंद देशपांडे यांचं नुकतच लग्न झाल होतं. त्यांची बायको ब्रिटीश एअरलाईन्समध्ये नोकरी करत होती. बक्कळ पगाराची नोकरी, गोड बायको, अमेरिकेचे नागरिकत्व आणखी काय हवं सुखी आयुष्यात?
सगळ जग ज्या अमेरिकन ग्रीन कार्ड साठी तरसत असते त्याला आनंद देशपांडे यांनी लाथ मारली. पण एकावेळी स्वर्गाच्या दारात असलेला हा माणूस नोकरी सोडल्याप्रमाणे रस्त्यावर आल्याप्रमाणे झाला.
भारतात जायचं झाल तर करायचं काय हा सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न त्यांच्या पुढे होता. दुसऱ्या कोणाच्या हाताखाली नोकरी करायची तयारी त्यांची नव्हती. स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा तर भांडवल नव्हत.
अशातच एक गंमतीशीर घटना घडली.
मगाशीच सांगितल्याप्रमाणे आनंद देशपांडे यांचं नुकतच लग्न झाल होतं. अमेरिकन कर व्यवस्थेत लग्न झालं असेल तर करसवलत असते. आनंद देशपांडे यांनी त्यावर्षीचा टॅक्स रेग्युलर भरला होता पण लग्न झाल्यामुळे त्यातला मोठा भाग करसवलत म्हणून परत मिळाला.
आनंद देशपांडे यांनी याच पैश्यामध्ये पुण्यात स्टार्टअप सुरु केला. त्यांच्या कंपनीचे नाव होते,
“पर्सिस्टंट सिस्टिम्स”
अगदी वालेटच्या कोपऱ्यात अनपेक्षित काही पैसे मिळाले तर खुश होणारे आपण टक्स रिटर्नमध्ये कंपनी सुरु करू असा कधी विचार केला असेल का? पण आनंद देशपांडे यांनी केला. लग्न त्यांच्यासाठी एकप्रकारे आयुष्य बदलणारी घटना ठरली.
पण भारतात वेगळीच आव्हाने वाट बघत होती.
राजीव गांधी हे पंतप्रधान झाल्यापासून देशातली कंप्युटर विषयक धोरणे बदलली होती मात्र त्यांचे सरकार पायउतार झाल्यावर पुन्हा या गतीस खीळ बसला होता. साधे टेलिफोन कनेक्शन घेण्यासाठी प्रचंड मोठी प्रोसिजर करावी लागत होती, इंटरनेट तर अजून स्वप्न असल्याप्रमाणे होतं.
मार्च १९९० साली भारत सरकारने सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क बनवण्याच्या धोरणाला हिरवा झेंडा दाखवला.एन.विठ्ठल हे अधिकारी या कल्पनेचे निर्माते होते. त्यांनी पुण्यात आयटीपार्कची घोषणा केली. या आयटीपार्कमध्ये चौदा कंपन्यासाठी जागा होती.
आनंद देशपांडे यांनी आपल्या पर्सिस्टंट साठी इथे जागा मिळवली. टॅक्स रिफंडचे २ लाख व मित्रांनी उसने दिलेले २ लाख अशा ४ लाखात एका छोट्याशा खोलीत पर्सिस्टंट सुरु झाली.
आज बघायला गेलं तर या कंपनीत दहा हजार इंजिनियर काम करतात. बारा देशांमध्ये त्यांची प्रोग्रॅमिंग, अभियांत्रिकी आणि विक्री केंद्रे आहेत. जगभरातील ग्राहकांना व्यवसायासाठी लागणारी सॉफ्टवेअर व इंटरनेटवर आधारित प्रणाली (‘डेटा, डिजिटल, आयओटी’) ते बनवतात.
पुण्यात हिंजवडीच्या आयटीपार्क मध्ये पर्सिस्टंट या कंपनीचा भला मोठा संकुल पाहायला मिळतो. आनंद देशपांडे यांनी यातल्या प्रत्येक इमारतीला मुद्दामहून चार वेदांची ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद , अथर्ववेद अशी खास भारतीय नावे दिली आहेत.
नुकताच आनंद देशपांडे यांचा फॉर्ब्जच्या अब्जाधीशांच्या यादीत समावेश झाला. हजारो कोटींची भरारी मारणारी ही कंपनी आजही आपली भारतीय मुल्ये घट्ट पकडून आहे म्हणून उत्तरोत्तर मोठी प्रगतीच करत चालली आहे हे नक्की.
हे ही वाच भिडू.
- एकेकाळची पुण्याची CA फर्म आज हजारो कोटी रुपयांची आयटी कंपनी बनलीय.
- ते पण बाहेरून आले आणि पुण्याचे लाडके झाले..
- दहावी नंतर शाळा सोडलेल्या मराठी मुलानं दोन हजार कोटींची आयटी कंपनी उभी केली.
- पुणेकरांनी नाद केला. लुनाला थेट डेक्कन क्वीन बरोबर रेससाठी उतरवलं!