या पाच प्रकारे पेट्रोलपंपावर फसवलं जातं..?

या गोष्टी माहिती करून आपण शहाणे होवू शकतो. बऱ्याचअंशी आपली फसवणूक टाळू शकतो.

पेट्रोलपंपावर फसवणूक होणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. प्रत्येकाला कधीना कधी गंडवल्याचा अनुभव येतो. पुढच्याने करामतीने आपल्याला फसवल्याचं लक्षात आलं तरच आपण म्हणतो हा त्यांने गंडवले.

पण अशा फसवणूकीचे १०० टक्के गुन्हे गृहित धरले तर फक्त २० टक्के इतकच प्रमाण आहे जेव्हा आपल्या लक्षात येत की आपली फसवणूक झाली. इतर वेळी आपणाला हातचलाखी लक्षात देखील येत नाही.

यासाठी सावधानता फक्त शून्य पाहून घ्यायची नसते.

बऱ्याच गोष्टी असतात ज्याचा अंमल करून आपण शहाणे होवू शकतो.

त्यासाठी आपण पेट्रोलपंपचे काही नियम पाहूया. पेट्रोलपंपाचा एक मालक असतो आणि बाकीचे कर्मचारी. यातले काही कर्मचाऱ्यांकडे पंपावर उभा राहून पेट्रोल भरण्याची जबाबदारी असते. यात सर्वसाधारण काय नियम पाळला जातो तर समजा एखाद्या कर्मचाऱ्याने सकाळी १० ते संध्याकाळी ६ या त्याच्या कामाच्या वेळीत १० हजार रुपयांच पेट्रोल विकलं म्हणजे त्या मीटरवर १० हजार असा आकडा असला तर त्याने तो १० हजाराचा गल्ला मालकाला द्यायचा असतो.

पण पेट्रोलपंपावर असा नियम नसतो. इथे त्या कर्मचाऱ्यांने किती लिटर पेट्रोल सोडले त्याचा हिशोब द्यावा लागतो. म्हणजे या वेळेत त्याने १ हजार लिटर पेट्रोल सोडले तर त्या दिवशीच्या दराप्रमाणे मालकाकडे कॅश जमा करायची असते. 

साधारण याच गोष्टीचा फायदा कर्मचारी घेत असतात. कारण चूका केल्यानंतर जो पैसा येतो त्यावर पुर्ण अधिकार कर्मचाऱ्याचा राहतो मग ते पैसे कमी भरोत अथवा जास्त.

पेट्रोलपंपावरचे मालक दोन प्रकारचे गुन्हे करतात. एकतर पेट्रोल डिझेलमध्ये भेसळ करतात अन्यथा मापात पाप करतात. हे गुन्हे आपल्याला सहसा पकडता येत नाही. पण कर्मचारी करत असणारे हातचलाखी आपण पकडू शकतो.

१) 100 रुपये 200 रुपये पद्धतीने मिटर सेट करुन ठेवणे.

बरेच जण सांगतात १०० रुपये, २०० रुपये या पद्धतीने मीटर सेट करुन ठेवले जाते. म्हणजे तुम्ही १२१ रुपयांचे पेट्रोल टाकले तर ते १२१ रुपयांचेच येते मात्र १०० रुपयांचे टाकले तर ती रक्कम ९० ला सेट केलेली असते. २०० रुपयांचे १८० ला सेट केलेली असते. अशा पद्धतीने पेट्रोल कमी मिळते.

आम्ही याबद्दल अधिक माहितीसाठी पेट्रोलपंपाच्या मालकांना फोन लावला तेव्हा त्यांनी सांगितलं की, आत्ता नवीन मशीन्स आल्या आहेत. या मशीन सील असतात. त्यात फेरफार करता येत नाही. मात्र अशी फेरफार केली जाते का तर त्यांनी होकार दर्शवला. त्यांच्या मते पेट्रोलपंपावर जेव्हा धाड पडते तेव्हा ५ लिटरच्या मापात पेट्रोल ओतण्यास सांगण्यात येते. लिटरचे प्रमाण पाहिले जाते. मात्र आकडा सेट करण्याचे काम पाहिले जात नाही.

आत्ता यात कितपण तथ्य आहे हा संशोधनाचा विषय असला तरी आपण कशाला १०० चं टाकायचं, १२० चं टाकलं तर चांगलच आहे. 

२) 500 चं सांगितल्यानंतर 100 च टाकणे व न ऐकल्यासारखं करून पुन्हा मीटर सुरू करणे.

समजा तुम्ही पाचशे, तीनशे, दोनशे अशी काहीही रक्कम सांगितली तर अनेकदा कर्मचारी १०० च पेट्रोल टाकतो आणि झालं म्हणून सांगतो. तुम्ही त्याला पुन्हा अहो पाचशे सांगितले होते म्हणून सांगता. त्यावेळी तो १०० पासून पुढे टाकण्यास सुरवात करुन ४०० ला थांबतो. तुम्ही म्हणता ४०० चं झाले तेव्हा तो पुर्वी १०० चं टाकल्याचं सांगतो.

