शिवरायांच्या गडकिल्ल्यांच्या प्रेमात पडलेला बेल्जीयन अवलिया !!
“Life is too short to wake up at the same place everyday” या उक्तीवर जीवन जगत भल्यामोठ्या पगाराच्या नोकरीला लाथ मारली व उरला सुरला पैसा खिशात भरत निघाला हा 45 वर्षीय पट्ठ्या
‘जगायला’ !
परदेशात सिस्को कंपनीत मोठ्या पदावर असल्याने कंपनीने पीटर यांना भारतात नवीन इंजिनिअर भरतीसाठी पाठवले. आपल्या देशाने त्यांना इतकी भुरळ पाडली की त्यांनी नोकरी भारतातच मिळावी अशी कंपनीला विनंती केली व ती मान्य झाली.
लहानपणापासून आभाळाखाली जीवन जगण्याची त्यांना भारी हौस. सायकलिंग,रनिंग, स्विमिंग व मैदानी खेळांची अत्यंत आवड असल्याने ‘कॉर्पोरेट जीवनात’ त्यांचा श्वास कोंडला जात होता तरी त्यांनी नोकरी सांभाळत भारतात भटकंती चालू ठेवली. ऑफिसमधील लोकांनाही ते भटकंतीस नेत.
आपल्या देशाच्या ते जणू प्रेमातच पडले होते.एक दिवस ऑफिसमधील सर्व जबाबदाऱ्या पार पाडून त्यांनी कार्यमुक्त होऊन खऱ्या अर्थाने जीवन जगायचे ठरवले आणि येथून सुरु झाला त्यांच्या भटकंतीचा प्रवास !
जेथे जायचे आहे त्याचा पूर्ण अभ्यास करून व GPS चा शास्त्रशुद्ध अभ्यास करून पीटर एकटेच फिरतात. कमीत कमी सामान घेऊन ते भटकंती करतात. त्यांच्या बॅग मध्ये एका माणसासाठीचा एक अगदी छोटा तंबू, स्लीपिंग मॅट व एक स्लीपिंग बॅग असते. डोक्यात टोपी,अंगावर एक टीशर्ट,छोटी पॅन्ट,सॉक्स व शूज. GPS साठी व मोजके फोटो काढण्यासाठी एक मोबाईल फोन (OnePlus7pro)
इतकेच सामान, याव्यतिरिक्त काहीही नाही.
नैसर्गिक जलस्रोतातीलच पाणी ते पितात. घरातील RO चे किंवा कुठलेही बाटलीबंद पाणी ते पीत नाहीत. भटकंतीच्या वेळी अन्न, जेवण यांना ते दुय्यम स्थान देतात दिवसभर एकदा पिलेल्या पाण्यावर डोंगरावर चित्त्याच्या वेगात चढण्यात पीटरसरांची हातोटी आहे.
जो चौलेर किल्ला आम्हाला चढायला दीड तास लागले तो किल्ला पीटर अवघ्या 20 मिनिटात चढले. त्यांच्या वेगाने व क्षमतेने डोंगर-किल्ले चढणारा ट्रेकर मी तरी आजवर पाहिलेला नाही.
‘ट्रान्स सह्याद्री’ ह्या त्यांच्या मोहिमेत कमीत कमी वेळात 200 किल्ले सर करण्याचा त्यांचा मानस आहे. महाराष्ट्रातील इतर किल्ले सर केल्यानंतर उत्तर नाशिक भागातील बागलाण प्रांत त्यांनी सध्या निवडला आहे. महाशय एका दिवसात चार ते पाच किल्ले करतात,डोंगरात अथवा पायथ्याच्या गावात जागा मिळेल तेथे आपला तंबू लावतात. गावातील लोकांनी प्रेमाने दिलेला पाहुणचार स्वीकारून झोपतात,
सकाळी लवकर उठून सूर्यनारायण उगवायच्या आत उगवता सूर्य बघण्यासाठी कुठल्यातरी किल्ल्याच्या माथ्यावर असतात.
पायथ्याला कुठल्यातरी तळ्यात मनसोक्त पोहून त्यांची अंघोळ आटोपते व तसेच ओले कपडे अंगावरच वाळवत, GPS बघत दुसऱ्या किल्ल्याकडे त्यांच्या पल्सरवर बसून कूच करतात.
‘डोंगरात कुठेही झुडपात झोपायला वन्य प्राण्यांपासून भीती नाही वाटत का?’
