निमित्त मराठा आरक्षणाचं, पण या भेटीमागून वेगळंच काही शिजतंय का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे मराठा आरक्षण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर हा प्रश्न केंद्राच्या अखत्यारीत येत असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळेचं ही भेट होतं आहे. सोबतचं राज्याचा जीएसटीचा वाटा, चक्रीवादळाची मदत, लसीकरण अशा विविध मुद्द्यांवर या भेटीमध्ये चर्चा झाली.

याच भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख म्हणून देखील मोदींना १० मिनिटं भेटीची वेळ मागितली होती. त्याप्रमाणे पंतप्रधानांनी वेळ दिली आणि हि भेट झाली देखील. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ते म्हणजे,

सत्तेत एकत्र नसलो याचा अर्थ नातं तुटलं असा होतं नाही. 

शिष्टमंडळासह भेट झाल्यानंतर दोघांनी देखील आपल्या पक्षांचे अधिकृत नेते म्हणून चर्चा केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या वक्तव्यामधून एक प्रकारे भाजपला आणि महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांना एक मेसेज देखील देण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यामुळेच या भेटीचे आता राज्यात विविध अंगांनी राजकीय अर्थ काढण्यास सुरुवात झाली आहे. यात अगदी शिवसेना – भाजप पुन्हा एकत्र येणार का? इथपासून ते शिवसेना राज्यात एकटी पडली आहे, सत्तेत सोबत असून देखील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसला क्रॉस करत आहे का? इथपर्यंत

आता या चर्चांना सुरुवात होण्याचा आधार कोणता हे देखील आपल्याला बघावं लागेल.

१. राष्ट्रवादी काँग्रेस – भाजपमधील वाढलेली जवळीक 

अ. पवार – फडणवीस भेट :

सगळ्यात मोठं कारण ते म्हणजे अलीकडेच झालेली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची झालेली भेट. वास्तविक ही भेट केवळ तब्येतीची विचारपूस करण्यासाठी होती असं फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्ट केलं होतं. पण ही भेट राजकीय देखील असल्याच्या शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या.

या भेटीबाबत जेष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी ‘बोल भिडू’शी बोलताना सांगितले होते की,

या भेटीनंतर लगेच समीकरण बदलतील अशी गोष्ट नाही. परंतु शरद पवार आणि फडणवीस यांच्यातील निवडणुकीच्या दरम्यान जे काही तणावाचे संबंध होते, ते बदलण्यासाठी जी साखरपेरणी लागते ती नक्कीच या भेटीने केली होती. सोबतचं जेव्हा समीकरण बदलण्याची वेळ येईल तेव्हा आपले व्यक्तिगत हेवेदावे आड येऊ नये याची तरतूद देखील या भेटीने केली आहे. 

ब. मराठा आरक्षणाचं नेतृत्व शरद पवारांकडे द्यावं :

मागच्या काही काळातही विरोधी पक्षातील नेत्यांची वक्तव्य बघितली तर यात एक गोष्ट प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे दिसून येते ते म्हणजे मराठा आरक्षणच नेतृत्व शरद पवार यांनी करावं. यात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, विनायक मेटे यांचा समावेश आपल्याला करता येईल.

त्यामुळेच राज्याचे प्रमुख उद्धव ठाकरे असताना देखील विरोधक शरद पवार यांच्याकडे या प्रश्नसंदर्भातुन आशा लावून आहेत. त्यातून एक प्रकारे उद्धव ठाकरे यांचं मराठा आरक्षण प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणून महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातं असल्याचं देखील सांगितलं जातं आहे.

क. अमित शहा – शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल भेट.

मार्च आणि एप्रिल हे २ महिने महाराष्ट्राचं राजकारण प्रचंड ढवळून निघालं. या काळात मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी टाकलेला लेटरबॉम्ब अशी अनेक प्रकरण घडली होती. यातून सरकार पडणार असल्याच्या देखील चर्चा सुरु झाल्या होत्या.

मात्र याच सगळ्या दरम्यान २८ मार्च २०२१ रोजी शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असल्याची बातमी ‘दिव्य भास्कर’ या गुजराती भाषिक वृत्तपत्राने दिली होती.

यानंतर राष्ट्रवादीकडून या भेटीचं खंडन करण्यात आलं होतं. मात्र तरी देखील महाराष्ट्र उलटं-सुलट चर्चा चालू होत्या. या सगळ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवरच ही भेट झाली असल्याचा दावा केला जातं होता.

२. मागच्या काही दिवसात राष्ट्रवादी – शिवसेनेमधील वाढलेली धुसफूस 

चर्चांना दुसरा मुख्य आधार म्हणजे एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप जवळ येतं असल्याचं दिसत असतानाचं दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोघांमध्ये धुसफूस वाढलेली बघायला मिळाली होती.

मागच्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये खटके उडत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. यात अजित पवार, जयंत पाटील यांनी काही निर्णयांवरून कॅबिनेटच्या बैठकीत उघड नाराजी व्यक्त केली असल्याच्या बातम्या आल्या होत्या, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीनंतर,

 “हे सरकार चालवणं ही एकट्या शिवसेनेची जबाबदारी नाही’ 

असं ठाकरेंनी पवारांना सांगितलं होतं.