या गर्दीत आणि गोंधळात तुमच गणित बासणात बसतं. तूम्ही ५०० रुपये देवून येता मात्र पेट्रोल चारशेचंच असत. दूसऱ्यांदा पेट्रोल टाकताना तो मीटर शून्य करत नाही. ५०० चं सांगितलेलं असं सांगण्यात आपला वेळ जात असतो तेव्हाच हे कांड होतं.

अशावेळी १०० चं टाकलं तर परत त्याला ५०० चं सांगितलेल अस सांगण्याच्या फंद्यात पडू नये. १०० रुपयेच देवून यावे. 

३) बोलण्यात गंडवणे.

बऱ्याचदा लोकांचा समज होतो जिथे गर्दी असेल तिथेच गंडवण्याचा प्रकार चालतो. पण पेट्रोल पंपावर गर्दी नसेल तूम्ही एकटाच असाल किंवा तुमच्या आसपास दूसरे गिऱ्हाईक नसेल तर तो क्षण कर्मचाऱ्यासाठी सुवर्णकाळ असतो. अशा वेळी तुमची स्पेंडर असली तर कर्मचारी कौतुक करतो. कधी तुमचा चष्मा तर कधी बॅग पाहून विषय काढतो. गाडीच्या पॅट्रोलटाकीचं टोपण गंजल आहे इथपासून डोक्यावर काहीतरी पडलय अस सांगून डोक्यावरून हात फिरवतो.

हे सगळं तुम्ही पेट्रोलचा सांगितलेला आकडा ऐकल्यानंतरच तो करतो. या क्षणात बोलण्यात फसवून त्याने पेट्रोलटाकण्यास सुरवात केलेली असते. मीटरवरचा शून्य आकडा देखील आपण पाहिलेला नसतो. पुर्वीच्याच आकड्यापासून पेट्रोल सोडण्यात येते. आणि आपण फसतो. 

४) हवा मारणे.

दिर्घ पल्याच्या पेट्रोलपंपावर हा प्रकार सहज चालतो. चारचाकी असल्यानंतर हा घोळ सहज केला जातो. दिर्घ पल्यावर बऱ्याच वेळा कुटूंब, सहली असतात. एकमेकांसोबत गप्पा मारण्यात सगळे गुंग असतात. अशा वेळी पेट्रोलपंपावर गाडी जाते. दोन हजाराची नोट देवून पाचशेचं मागितलं किंवा कार्ड स्वॅप करायला सांगितलं तर कर्मचारी पेट्रोलचे नळी गाडीमध्ये सोडत पण मीटर सुरू करत नाही. तो कार्डच मशीन तरी आणायला जातो किंवा सुट्टे पैसे आणायला जातो. आपण गप्पात मग्न असतो त्यामुळे लक्ष जात नाही.

आल्यानंतर तो कार्ड मारून घेतो, सुट्टे पैसे देतो आणि नोझल काढून घेतो. इथे एक रुपयाचं पण पेट्रोल न टाकता तो फक्त नोझल सोडून तुम्हाला पैशांमध्ये गुंतवूण ठेवतो. गाडी पाच दहा किलोमीटर गेल्यानंतर पेट्रोल संपत आले की तुमच्या लक्षात येत अशा वेळी पेट्रोलसाठी पुन्हा गाडी वळवून मागं जाणं तुमच्याकडून शक्य नसतं. याचाच फायदा मोठ्या हायवेवरील पंपावर घेतला जातो.

५) दहा रुपयेची पुडी टाकतो.

मायलेज जास्त देणारी पुडी, PUC काढून देणारी गॅंग अशा गोष्टी हमखास मोक्याच्या क्षणी येत असतात. साधारण मिटरवर तूम्ही सांगितलेल्या रक्कमेचा आकडा टाकून पेट्रोल सोडतात. पण अशा वेळी नोझल दाबून पेट्रोल सोडल जातं. १०० चं सांगितलं असाल तर ६०-७० रुपये झाले की तुम्हाला एकतर PUC वाले विचारायला येतात किंवा पेट्रोल टाकणारा १० ची मायलेज जास्त देणारी पु़डी टाकू का विचारतो.

तुम्ही बोलण्यात गुंतता आणि ८० च्या दरम्यानच १०० चं पेट्रोल टाकल्याचं डिक्लेर केलं जातं. 

तुम्हाला वेगळ्या पद्धतीने फसवल्याचा अनुभव आला असल्यास नक्कीच कमेंटबॉक्समध्ये सांगा आणि लोकांना शहाणे करा. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.