मुलीला वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार देण्याचं क्रेडिट दूसऱ्या बाजीरावांना जातं

शूर व मुत्सद्दी बाजीरावाच्या राजकीय चरित्राकडे इतिहासकारांनी दुर्लक्ष केले आहे. दुसऱ्या बाजीरावाची एकच बाजू रंगवून संगितली जाते. मात्र त्याची दुसरीही एक बाजू होती. आयुष्याच्या पूर्वार्धात त्याचे रियासतीकडे दुर्लक्ष झाले होते खरे..!
पण नंतरच्या काळात त्याने ही चूक सुधारण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
आपल्या स्वकीयांनी दगा दिल्यानंतर त्यांचा बिमोड करणारा, शत्रूच्या चाली ओळखून पुण्याच्या इतर भागात धडक मारणारा आणि इंग्रजांशी सरळसरळ लढा देण्याची हिंमत ठेवणारा बाजीराव अजूनही अपरिचित आहे.
स. १७७३ मध्ये नारायणराव पेशव्याचा खून झाल्यावर काही काळ रिक्त झालेल्या पेशवेपदी त्याचा चुलते रघुनाथराव पेशवे गादीवर आले. मात्र पुणे दरबारातील माणसे ज्यामध्ये सखाराम बापू,  हरिपंत फडके इत्यादी मुत्सद्दी माणसांनी त्याच्याविरुद्ध कारस्थान केले. आणि याला मोठा आधार होता तो चतुरस्त्र माणूस – नाना फडणीस यांचा.
या माणसांनी  आपसांत संगनमत करून कारभारी मंडळ सुरु केले. सगळ्यात आधी त्यांनी नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई व नंतर तिचा अल्पवयीन पुत्र सवाई माधवरावाच्या नावे सत्ता आपल्या हाती घेतली. नंतर साताऱ्याच्या छत्रपतींच्या मार्फत रघुनाथराव पेशव्याला पेशवाईवरून दूर करण्यात यश मिळवले.
पेशव्यांच्या इतिहासात यालाच ‘बारभाईंचे कारस्थान’ म्हणून ओळखले जाते.  त्यात बारा माणसे वगैरे नव्हती पण त्याचा उद्देश एकत्र येऊन तख्तापालट करणे हा होता. 
 
हरिपंत फडके यांनी गंगाबाईला पुण्याहून १७ जानेवारी १७७४ रोजी पुरदंरच्या किल्ल्यावर नेले.
त्यामुळे रघुनाथराव व बारभाई संघ असा उघड सामना सुरू झाला होता. १७७४ साली सवाई माधवरावाच्या नावे या सत्तेला सुरुवात झाली. केवळ यावरच न थांबता बारभाई कारभाऱ्यांनी नारायणराव पेशव्याच्या खुनाची चौकशी करून रघुनाथरावास त्या कटाचा प्रमुख सुत्रधार व गुन्हेगार म्हणून घोषित केले. त्याला पकडण्यासाठी फौजा रवाना केल्या.

पुणेकर कारभारी मंडळ व त्यांच्या पक्षपाती सरदारांच्या सैन्याचा ठिकठिकाणी मुकाबला करत व त्यांना झुकांडी देत रघुनाथराव पुणे परिसरात फिरत होता.

त्यांची बायको या काळात गरोदर होती. त्याची नाकेबंदी करण्यासाठी कारभाऱ्यांनी मराठी राज्याचा परंपरागत शत्रू निजामालाही आपल्या पक्षात ओढले. मागच्या काळात पेशव्यांनी ज्या म्हैसूरच्या हैदरअलीला हरवले होते त्याने या संघर्षात रघुनाथराव याची बाजू घेतली.
पण या मदतीचा फायदा होत नव्हता. मात्र कृष्णेच्या पुढे येण्याची त्याची हिंमत नसल्याने त्याच्या मदतीचा रघुनाथरावला काय उपयोग होणार होता हे दिसतच होते. मराठी राज्याचे शत्रू पुणे दरबारास मिळालेले, परंपरागत सरदार सर्व कारभाऱ्यांकडे सामील झालेले होते.
अशा स्थितीत आपल्या निवडक अनुयायांसह रघुनाथराव नाईलाजाने इंग्रजांच्या मदतीसाठी सुरतकडे गेला. ईस्ट इंडिया कंपनी या काळात नेमके मराठा सत्तेला खिंडार पाडायचे मार्ग शोधात होती.
यावेळी रघुनाथराव याच्यासोबत त्याचे सर्व कुटुंब होते. पत्नी आनंदीबाई, दत्तक पुत्र अमृतराव व काही ईतर लोकही होते. आनंदीबाई गरोदर असल्याने रघुनाथराव यांनी तिला माळव्यात धार येथे पवारांच्या जवळ ठेवले व उर्वरित कबिल्यासह त्याने सुरत गाठली. त्यामुळे मराठे आणि इंग्रज यांच्यात युद्धाला सुरूवात झाली.