३. ऑपरेशन लोटसची चर्चा :

या सगळ्या मुद्दयांमध्ये भाजपकडून शिवसेनेला टार्गेट केलं जातं असल्याचं बघायला मिळतं आहे. हे टार्गेट म्हणजे सरकार पाडण्याचं. मागच्या काही काळात भाजपकडून सातत्यानं राज्यात ऑपरेशन लोटसची चर्चा सुरु आहे.

विशेषतः पंढरपूर निवडणुकीच्या यशानंतर भाजपकडून योग्य वेळी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करू असं वारंवार सांगितलं जातं आहे. अलीकडेच तौकते चाकीवादळाच्या नुकसान पाहणी दौऱ्यावर असताना देखील फडणवीस यांच्याकडून या बद्दल पुनरोच्चार करण्यात आला.

ते महाविकास आघाडी सरकारला आणि पर्यायाने शिवसेनेला इशारा देताना म्हणाले होते, 

सध्या आमच लक्ष कोरोना स्थिती कशी आटोक्यात आणता येईल यावर आहे, मात्र योग्य वेळी आम्ही राज्य सरकारचा करेक्ट कार्यक्रम करू.

थोडक्यात राज्यात भाजपकडून सातत्यानं राष्ट्रवादीला जवळ करून शिवसेनेला इशारा दिला जातं आहे. सोबतचं राष्ट्रवादीकडून देखील शिवसेनेला क्रॉस केलं जातं असल्याचं बघायला मिळतं आहे.  

या सगळ्या मुद्द्यांमुळेचं उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या राजकीय भेटीला अर्थ प्राप्त होतो.

आता हे राजकीय अर्थ काय असू शकतात याबाबत ‘बोल भिडू’शी बोलताना जेष्ठ राजकीय विश्लेषक अशोक चौसाळकर यांनी सांगितलं की,

यातून एकमेव राजकीय अर्थ कोणता काढायचा असेल तर तो हाच कि, ‘मला अद्याप देखील हा पर्याय उपलब्ध आहे’, असाच मेसेज दोन्ही पक्षांना देण्याचा प्रयत्न आहे.

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर देखील असेच अर्थ काढले गेले. त्यावेळी पवारांनी ‘आम्हाला हा पर्याय उपलब्ध असल्याचा मेसेज दिला होता, तर आता तसाच काहीसा मेसेज ठाकरेंनी देण्याचा प्रयत्न केला आहे.

तर जेष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी ‘बोल भिडू’शी बोलताना एका वाक्यात या भेटीचा अर्थ सांगितला. ते वाक्य म्हणजे,

दिलं मिले ना मिले हाथ मिलाते राहिये…

थोडक्यात, पुढच्या काळात कधी एकत्र येऊ हे माहित नाही, किंवा कधी गरज पडेल हे सांगता येत नाही. पण तो पर्यंत हात तर मिळवत राहूया, म्हणजे दिलं मिळवताना अडचण येणार नाही, असेच या भेटीतून दिसून येत आहे.

याठिकाणी देशपांडे अजून एक उदाहरण देतात. ते म्हणजे,

घर सोडून आलेल्या मुलीला माहेर तुटलेलं असतं. त्यामुळे नवऱ्याने तिला कसंही वागवलं तरी चालेल, असं नसतं. असंच काहीस या भेटीचं देखील आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कसंही वागवलं तर चालणार नाही, मला अद्याप भाजपचा पर्याय तुटलेला नाही हेचं ठाकरे यांनी या भेटीतून सांगितलं आहे, असं देशपांडे म्हणतात.

आता या भेटीतून आणखी काही जर अर्थ काढायचे म्हंटले तर ते देखील काढता येतात.

यात उद्धव ठाकरे यांनी आपल्या वक्तव्यातून मोदी आणि त्यांच्या संबंधाबद्दल एक भावनिक मेसेज देखील दिला आहे. ते म्हणजे आमच्यातील अजूनही जुने लहान भाऊ-मोठा भाऊ हे संबंध तसेच आहेत. त्यामध्ये कुठेही बदल झालेला नाही, किंवा कटुता आलेली नाही.

सोबतचं दुसरा अर्थ म्हणजे मी राज्यातील भाजपच्या कोणाशी न बोलता थेट पंतप्रधानांशी म्हणजेचं पक्षाच्या सर्वोच्च नेत्याशी बोलतो. त्यामुळे तुम्ही राज्यात कितीही ऑपरेशन लोटसची चर्चा करा, मला कसलाही फरक पडणार नाही. किंवा त्याबाबत चिंता देखील करण्याची गरज नाही.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे देखील काहीशी अशीच शैली वापरायचे. ते देखील थेट अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, प्रमोद महाजन, सुषमा स्वराज या केंद्रीय नेत्यांशीचं चर्चा करायचे.

जाता जाता आणखी एक बातमी सांगायची म्हणजे पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीनंतर राज्यात भाजपनं देवेंद्र फडणवीस यांच्या घरी एक बैठक आयोजित केलेली आहे. त्यामुळे आता या बैठकीनंतर महाराष्ट्राचे राजकारण कोणते वळण घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.