ब्रिटिश राजदूताची मुंबईत मंत्रालयासमोर जेम्स बॉण्ड स्टाईलमध्ये हत्या झाली होती

२८ नोव्हेंबर १९८४, उच्छभ्रू ऑफिस असलेला दक्षिण मुंबईचा परिसर. सकाळी ८ वाजताची वेळ. हे धावत शहर उजाडलं होतं. नोकरदारांची कामाला जाण्यासाठी तुरळक गर्दी सुरू झाली होती.जवळच्या बागेचा रखवालदार निवांत पेपर वाचत बसला होता.

अचानक त्याच्या अगदी समोर एका मोठ्या आलिशान कारला दोघा ट्रॅक सूट मधल्या माणसांनी थांबवलं.

काही कळायच्या आत हातातल्या पिस्तुलमधून दोन गोळ्या त्या कार मध्ये झाडल्या आणि विजेच्या वेगाने पळून गेले. हे सगळं काही सेकंदात घडून गेलं होतं.

तो वॉचमन ओरडू लागला. गाडीचा ड्रायव्हर सेफ होता, त्याने देखील बाहेर येऊन आरडाओरडा सुरू केला.

काही क्षणात गर्दी जमली. गाडीमध्ये असलेल्या गोऱ्या व्यक्तीवर गोळीबार झाला होता. ती कोणी साधीसुधी व्यक्ती नव्हती.

ते होते ब्रिटिश उपउच्चायुक्त पर्सि नॉरिस.

मुंबई भारताची आर्थिक राजधानी असल्यामुळे अनेक देश दिल्लीबरोबरच मुंबईमध्ये देखील आपले राजदूत नेमतात. अनुभवी पर्सि नॉरिस यांची नुकतीच या पदावर नेमणूक झाली होती. ते फ्लोरा फाऊंटन इथल्या आपल्या ऑफिसकडे निघाले होते इतक्यात त्यांच्यावर हा हल्ला झाला.

नॉरिस यांना पटकन जवळच्या जेजे रुग्णालयात हलविण्यात आले पण त्यांचा केव्हाच मृत्यू झाला होता.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ जिथे बसून राज्याचा कारभार हाकतात अशा मंत्रालयापासून अगदी काहीच अंतरावर ही घटना घडली होती. तेव्हाचे मुख्य सचिव राम प्रधान आपल्या ऑफिसमध्ये येतच होते इतक्यात त्यांना मुंबईचे पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांचा फोन आला आणि त्यांनी ही घटना कळवली.

राम प्रधान यांना धक्का बसला. एका अतिउच्च दर्जाच्या राजदूताचा खून ही प्रचंड मोठी घटना होती. याचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटणार याचा त्यांना अंदाज होता.

हा संवेदनशील विषय असल्यामुळे त्यांनी स्वतः तातडीने ब्रिटिश उच्चायुक्तांच्या कार्यालयाकडे धाव घेतली. सोबत महाराष्ट्राचे प्रमुख राजशिष्टाचार अधिकारी पी.पी. महाना हे होते.

राम प्रधान यांनी ब्रिटिश एम्बसीच्या त्या वरिष्ठ अधिकाऱ्याना बोलतं करायचा प्रयत्न केला.

पण ते अधिकारी काही केल्या चकार शब्द काढत नव्हते,काही वेळातच पोलीस कमिशनर रिबेरो हे देखील तिथे हजर झाले. त्यांना देखील इंग्रज अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही.

अखेर ही महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांची सगळी टीम जेजे रुग्णालयात आली.

त्यांनी नॉरिस यांच्या मृतदेहाची तपासणी केली. त्यांच्या डाव्या कानशिलातुन घुसलेली गोळी सरळ दुसऱ्या बाजूने बाहेर पडलेली दिसत होती.

ही जखम पाहिल्यावर एका अतिउच्च दर्जाच्या सायलेन्सरच्या मदतीने नोरीस यांची विलक्षण व्यावसायिक पद्धतीने हत्या घडवून आणली आहे हे कळत होतं. राज्याचा मुख्य सचिव या नात्याने राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी राम प्रधान यांच्या कडे होती.

त्यांनी हत्येचा संपूर्ण अहवाल दिल्लीला पाठवला.

ब्रिटिश राजदूताचा मुंबईत खून कोण करू शकतो या विचाराने प्रधान यांची झोप उडाली. नुकताच भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती. एखादे वेळेस खलिस्तान वादी अतिरेक्यांचा देखील यात हात असू शकत होता.

अनेक शक्यता पडताळून पाहण्यात येत होत्या. आपल्या देशातील कोण गुन्हेगार यात सामील असू नये म्हणून राम प्रधान यांनी प्रार्थना केली होती.

घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शींच्या मते हल्लेखोर देखील गोरेच होते.

त्याच दिवशी संध्याकाळी एका मुस्लिम दहशतवादी संघटनेने या हत्येची जबाबदारी घेतली. दिल्लीला पाठवलेल्या अहवालाबद्दल राम प्रधान यांना परत काही विचारणा केली गेली नाही. त्यांना याचे आश्चर्य वाटले.

प्रधानांनी नॉरिस यांच्या हत्येबद्दल मुंबई पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली तेव्हा वेगळीच माहिती समोर आली.

पर्सि नॉरिस हे या पूर्वी पश्चिम आशियात एका मोठ्या खाजगी कंपनीसाठी काम करत होते. याच कंपनीचा त्यांच्या खुनात हात असू शकतो असं काहीजणांच म्हणणं होतं.

पण ज्या अर्थे या राजदूताच्या हत्येबद्दल ब्रिटिश दूतावासानेही मौन धारण केले होते, भारत सरकारने देखील मोठा हस्तक्षेप केला नव्हता यावरून या प्रकरणाला वेगळेच वळण असल्याचा वास राम प्रधानांना आला.

जागतिक मीडियामध्ये देखील नॉरिस हे स्वतःच छुपे हस्तक आहेत परिणामी इंग्लंडच्या हेरखात्याच्या आदेशानुसार त्यांची हत्या केली असा संशय व्यक्त केला.

अनेकदा हॉलिवूड सिनेमामध्ये जेम्स बॉण्ड 007 हे पात्र त्याच्यावरून बेतलेले आहे त्या MI5 च्या स्पायनी आपल्याच देशाच्या राजदूताचा भारतात खून केला होता आणि इंग्लंड सरकारने हे सगळं प्रकरण दाबून टाकलं होतं.

पुढे काहीच दिवसांनी इंग्लंडच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती मार्गारेट थॅचर हॉंगकॉंगला जाण्यापूर्वी मुंबई विमानतळावर काही तासासाठी थांबल्या होत्या.

तेव्हा मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी राम प्रधान यांना त्यांची भेट घेण्यासाठी पाठवले.

तेव्हा थॅचर यांनी राम प्रधान यांच्याशी बोलताना भारताचे नूतन पंतप्रधान राजीव गांधी यांना पदग्रहणाबद्दल शुभेच्छा दिल्या, भोपाळ वायू गळती प्रकरणासाठी खेद व्यक्त केला पण चुकूनही नोरीस यांच्या निधनाचा विषय काढला नाही.

राम प्रधान यांनी त्या घटनेचा उल्लेख केला तेव्हाही त्या शांतच बसल्या.

या भेटीनंतर राम प्रधान यांच्या शंकेला पुष्टी मिळाली की नॉरिस यांची मंत्रालयाजवळची हत्या ब्रिटिश गुप्तहेरांनीच केली होती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.