इकडे धार येथे गर्भवती आनंदीबाई दि. १७ जानेवारी १७७५ रोजी प्रसूत होऊन तिला पुत्रप्राप्ती झाली व मुलाचे नाव ‘ बाजीराव ‘ असे ठेवण्यात आले.

मराठी राज्याच्या इतिहासात हा ‘ दुसरा बाजीराव ‘ म्हणून ओळखला जातो. अशा युध्याच्या धामधुमीच्या काळात त्याचा जन्म झाला होता. १७७५ ते १७८२ या काळात हे युद्ध सुरु होते. या युद्धाच्या काळात त्याचे वडील रघुनाथराव आणि आई आनंदीबाई दोघेही कैदेत होते. आपल्या जन्मापासूनच बाजीरावाचा नियतीशी संघर्ष सुरु झाला होता.

रघुनाथराव आणि सवाई माधवराव यांचा झगडा १७८२ च्या मे महिन्यात सालबाईच्या तहाने समाप्त झाला. रघुनाथरावास सालिना तीन लाख रु. देऊन त्याने कोपरगावी रहावे असे ठरले. तेथेच बाजीरावाचे सर्व जडणघडण झाली. पण त्याला इतक्या सक्तीने ताब्यात ठेवण्यात आले होते की त्यामुळे त्याच्या विचारांवर याचा खोल परिणाम झाला.

पराजित आईवडिलांच्यामुळे त्याच्या हालचालींवर बंधने होती. आनंदीबाई आणि रघुनाथ नजरकैदेत असताना जन्म झालेला हा एकमेव पेशवा. पुण्याचा ब्राह्मण आणि त्यातही पेशवा असणारा हा युवराज. पण १९ व्या वर्षीपर्यंत त्याच्या शिक्षणासाठी काहीच तरतूद केली गेली नव्हती. या गोष्टी मुद्दाम घडवून आणल्या गेल्या असेही म्हटले जाते.

लहान वयात दासी आणि कुणबिणी यांच्या सहवासात वाढल्याने त्याच्यावर वाईट संस्कार झाले अशी तक्रार त्याच्या आई आनंदीबाईने स्वतः आपल्या पात्रात केलेली आहे. सखारामबापू यांना पुण्यात पाठवलेल्या पात्रात त्यांनी लहानग्या बाजीरावावर होत असलेल्या या अन्यायाचा पाठपुरावा केला होता. “मूल शहाणे व्हावे असे कुणालाही वाटत नाही” एवढ्या स्पष्ट शब्दात तिने बाजीरावाला जाणूनबुजून अज्ञानी ठेवण्याकडे लोकांचा ओढा असल्याचं स्पष्ट सांगितलं आहे.

बाजीराव आपल्या वडिलांप्रमाणेच पुन्हा पुण्यातील लोकांच्या जीवावर उठेल अशी भीती नाना फडणिसांना सातत्याने वाटत होती.

म्हणूनच त्यांनी बाजीरावाचा पुरता बंदोबस्त केला होता. कुठेही बाहेर मोहिमेवर जायचे असल्यास बाजीरावाला कुठेतरी लांब कोंडण्यात येई. १७९५ साली निजामाच्या स्वारीवर सगळ्या पुण्यातील सैनिक गेलेले असताना बाजीरावाला मात्र जुन्नरला एका वाड्यात कोंडून ठेवण्यात आले होते. बाजीरावाची इतकी प्रचंड भीती पुण्यातल्या मंडळींना वाटत होती.

बाजीराव रघुनाथ जुन्नर येथे कैदेत होता पण त्याचे तरीही पुण्याकडे लक्ष होते.

नाना फडणीस हे नेहमीच आपल्याला आडकाठी करतील म्हणून त्याने गादीवर बसलेल्या लहानग्या सवाई माधवराव पेशव्याशी गुप्तपणे पत्रव्यवहार सुरु केला होता.

सवाई माधवराव स्वतः कर्तबगार वा सुज्ञ नव्हता, तरी त्याच्या अस्तित्वाने मराठ्यांची सत्ता एकवटून राहिली होती. याची जाणीव बाजीराव रघुनाथला होती. त्यामुळे त्याने हे चलाखीने हळूहळू खुद्द राजाकडूनच राज्यकारभाराची माहिती काढून घ्यायला सुरुवात केली.

