महाराष्ट्राला पेट्रोलचे दर कमी करणं शक्य आहे का?

आज मेघालय सरकारने पेट्रोल-डिझेल वर असलेला राज्याचा कर कमी करत पेट्रोलचे दर ५ रुपयांनी तर डिझेलचे दर ७ रुपयांनी कमी केले आहेत. मागच्या २ दिवसांपासून मेघालयमधील वाहतूकदारांच्या संघटनेने संप पुकारला होता, किमती कमी केल्या नाहीत तर हा संप अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील दिला होता.

या पार्श्वभूमीवर मेघालयमधील नॅशनल पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरे़ड संगमा यांनी केंद्र सरकारची वाट न बघता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला.

यासाठी सरकारवर राज्य सरकारकडून लावण्यात येणारा व्हॅट कमी करण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. यापूर्वी आसाम सरकारने देखील राज्यामधील पेट्रोलचा कर कमी करत ५ रुपयांनी किमती कमी केल्या होत्या.

याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात देखील पेट्रोलचे दर कमी करता येणं शक्य आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे

महाराष्ट्रात मिळणाऱ्या पेट्रोलवर कर-रचना कशी आहे? 

आज १७ फेब्रुवारी रोजी पेट्रोलची बेस प्राईझ ३१ रुपये ८९ पैसे इतकी होती.

त्यावर वाहतूक खर्च प्रतिलिटर ०.३२ पैसे इतका आहे.

काही ठिकाणी हा वाहतूक खर्च बदलत जातो. उदा : परभणीमध्ये मनमाडवरून ३०० किलोमीटर अंतरावरुन पेट्रोल आणावं लागत. त्यामुळे इथे वाहतूक खर्च देखील जास्त आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल या शहरात मिळत.

त्यावर एक्साईज ड्युटी म्हणजेच केंद्राचा कर साधारण ३२.९८ पैसे प्रतिलिटर बसतो.

मोदी सरकारच्या कार्यकाळात या एक्साईज ड्युटीमध्ये तब्ब्ल १३ वेळा वाढ करण्यात आली. तर केवळ तीन वेळा एक्साईज ड्युटी कमी करण्यात आली.

आता प्रश्न राज्याच्या कराचा.

राज्यात साधारण मूल्यवर्धित कर (व्हॅट ) आणि सेस असे दोन कर पेट्रोलवर आकारले जातात.

व्हॅट आणि सेस साधारण २६.६४ रुपये प्रतिलिटर आकारले जाते. 

यात स्वच्छता, कोविड, दुष्काळ, महामार्गावरील दारूची दुकान बंद झाल्यामुळे बुडालेला महसूल सेस यासारख्या सेसचा समावेश आहे.

तर डिलर्सचे कमिशन ३ रुपये ५६ पैसे प्रतिलिटर आहे. 

असे सगळे कर मिळून आजचे पेट्रोलचे दर ९५ रुपये ३९ पैसे आहेत. (पुण्याप्रमाणे)

त्याच वेळी,

डिझेलची आजची बेस प्राईझ ३१ रुपये ४२ पैसे अशी आहे

त्यावर वाहतूक खर्च प्रतिलिटर ०.२९ पैसे इतका आहे. तर त्यावर एक्साईज ड्युटी म्हणजेच केंद्राचा कर साधारण ३१.८३ पैसे प्रतिलिटर बसतो.

राज्यात डिझेलवर देखील मूल्यवर्धित कर (व्हॅट) आणि सेस असे दोन कर आकारले जातात.

व्हॅट आणि सेस साधारण १९.२६ रुपये प्रतिलिटर आकारले जाते. 

डिझेलवर देखील पेट्रोलप्रमाणेच विविध सेस लागू आहेत.

तर डिलर्सचे कमिशन २ रुपये ५२ पैसे प्रतिलिटर आहे. 

असे सगळे कर मिळून आजचे डिझेलचे दर ८५ रुपये ३२ पैसे आहेत. (पुण्याप्रमाणे)

सेसमध्ये अशी झाली होती वाढ.

मे २०१७ मध्ये महाराष्ट्र सरकारने पेट्रोलवरील अधिभार दोन रूपयांनी वाढवला. महामार्गांवरील पाचशे मीटर अंतरापर्यंतचे बार बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे एक्साईजचे नुकसान होणार होते.

गेल्या वर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र सरकारने कोविड सेस म्हणून पेट्रोलवर २ रुपयांचा कर वाढवला होता. लॉकडाऊनमुळे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने प्रतिलिटर ८.१२ रुपयांचा सेस १०.१२ रुपये केला होता. तर डिझेलवर प्रतिलिटर १ रुपयांवरून ३ रुपये केला होता.

देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार दर कमी करणं शक्य आहे

काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राने पेट्रोलचे दर कमी करण्यासाठी त्यावरील कर कमी करावा अशी मागणी केली होती. सोबतच त्यांच्या कार्यकाळात पेट्रोल २ रुपये स्वस्त झाल्याचं देखील सांगितलं होतं. विशेष म्हणजे त्यावेळी महाराष्ट्र सरकारच एकही रुपयाचं नुकसान झालं नव्हतं, असाही दावा त्यांनी केला होता.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.