या माझ्या प्रश्नाला उत्तर देताना पीटर म्हटले की
“‘भीती’ हा शब्द मी माझ्या शब्दकोशातून वगळला आहे. भीतीपोटी आपण आपले जीवन खऱ्या अर्थाने जगत नाही. आपल्याला जितकी भीती असते त्याहुन कित्त्येक पट भीती आपल्यापासून वन्यप्राण्यांना असते. माणसासारखा हिंस्त्र व क्रूर प्राणी समोर असताना ते आपल्या जवळ येण्यास घाबरतात, माणूस असण्याची मला इतर वेळी लाज वाटते पण इथे असण्याचा मला फायदा होतो”
पीटर यांना शहरी जीवन कदापि आवडत नाही. चेन्नई येथे त्यांनी भाड्याने खोली घेतली आहे परंतु ते तेथे आजवर एक दिवसापेक्षा अधिक दिवस सलग मुक्कामी राहिलेले नाहीत. एका भटकंती मोहिमेनंतर पुढची मोहीम त्यांची प्लॅनिंग करून तयार असते. कुठल्या शहरात रहाण्याची वेळ आलीच तर ते बस्थानाक, रेल्वेस्थानक किंवा एखाद्या मंदिराचा आसरा घेतात.
त्यांनी रहाण्यासाठी आजवर कुठलेही हॉटेल बुक केलेले नाही. कृत्रिम व सर्वसुखसंपन्न जीवनाचा त्यांना फार तिटकारा आहे.
आपल्या ग्रामीण भागात फिरताना त्यांना भाषेचा कधीही अडसर जाणवला नाही. महाराष्ट्रातील लोक मला खूप प्रेम देतात असं त्यांचं म्हणणं आहे. पाणी मागण्याचे हावभाव केल्यास लोक मला पाण्यासोबत जेवणही वाढतात. त्यांना महाराष्ट्राची भाकरी फार आवडते आणि चुलीवर बनलेले अन्न ते मिटक्या मारत फस्त करतात. अन्नदात्याशी अगदी समरूप होऊन ते रात्रीचा भोजनाचा वेळ व्यतीत करून ते सर्वांबरोबर एक सेल्फी काढून निरोप घेतात.
माझ्या तिळवण गावाच्या ‘चौलेर किल्ल्यावर पीटर येणार आहेत हे माहिती पडताच मी त्यांना संपर्क केला व त्यांच्यासोबत ट्रेकिंग करण्याचा मानस बोलून दाखवला. तात्काळ त्यांनी होकार देऊन भेटीचा दिवस व वेळ ठरली.
आम्ही लवकर पोहचल्यामुळे चढाई लवकर चालू केली. चौलेरच्या शिवलिंगाजवळ आमची गाठभेठ झाली.गावचा किल्ला असल्यामुळे तो मला अगदी तोंडपाठ! किल्ल्याची ठिकाणे,इतिहास व इत्यंभूत माहिती पीटर यांना दिली.
‘मी पाहिलेला एक अत्यंत सुंदर किल्ला’ अशा शब्दात त्यांनी चौलेर बद्दलचं प्रेम व्यक्त केलं.
किल्ला उतरताना त्यांनी आम्हा ‘नवख्या’ ट्रेकर्सला काही खास गुरुकिल्ल्या दिल्या. पृथी,यश आणि मी त्यांच्यासोबत काही फोटो घेतले व पायथ्याला काकांच्या घरी त्यांना पाहुणचारास नेले. काकांनीही या परदेशी पाहुण्यांचं आगत्याने स्वागत केले, पेटपूजा करून ‘गोनीदांच्या’ ‘दुर्गभ्रमणगाथा’ वर व आप्पांच्या ‘रणपति शिवाजीमहाराज’ या पुस्तकांवर पीटर यांची स्वाक्षरी घेऊन मनात त्यांना गुरुस्थानी बसवले.
https://www.facebook.com/PeterVanGeit
पीटरसरांनी धन्यवाद देत आमचा निरोप घेतला व त्यांच्या पल्सर वर स्वार होऊन पिंपळा किल्ल्याकडे रवाना झाले.
कल्पना करवत नव्हती की हा इतका मोठा माणूस इतका नम्र कसा? याला कसलाही गर्व कसा नाही? कुठून आणलं असेल यांनी इतकं मनाचं मोठेपण? न रहावता विचारून टाकलं तर उत्तर मिळालं की
हे सगळं भारताच्या इतिहासात,सह्याद्रीच्या मातीत व शिवाजी महाराजांच्या शिकवणीत दडलेलं आहे, ज्याला सापडलं तो माझ्यासारखा सुखी आहे, ज्याने दुर्लक्ष केलं तो 9 ते 5 आयुष्य जागून पैसे मिळवूनही दुःखी!”
कधी या अवलियाला भेटायची व हितगूज करायची संधी मिळेल तर कधीच सोडू नका. पीटर एक प्रेरणेचा दारुगोळा भरलेली बुलंद तोफच आहे असं मी म्हणेन.
पीटर सरांचं ब्रीदवाक्य आहे, ” Die with memories; not dreams!”
अनुभवकथन – ज्ञानेश्वर गुंजाळ (नाशिक)
हे ही वाच भिडू.
- महाराष्ट्रात आहे ३८२ एकरावर पसरलेला प्रचंड मोठा किल्ला !
- बजरंगबली हनुमानाचे जन्मस्थान असलेला नाशिकमधला अंजनेरी किल्ला !!
- मराठा सैन्याने शपथ घेतली, आत्ता किल्ला घेतल्याशिवाय अन्नग्रहन करणार नाही..