पेट्रोल-डिझेलचे भाव कमी झाल्याने सगळा भारत खूष, पण बाजार उठलाय तो पंपवाल्यांचा..

पेट्रोलचे दर कमी झाले तेव्हा लोकं आनंदाने टाक्या भरून घेत होते. लोकं हसत पेट्रोल भरत होती मात्र पेट्रोल पंप मालकाच्या चेहऱ्यावर मात्र बारा वाजले होते. लोकं खुश होऊन पेट्रोल भरत होती तर पेट्रोलचालक मात्र बरबाद होगया, बरबाद होगया एवढंच म्हणत होता.

मग शेवटी मालक का असेना दुःखी आहेत म्हटल्यावर आपल्या भिडूला पण राहवलं नाही आणि ही माहिती पुढं आली.

त्याचं झालं असं की अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे ८ रुपये प्रति लिटर आणि ६ रुपये प्रति लिटर कपातीची घोषणा केली.

यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर ९.५ रुपये आणि डिझेलचे दर ७ रुपये प्रति लीटरने कमी होणार झाले.

त्याचबरोबर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी राज्यांनाही किंमती कमी करण्याची सूचना केली.

मग महाराष्ट्रातही किंमत कमी करण्यात आली. महाराष्ट्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे २.०८ रुपये आणि १.४४ रुपये प्रति लिटर कपात करण्याची घोषणा केली. यामुळं जवळपास ११ ते १२ रुपयांनी पेट्रोल स्वस्त झालं. मात्र लागोपाठ दोन दिवस एवढ्या मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी झाल्यानं पेट्रोलचालकांना त्याचा चांगलाच तोटा झाला आहे.

आत्ता समजून घ्या हा तोटा कसा होतोय..

पेट्रोलपंप चालक कोणत्यातरी एका ऑइल कंपनीचा पेट्रोल पंप चालवत असतात.

ऑइल कंपन्या त्यांना लिटरमागे काही ठराविक कमिशन देत असतात. बिझनेस स्टॅण्डर्डच्या रिपोर्टमुसार इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड जी भारतातील सर्वात मोठी तेल विपणन कंपनी ती डीलर्सना ते विकत असलेल्या प्रत्येक लिटर पेट्रोलवर २.५८ रुपये कमिशन देते.

हिंदुस्तान पेट्रोल कॉर्पोरेशन लिमिटेड कॉरपरेशन पण तेवढंच कमिशन देते. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड प्रति लिटर २.६० रुपये डीलर कमिशन देते. तर तिन्ही कंपन्या प्रति लिटर डिझेलवर डीलर कमिशन म्हणून १.६५ रुपये देतात.

व्यतिरिक्त पेट्रोल पंप वाल्यांना फायदा होत असतो तो म्हणजे रात्रीत किंमती वाढवल्याचा. 

अनेकदा पेट्रोल पंप धारक २ ते ३ दिवसांचा साठा करून ठेवतात. त्यामुळं जर त्यानंतर किमती वाढल्या तर त्यांना फायदा होतो.

उदाहरणार्थ १०० रुपये लिटरने खरेदी करून ठेवली आणि जर किमती वाढून १०२ झाली तर त्यांना लिटर मागे २ रुपय अधिकचा फायदा होतो. मार्च महिन्यात तर १० दिवसात ९ वेळा भाव वाढ झाली होती आणि प्रत्येकवेळी ८० पैशांनी वाढ होत जवळपास ६.४० रुपयांची वाढ झाली होती. अशा वेळी दहा दिवसांपूर्वी साठा करून ठेवला असेल तर लीटरमागे ६.४० रुपयांचा फायदा पेट्रोलपंप चालकांना झाला असेल.

अनेकदा इलेक्शन नंतर रोखून धरलेली भाववाढ होणार हे अपेक्षितच असतंय. अशावेळी पेट्रोल पंप मालकांवर पेट्रोलचा जास्तीचा साठा करून ठेवून नंतर मग भाव वाढल्यानंतर तो बाहेर काढल्याचे आरोपही झाले आहेत.

आता मात्र परिस्थिती उलटी झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारांच्या निर्णयामुळं अनेक पेट्रोल पंप धारकांना चांगलाच तोटा झाला आहे.

पंप मालक तेल कंपन्यांकडून केंद्र आणि राज्याचा टॅक्सचा समावेश असलेल्या दराने इंधन खरेदी करतात. 

पेट्रोलपंप धारकांनी पेट्रोलचा स्टॉक करून ठेवला होता त्यांना लिटरमागे जवळपास १२ रुपयांचा लॉस झाला आहे.

बोल भिडूने यासंबंधी ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन प्रवक्ते अली दारूवाला यांच्याशी चर्चा केली तेव्हा ते म्हणाले,

” पेट्रोल डिझेलचे भाव इतक्या मोठ्या प्रमाणात उतरवाल्याने पेट्रोल पंपवाले अक्षरशः बरबाद झाले आहेत. मागच्या दिवाळीत जसा लॉस झाला होता तसाच लॉस आता देखील झाला आहे.

माझ्या स्वतःच्या पेट्रोल पंपात १० लाखांचा लॉस मला झाला आहे. राज्यात तर असे ४५०० पेट्रोल पंप आहेत. जर प्रत्येक पेट्रोल पंपा मागे विचार केल्यास नुकसानीचा आकडा करोडोंच्या घरात जाईल.”

सांगली जिल्ह्यातील पंपमालक पुरूषोत्तम पाटील यांनीही जवळपास असच मत नोंदवलं.

ते बोलभिडूसोबत बोलताना म्हणाले

” मागच्या काही वेळापासून शनिवारी भाव कमी करण्यात येत आहे. पेट्रोल पंप मालक शनिवार रविवार बँक हॉलिडे असल्याने दोन दिवसांचा साठा करून ठेवतात. आणि जेव्हा असे मोठ्या प्रमाणात भाव कमी होतात तेव्हा मग मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो. मला स्वतःला या भाव कमी करण्यानं ७ लाखांचा तोटा झाला आहे”

मागच्या दिवाळीतही केंद्र सरकारने पेट्रोलचे दर ५ रुपयाने तर डिझेलचे दार १० रुपयांनी कमी केले होते. 

त्यामुळं राज्यातला पेट्रोल पंपाचं २०० करोडच्या घरात नुकसान झाल्याचं सांगण्यात आलं होतं. याआधी पेट्रोल पंपधारकांनी भरपाईची मागणी केली होती. तर अली दारूवाला यांनी कमिशन वाढवून देण्याची मागणी केली आहे. ज्यामुळं त्यांना नुकसान भरून काढत येइल.

त्यामुळं आता सरकार पेट्रोल पंप धारकांसाठी कोणत्या उपाययोजना करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरेल.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

1 Comment
  1. Milind Waghmare says

    भाव कमी खुप कमीवेळा होतो पण वाढतो खुप वेळा. त्यामुळे पेट्रोल मालकांनी या पहिले भाव वाढीचे पैसे खुप वेळा कमावले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.