भिडूनों तयार व्हा, भारतात १६० रुपये लिटरचं पेट्रोल आलयं….

पेट्रोलचे दर वाढतं आहेत म्हणून तुम्ही बेजार झाला असाल, पेट्रोल पंपावरचा मीटर १०० रुपये लिटरकडे गेलायं, त्यामुळे मोदींच्या पंपावरच्या फोटोला हात जोडण्यापासून तुमच्या सगळ्या गोष्टी करून झाल्या असतील. पण काय करणार जे आहे ते तर सांगणं आपलं काम आहे. आता १०० रुपये लिटरचं पेट्रोल भरल्यानंतर तयार व्हा त्याच्या पुढचा टप्पा अनुभवायला.

भारतात आता १६० रुपये लिटरचं पेट्रोल सगळीकडे मिळालेला सुरुवात होणार आहे.

जगात काही मोजकेच असे देश आहेत जिथं प्रीमियम क्वालिटीचं पेट्रोल बनतं आणि मिळतं देखील. आता याच यादीत भारताचा पण समावेश झाला आहे. दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद अशा १० महानगरांमध्ये डिसेंबरमध्ये पहिल्या टप्प्यात केवळ प्रायोगिक तत्वावर लॉन्च झालेलं 100 ऑक्टेन हे प्रीमियम पेट्रोल आता दुसऱ्या टप्प्यात राहिलेल्या महानगरात आणि मध्यम शहरात लॉन्च करण्यास सुरुवात झाली आहे.

काल याच दुसऱ्या टप्प्यांतर्गत हैदराबादमध्ये हे 100 Octane पेट्रोल लॉन्च झालं आणि त्याचा दर १६० रुपये प्रतिलिटर होता.  

आता या 100 ऑक्टेन आणि आपल्या पेट्रोलमध्ये काय फरक आहे?

सर्वसामान्यपणे इंडियन ऑईल 91 ऑक्टेन पेट्रोलची विक्री आणि मार्केटिंग करत. पण आता इंडियन ऑईलनेच त्यांच्या मथुरा रिफाइनरीमध्ये 100 ऑक्टेन पेट्रोलचं उत्पादन सुरु केलं आहे. बाजारातील नवीन इंजिन असलेल्या बीएस 6 या क्लासमधील वाहनांसाठी हे जास्त फायदेशीर असणार आहे.

या 100 ऑक्टेन पेट्रोललाच हाय ऑक्टेन फ्यूल या नावानं पण ओळखलं जातं. वाहनाच्या इंजिनला नॉक पासून वाचवण्याच्या पेट्रोलच्या क्षमतेचं जे रेटिंग असतं त्यालाच ऑक्टेन रेटिंग म्हणून ओळखलं जातं.

इंजिनच्या एक किंवा एका पेक्षा जास्त सिलेंडरमध्ये कंप्रेस्ड ऑईलमुळे जेव्हा फास्ट इग्निशन होतं, त्यावेळी इंजिनमधून झनझन सारखा एक कर्कश्य आवाज येतो, यालाच इंजिन नॉक होणं म्हंटलं जातं. जे इंजिनसाठी नुकसानकारक असतं.

बीएस 6 याच क्लासमधल्या वाहनांसाठी का वापरायचं?

आता तुम्ही म्हणालं मग हे आपल्या जुन्या आणि बीएस 6 क्लासच्या खालच्या गाड्यांमध्ये टाकलं तर चालतंय का? तर तज्ञांच्या सल्ल्यानुसार या हाय ऑक्टेन पेट्रोलचा वापर फक्त हाय परफॉर्मन्स इंजिनवाल्या वाहनांमध्येच केला जावा. त्याच कारण म्हणजे प्रीमॅच्युअर इग्निशनची येणारी समस्या यायला नको.

पण तरीही काही जण आपल्या नॉन टर्बो पॉवर कारमध्ये याचा वापर करताना दिसून आलेत, मात्र त्यामुळे इंजिन ऑन व्हायला वेळ लागण्याची शक्यता जास्त असल्याचं मत तज्ञ सांगतात.

या पेट्रोलचे फायदे काय असतात? 

तर यातील तंज्ञानी अगदी ड्रायव्हर, फ्युल रिटेलर, ग्राहक, वाहन निर्माते आणि सोबतच पर्यावरणप्रेमी या सगळ्यांसाठी या पेट्रोलचे काही न काही फायदे सांगितले आहेत.

ड्रायव्हर आणि ग्राहकांसाठी जरी हे पेट्रोल महाग असलं तरी दुसऱ्या बाजूला फ्युल तुमच्या इकॉनॉमीमध्ये येण्याची शक्यता आहेत. कारण मोटारस्पोर्ट किंवा हेवी वाहनांच्या इंजिनची क्षमता वाढू शकते. ज्यामुळे बऱ्याच कालावधी पर्यंत मेंटेनन्सवर खर्च येणार नाही. त्यामुळे तो पैसा वाचू शकतो.  

तसेच ग्रीनहाऊस गॅसच उत्सर्जन कमी होणार आहे. त्यामुळे ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन टॅक्सची बचत होऊ शकते.

यात निर्मात्यांना पण फायदा असा कि, ते ग्राहकांना चांगलं मार्जिन देऊ शकतात. जर त्यांचा दावा खरा मानला तर हा ग्राहकांचा पण अजून एक फायदा आहे.

भारत स्टेज एमिशन स्टॅंडर्ड, केंद्र सरकारची एक संस्था आहे, जी वायु प्रदूषणाला नियंत्रित करते. त्यांचं पण म्हणणं आहे की हाय ऑक्टेन फ्यूलमध्ये प्रदूषणाची तत्व कमी आहेत. म्हणजेच काय तर पर्यावरणप्रेमी देखील याच्या बाजूने आहेत.

याबद्दल आता आणखी काही महत्वाच्या गोष्टी… 

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे प्रीमियम क्वालिटीच पेट्रोल जगात केवळ अमेरिका, जर्मनी, ग्रीस, इंडोनेशिया, मलेशिया आणि इस्रायल याच देशात उपलब्ध आहे, आता या देशांच्या पंगतीत भारत देखील जावून बसला आहे.

पहिल्या टप्प्यात भारतात हे पेट्रोल दिल्ली, गुडगाव, नोएडा, आग्रा, जयपुर, चंडीगढ, लुधियाना, मुंबई, अहमदाबाद या ठिकाणी लॉन्च केलं होतं,  आता दुसऱ्या टप्प्यात हैदराबादमध्ये लॉन्च केलं आहे, लवकरच चेन्नई, कोलकाता, बंगळुरु, भुवनेश्वर आणि महाराष्ट्रातील नागपूर वगैरे या शहरात याच दुसऱ्या टप्यात लॉन्च केलं जाणार आहे. 

आणखी गोष्ट तुम्हाला माहिती असायला हवी ती म्हणजे, पेट्रोलियम उद्योगातील तज्ञांच्या मते, देशात पेट्रोलच्या विक्रीच जेवढं मार्केट आहे, त्यातील ९० टक्के नॉन ब्रँडेड पेट्रोलचा व्यापार आहे, म्हणजे ते कोणत्याही गाडीला चालू शकत. तर हाय ऑक्टेन पेट्रोलच मार्केट लक्झरी वाहनांसाठी उपयुक्त आहे.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.