पेशव्यांचा कोतवाल रोज रात्री ९ वाजता तोफेचा बार उडवून पुणे लॉकडाऊन करत असे.

थोरल्या बाजीरावांनी शनिवारवाडा बांधून पेशवाई सासवड वरून पुण्यात आणली. सातारच्या छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यू नंतर पेशव्यांच्या हातात सत्तेची सूत्रे एकवटली. रघुनाथ दादा पेशवे, होळकर, शिंदे या मराठा सरदारांची घोडी उत्तरेतही धुमाकूळ घालत होती.

संपूर्ण देशाच्या राजकारणात पुण्याचे महत्व वाढले होते.

बाजीरावांचे सुपुत्र नानासाहेब पेशवे यांनी खऱ्या अर्थाने पुण्याचा विकास केला. शहरात रस्ते बांधले, नदीवर पूल उभारले, पिण्याच्या पाण्याची सोय केली. अनेक मंदिरांची उभारणी केली.

याच काळात पुण्याची लोकप्रियता अफाट वाढली.

देशभरातून लोक रोजगाराच्या आशेने पेशव्यांची राजधानी असलेल्या पुण्याकडे येत होते. इथली लोकसंख्या सुद्धा प्रचंड वाढली.

कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी नानासाहेब पेशव्यांनी कोतवाल हे पद निर्माण केले व त्या जागी जिवाजीपंत खाजगीवाले यांची नेमणूक केली.

मध्यंतरी पानिपतच्या पराभवामुळे पुण्याचे व एकंदरीत मराठेशाहीचे प्रचंड नुकसान झाले मात्र तरीही लहानवयात पेशवे पदी आलेल्या थोरल्या माधवराव पेशव्यांनी हळूहळू सत्तेची घडी बसवली.

पुण्याचे हरवलेले वैभव माधवराव पेशवे यांनी पुन्हा निर्माण केले. हैद्राबादच्या निजामापासून दिल्ली पर्यंत सर्वांना मराठ्यांची जरब कायम केली.

पुणे शहरात ठगांचा सुळसुळाट झाला होता. छोट्या मोठ्या चोऱ्या, जमिनीचे तंटे, मारामारी यांचेही प्रमाण वाढलं होतं. या सगळ्या शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी श्रीमंत माधवरावांनी १७६४ साली स्वतंत्र पोलीस खाते निर्माण केले.

कोतवाल हा या पोलीस खात्याचा प्रमुख बनवण्यात आला!

थोरल्या माधवरावांनी कोतवालाच्या नेमणुकीपासून ते त्याच्यावर देखरेख ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी कारभारी नाना फडणवीसांना दिली होती.

यामुळे नानांच्या कारभारात कोतवालाचे प्रस्थ हळूहळू वाढले.

शहराच्या बंदोबस्ताखेरीज लहान गुन्हे, चो-या, व्यभिचाराची प्रकरणे, मद्यपान, जुगार यांसारखे गुन्हे रोखणे, याबरोबरच शहरातील बाजाराची व्यवस्था, वजनमापे, वाद्ये, हजाम, एवढेच नव्हे तर वेश्या यांची देखरेख, शहर स्वच्छता, रस्ते, इमारती, पाहुण्यांचा स‌त्कार, दानधर्म, दस्तऎवजाची नोंदणी अशी कितीतरी कामे कोतवालाकडे आली.

त्यामुळे कोतवाल म्हणजे शहरातला मुख्य व महत्त्वाचा अंमलदार बनला.

कोतवालाला बुधवार पेठेमध्ये मुख्यचावडी उघडुन देण्यात आली. १७६८ साली ती बांधून तयार झाली. वेगवेगळ्या ठिकाणी चौक्या बसवल्या.

कोतवालाच्या हाताखाली १२४ जणांचा ताफा दिली. ही शिबंदी घोड्यावरून शहरभर चकर मारून बंदोबस्त ठेवत असे.

कोतवालासकट त्याच्या हाताखालच्या लोकांचे सालिना पगार ठरवले गेले. त्यानुसार कोतवालास २५०- ३०० रुपये, त्याच्या हाताखालील फडणीस आणि दफ़्तरदार यांस प्रत्येकी २०० रुपये, मुजुमदारास १७० रुपये, कारकुनांना १००- १२५ रुपये, नोकरांना ४० रुपये, शिपाई लोकांना ४४ रुपये, मशालजींना ५५ रुपये, हरकाम्यांना ५० रुपये आणि वतनदारांना २५ रुपये, असे पदानुसार पगार ठरवले गेले.

१८ फेब्रुवारी १७६४ रोजी पुण्याचा पहिला कोतवाल म्हणुन बाळाजी नारायण केतकर याची निवड झाली.

कोतवाल झाल्या झाल्या बाळाजी केतकर याने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.

पुणे शहरात रात्री नऊ ते पहाटे चारपर्यंत संचारबंदी आणि प्रवेशबंदी लागु केली. दररोज रात्री नऊ वाजता तोफेचा बार उडवून संचार बंदी सुरू होत असे आणि पहाटे ४ वाजताच्या तोफेनंतर खतम होत असे.

याकाळात कडक देखरेख ठेवली जात होती. यामुळे रात्रीच्या अंधारात होणारे बरेच गुन्हे आटोक्यात आले.

पुण्याची कायद्याची व शांतता सुव्यवस्था याची घडी बसली.

पुढे याच कोतवालपदी आलेल्या घाशीराम सावळदास आणि आनंदराव वाचासुंदर यांच्या भ्रष्टाचारी कारभारामुळे कोतवालीची प्रतिष्ठा धुळीस मिळाली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.