आता या गोष्टीला मुत्सद्दीपणा म्हणायचे कि कारस्थान? हा निर्णय ज्याने त्याने घ्यायचा आहे.

नाना फडणिसाने हा पत्रव्यवहार पकडला आणि सवाई माधवराव पेशव्याला कटू शब्द बोलले. यावेळी आपल्या हाताखालील कारभाऱ्याने आपल्याला कसलीही मोकळीक देऊ नये, याचा त्याने धसका घेतला. त्यात तापाने तो आजारी पडला. दसऱ्याचा समारंभ झाल्यावर सवाई माधवरावने तापाच्या भरात २५ ऑक्टोबर १७९५ रोजी  शनिवारवाड्याच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली कारंज्यावर उडी मारली. २७ ऑक्टोबरच्या संध्याकाळी तो मरण पावला.

पेशवाई अशी त्याच्याकडे चालून आली होती. बाजीराव रघुनाथने यात कपट केलेच कुठे! इतिहासाने त्याला न्याय दिला होता इतकेच काय तर म्हणता येईल. 

दौलतराव शिंदे आणि नाना फडणवीस यांच्या मदतीनं दुसऱ्या बाजीरावाला पेशवाईची वस्त्र मिळाली.

पण सत्तेचा कारभार दौलतराव शिंदे, बाळोजी कुंजीर आणि सर्जेराव घाटगे यांच्याकडून सुरु होता. यातही ‘बारभाईंचे कारस्थान’ पेशवाईला किती पुरून उरले याचा अंदाज येईल. राजा सोडून इतरांनी कारभार करण्याची ही पद्धत बाजीरावाने नाही तर त्याच्या विरोधकांनी आणली होती. त्याला नीट राज्यकारभार करूच दिला गेला नाही. पेशवाईत माजलेल्या कर्जाविरुद्ध त्याने आवाज उठवला तेव्हा त्याच्याविरुद्ध दत्तक प्रकरण काढून किंवा महडच्या कारस्थानाने त्याचा बिमोड करण्याचा नाना फडणीसांचा प्रयत्न होता. हे सर्व कळूनही त्याने केवळ रयतेच्या भल्यासाठी नानांना शासन केले नाही.

उलट या पद्धतीचा वापर करून घेण्याचे कसब त्याने बरोबर साधले होते. सैन्याचा सगळं कारभार दौलतराव शिंदेच्या हाती होता. त्यांना भुलवून पेशव्यांचेच सरदार असलेल्या मल्हारराव होळकरांच्या बेसावध छावणीवर हल्ला करुन दौलतरावांच्या सैन्यांच्या हातून मल्हाररावांचा खून करण्यात बाजीरावाने महत्त्वाची भूमिका पार पाडली.

आपल्या स्वकीय शत्रूंना गारद करण्याची ही युद्धनीती होती.

अर्थात या हल्ल्यातून यशवंतराव होळकर बचावले.  आणि  १८०२ मध्ये उत्तरेतून पुण्यावर चाल करुन आले. हडपसर येथे झालेल्या युद्धाची सूत्रेही कारभाऱ्यांकडे होती. त्यामुळं युद्धात पराभव होत असल्याचं पाहून दुसऱ्या बाजीरावांनी पळ काढणे हे त्याला पळपुटा म्हणण्यासाठी पुरेसं नाही. तो कुठेही जाऊन लपून बसला नव्हता.

मराठ्यांच्या इतिहासात मुत्सद्देगिरीचे हे दाखले आधीपासून आहेत. आधी रायगड येथे जाऊन त्याने आपल्या क्षमतेची चाचपणी केली. त्यात आपल्या ताकदीचा अंदाज आल्यावर तो वसई येथे इंग्रजांच्या आश्रयाला निघून गेला.

आता खरे ही घटना म्हणजे पेशवाई किती पोकळ झाली याचा वस्तुपाठ आहे. स्वराज्याच्या राजधानीहून परकीयांकडे जाणे त्याला भाग पडले कारण सैन्यात तशी क्षमताच नव्हती. उलट त्याने उरलेली १६ वर्षे मुत्सद्दीपणाने पेशवाई टिकवली हीच त्याची पुण्याई होय.

आपल्या वडिलांकडून त्याने राज्यकारभारात तडजोड करण्याची हि वृत्ती स्वीकारली होती.

तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्यांकडे तो युद्धात मदत पुरवणारे सरदार म्हणूनच पाहत होता. त्यातल्या एलफिन्‍स्टनने शनिवारवाड्यात कब्जा केल्यावर त्याला या संपल्याची जाणीव झाली. त्यातही एलफिन्‍स्टनने शनिवारवाड्यातली एक भिंत विनापरवानगी पाडून टाकल्यावर त्याने त्याच्याशी युद्ध पुकारले. त्यावेळी त्याने स्वतः तलवार हाती घेऊन १८१७-१८१८ च्या युद्धात इंग्रजांचा मुकाबला केला होता. त्याला युद्धात इतर कोणत्याही मराठा सरदाराची मदत मिळाली नाही त्यामुळं ही लढाई पेशव्यांसाठी दुसरे पानिपत ठरली.

पण त्याआधी दर वेळेस बाजीराव एलफिन्‍स्टनसमोर, ‘आपण खूप नम्र आणि मृदू स्वभावाचे, युद्ध-लढाई ऐवजी ख्याली-खुशालीत रमणारे आहोत, लढाई-मोहीमांचा आपल्याला तिटकारा असून तोफांचा आवाजही सहन होत नाही’ अशी प्रतिमा प्रस्तुत केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिलेला गनिमी कावा हाच होता.

त्याच्या आयुष्यातल्या या प्रचंड गुंतागुंतीकडे आपले रूढ चष्मे आणि पूर्वग्रह बाजूला सारून पाहिलं की त्याचं खरं स्वरूप लक्षात येईल. तत्कालीन बहुभार्या पद्धतीला अनुसरून त्याची लग्ने झाली. याचाही दोष त्याचाच माथी दिला जातो.

पण महिलांना मालमत्तेत समानअधिकार देणारा हा भारतातला पहिलाच पुरोगामी आदेश काढणारा राज्यकर्ता बाजीराव रघुनाथ हाच होता.

दुसऱ्या बाजीरावाच्या कारकिर्दीत अह्मदाबादवर मराठ्यांचा ताबा होता. तेथील तीन दरवाजावरचा शीलालेख त्याच्या राजकारभाराचे उत्तम उदाहरण आहे.

१० ऑक्टोबर १८१२ साली काढलेलं देवनागरी भाषेत लिहिलेलं फर्मान तिथे कोरण्यात आलं आहे ,

“प्रत्येक मुलीला कोणत्याही अडचणीशिवाय वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळू द्या. भगवान विश्वनाथ यांची ही आज्ञा आहे. जर तुम्ही विरोध केला तर हिंदूला महादेवाला आणि मुसलमानला अल्लाह किंवा रसूल यांना उत्तर द्यावे लागेल. “

पेशवाई बुडण्याला केवळ दुसरे बाजीराव पेशवे सर्वस्वी जबाबदार होते असं नाही’ असे अजूनही इतिहासकार म्हणतात. त्याच्या दुसऱ्या बाजूकडे प्रकाश टाकून आपल्या समाजाचं एकारलेपण दर्शवायला मात्र एकही इतिहासकार पुढे आला नाही, ही या शोकात्म नायकाची शोकांतीका आहे. 

हे हि वाच भिडू:

3 Comments
  1. Abhishek Balkrishna kanase says

    दुसरे बाजीराव कर्तबगार होते की नव्हते हे ठरवण्याचा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण येथे एक गोष्ट विचारात घेण्याजोगी आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही वंशवादाचा पुरस्कार केला नाही , मात्र त्यांच्यानंतरच्या काळात वंशवादाला मोठया प्रमाणात खतपाणी घातले गेले, शिवरायांच्या काळात कधीही पेशवेपद असो वा सरनौबत पद ते कधीही एका परिवाराला मिळाले नाही , ते कर्तृत्वाने अनेकांनी मिळवले . माणकोजी दहातोंडे , नेतोजी पालकर , प्रतापराव गुजर , हंबीरराव मोहिते हे सर्व याचे उत्तम उदाहरण आहे , या सर्वांनी आपल्या कर्तृत्वावर सरनौबत पद मिळवीले ना की वंशवादाच्या जोरावर, तात्पर्य हेच की नंतरच्या राज्यकर्त्यांनी शिवरायांच्या विचारांचे आचरण केले असते, तर स्वराज्याचे १८१८ पुन्हा एकदा पानिपत झाले नसते.

  2. Yashawant says

    अरे भाऊ इतिहासाची नि ट अभ्यास कर

  3. sanap hari says

    इतिहासात प्रत्येक वेळी मग तो कुठलाही आसो(इंग्रजसुध्धा) कुठल्याही एका व्यक्तीच महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला गेला (छत्रपती संभाजी महाराज ) सुद्धा. हा कधाचित दुसरे बाजिराव युद्ध कौशल्यात निपुन नसतीलही परंतु नाण्याची दुसरी बाजु सहसा बघीतली जात नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.