पेट्रोलियम राज्य मंत्री म्हणतायत, कोरोना वॅक्सीन फ्री दिल्यामुळं पेट्रोल डिझेल महागलंय.

आपला देश महाभागांचा देश आहे असं म्हंटल तर कोणाला खटकायचं काही कारण नाहीये. कारण हा लेख वाचणारे स्वतःहून तसं मान्य पण करतील. आता महाभाग म्हणण्याचं कारण म्हणजे,

कोरोना वॅक्सीन फ्री वाटल्यामुळे पेट्रोल आणि डिझेल महागलं असल्याचा जावईशोध एका मंत्र्यांनी लावला आहे. रामेश्वर तेली असं या मंत्री महोदयांच नाव आहे. आणि ते स्वतःच पेट्रोलियम राज्य मंत्री आहेत. रामेश्वर तेली हे आसाममधील डिब्रूगढचे लोकसभा खासदार आहेत.

आता तुमच्या आमच्या सारख्या साध्याभोळ्या माणसांना असं वाटत होतं की, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीचे कारण विविध प्रकारचे टॅक्स आहेत. तर तसं पण नाहीये. केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्र्यांनी यासाठी वेगळ कारण दिल आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवर त्यांनी म्हटलयं की लोकांना मोफत लस देण्यात आली होती आणि मोफत दिलेल्या लसीसाठी पैसे कुठून आणणार?

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करून हा पैसा गोळा करण्यात आला आहे.

हे केंद्रीय पेट्रोलियम राज्य मंत्री आसाम दौऱ्यावर होते. तिथं त्यांनी हि मुक्ताफळे उधळली आहेत. पुढं एवढंच बोलून ते थांबत नाहीत बरं का, तर ते पुढं ही पेट्रोल डिझेल महागल्याची सविस्तर कारण सांगतात,

इंधनाचे दर जास्त नाहीत, त्यात टॅक्सचा पण समावेश आहे. तुम्ही मोफत लस घेतली असेल, त्याचे पैसे कुठून येणार ? तुम्ही पैसे दिले नाहीत. म्हणून ते अशा प्रकारे गोळा करावे लागले. देशातल्या १३० कोटी लोकांना मोफत लस देण्याचे आमच्या सरकारचे ध्येय आहे. प्रत्येक लसीची किंमत सुमारे १२०० रुपये आहे आणि प्रत्येकाला २ डोस द्यावे लागतात.

आसाम मध्ये पेट्रोल कसं स्वस्त आहे हे हि त्यांनी सांगितलं.. 

एका लिटर पेट्रोलची किंमत ४० रुपये आहे. केंद्रापासून राज्यांपर्यंत पेट्रोलवर वेगवेगळे टॅक्स लावले गेलेत. आसाम हे एकमेव राज्य आहे ज्याने सर्वात कमी व्हॅट आकारला आहे. आसाममध्ये पेट्रोलवर व्हॅट फक्त २८ रुपये आहे. आमच्या मंत्रालयाने कर म्हणून ३० रुपये लावले आहेत.

तर पुढं जाऊन त्यांनी पाणी आणि पेट्रोलची तुलना पण केली आहे. ते म्हणतात, 

जर तुम्हाला हिमालयातील पाणी प्यायचे असेल तर तुम्हाला एका बाटलीसाठी १०० रुपये मोजावे लागतील. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढतील तेव्हा पाण्याचे भाव आपोआप वाढतील. आमचे मंत्रालय तेलाचे दर ठरवत नाही. हे काम वाणिज्य विभागाचे आहे आणि हे सर्व आंतरराष्ट्रीय बाजाराशी संबंधित आहे.

सध्या पेट्रोलच्या किमतींनी आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. अनेक ठिकाणी १०० रुपयांपेक्षा जास्त प्रति लिटर पेट्रोलचे दर आहेत.

यावर मंत्री रामेश्वर तेली म्हणाले की,

सर्वात महाग पेट्रोल राजस्थानमध्ये आहे. याचे कारण म्हणजे राजस्थानने देशात सर्वाधिक व्हॅट लावला आहे. राजस्थान सरकार पेट्रोलवरचा व्हॅट कमी करत नाही. निवडणुकीच्या वेळी आसाम सरकारने पेट्रोलवरील व्हॅटमध्ये १० रुपयांनी कपात केली होती. राजस्थान सरकारला असं वाटतय की, जर पेट्रोल महाग विकले गेले तर ते मोदी सरकारचं नाव खराब होईल, पण तसं काही नाहीये. महाराष्ट्र सरकार सुद्धा असेच काम करत आहे. तेथे व्हॅट देखील खूप जास्त आहे

आता फक्त केंद्रीय मंत्री रामेश्वर तेलीच नाही तर आसाम बीजेपीचे भाबेश कलिता यांनी पेट्रोल वाचवण्याच्या दोन भन्नाट युक्त्या सांगितल्या आहेत.

पहिलं तर, एका बाईकवर तीन लोकांनी प्रवास करावा.

आणि दुसरं म्हणजे, लोकांनी पायी प्रवास करावा.

हे राव आपल्याला आवडलं. म्हणजे या दोन युक्त्यांपेक्षा जगात दुसरं असं काही भन्नाट असूच शकत नाही. विश्वास आहे आमचा, तुमचा आणि अख्या जगाचा. 

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.