नाव जरी पीटर इंग्लंड असलं तरी ब्रँड मात्र भारतीय आहे….

कपड्यांचे शौक हा एक अभ्यास करण्याजोगा विषय आहे. सणावारापासून ते फोटोशूटपर्यंत चांगले कपडे आणि त्यातल्या त्यात ब्रँड कोणता आहे यावरून कपडे घेण्याचं ठरतं. आजकाल ऑनलाईन शॉपिंग आली आणि त्याचबरोबर कपड्याचे अनेक ब्रॅंडसुद्धा आले. पण या ब्रॅण्डच्या जगात मागील अनेक वर्षांपासून एक ब्रँड कायम टॉप ५ मध्ये असतो त्या ब्रान्डबद्दलचा हा किस्सा.

बऱ्याच जणांना पीटर इंग्लंड हा अमेरिका वा फॉरेनचा ब्रँड वाटतो पण हा जगप्रसिद्ध पीटर इंग्लंड ब्रँड अस्सल देशी आहे. भारतात अगदी तगडं नेटवर्क पीटर इंग्लंडचं आहे.

पीटर इंग्लंडला आपल्या ब्रॅण्डच्या नावामुळे अनेकदा अडचणींचा सामना करावा लागला आहे त्याचासुद्धा एक किस्सा आहे.

२०१५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वदेशी जागरण मंचाने विदेशी उत्पादनांची एक भलीमोठी यादी तयार केली होती. या लिस्टमध्ये पीटर इंग्लंडचंसुद्धा नाव सामील होतं. पण शेवटी बराच काळ समजावून सांगितल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विश्वास पटला कि पीटर इंग्लंड हा स्वदेशी ब्रँड आहे. पुढे पीटर इंग्लंडचं नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्या यादीतून काढून टाकलं. 

पीटर इंग्लंड हा ब्रँड आदित्य बिर्ला गृपचाच एक भाग आहे. १९९७ साली भारतात हा ब्रँड स्थापन करण्यात आला. पण खऱ्या अर्थाने पीटर इंग्लंड ब्रॅण्डची स्थापना १८८९ साली इंग्लंडमध्ये लंडन डेली आयलँडमध्ये झाली होती. ज्यावेळी हा ब्रँड स्थापन झाला तेव्हा या ब्रँडचे कपडे सामान्य लोकांसाठी नव्हते.

त्या काळात पीटर इंग्लंड ब्रँड हा लंडनमध्ये ब्रिटिश सैनिकांसाठी युद्धात वापरले जाणारे कपडे बनवीत असे. यात एक विशिष्ट प्रकारचा सदरा आणि पतलून बनवली जात असे. १९९७ साली पीटर इंग्लंड या ब्रॅण्डला भारतात लॉन्च करण्यात आलं. २००० सालापर्यंत पीटर इंग्लंड हा ब्रँड भारतातला एक नंबर ब्रँड बनला होता. सुरवातीच्या काळात हा ब्रँड फक्त पुरुषांकरिताच कपडे तयार करत असे. 

भारतात हा ब्रान्ड आल्यापासून पीटर इंग्लंड कायम टॉप ५ कपड्यांच्या ब्रँडमध्ये  आपल्याला दिसून येईल. या ब्रॅण्डला सगळ्यात प्रसिद्धी हि तरुणाईकडून मिळाली. तरुण मुलांबरोबरच मोठ्या व्यक्तींमध्येही या ब्रॅण्डची क्रेझ तीच होती. ब्रॅण्डवर लोकांचा चांगलाच भरोसा होता. उत्तम गुणवत्ता आणि कपड्यांची स्टाईल लवकरच लोकांमध्ये रुजत आणि प्रसिद्ध होत गेली.

पीटर इंग्लड हा असा ब्रँड मानला जातो कि जो तरुण मुलांकय्या सगळ्या फॅशनचे लाड पुरवतो. आज घडीला पीटर इंग्लंडचे भारतात हजाराहून अधिक जास्त स्टोर आहेत. हा पीटर इंग्लंड ब्रँड फक्त भारतातच नाही तर परदेशातसुद्धा प्रचंड फेमस आहे. परदेशातसुद्धा या ब्रान्डबद्दल तुम्हाला कौतुक ऐकायला मिळेल. 

दरवर्षी या ब्रँडमधून जवळपास ५० लाखाहून अधिक कपड्यांचा विक्रमी खप होतो. ज्यात जास्त करून कॅज्युअल आणि फॉर्मल शर्ट सामील असतात. आजच्या काळात आपल्याला पीटर इंग्लंडचे अनेक प्रॉडक्ट पाहायला मिळतील. फॉर्मल, लायनिंग, कुर्ता असे अनेक व्हरायटी असलेले कपडे या ब्रँडमध्ये मिळतात.

आदित्य बिर्ला ग्रुप पीटर इंग्लडबरोबरच लुईस, फिलिपी, एलेन सॉली, वॅन हेउसेन हे सुद्धा ब्रँड चालवतात. आज घडीला सुद्धा पीटर इंग्लड ब्रॅण्डची लोकप्रियता तशीच टिकून आहे. कपड्यांच्या बाबतीत क्वालिटी प्रॉडक्ट देणारा ब्रँड म्हणून पीटर इंग्लंडला ओळखलं जातं. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.