ड्रग्सची तस्करी सोडा, आता भारताच्या सीमेवरून कफ सिरपचीही तस्करी सुरूय!

भारताचं सैन्य देशाची शान आहे. या सैन्याचे अनेक वेगवेगळे दल असतात. यातीलच एक सैन्य दल म्हणजे सीमा सुरक्षा दल (बीएसएफ). भारताच्या बॉर्डरची देखरेख करणं, तिथे होणाऱ्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणं अशा कामांसोबतच अवैधरित्या होणारी तस्करी रोखणं, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं हे देखील या दलाचं मुख्य काम सध्या झालं आहे. कारण खूप मोठ्या प्रमाणात कोणत्या ना कोणत्या वस्तूंची तस्करी करण्याचे प्रकार वाढले आहेत.

अलीकडेच आलेला पुष्पा चित्रपट अशाच तस्करीवर आधारित आहेत. यात रक्तचंदनाच्या लाकडाची तस्करी दाखवली आहे. खऱ्या आयुष्यातील घटनांवरूनच असे चित्रपट केले जातात. अगदी वेगवेगळ्या पदार्थांची तस्करी केली जात असते, म्हणून हा मुद्दा बीएसएफसमोर खूप मोठं आव्हान झालं आहे. 

आतापर्यंत गायी-गुरांची आणि इतर अमली पदार्थांची तस्करी केली जायची जिच्यावर आळा बसवण्यात बीएसएफला काही प्रमाणात यश आलं होतं. मात्र आता परत कोडीन आधारित खोकल्याचे औषध (कफ सिरप) ‘फेन्सीडील’ याची तस्करी हे एक नवीन आव्हान भारत-बांग्लादेश सीमेवरील सीमा रक्षक दलांसमोर उभं राहिलं आहे. नुकतंच घडलेल्या एका प्रकरणावरून हे स्पष्ट झालं आहे. 

१४ फेब्रुवारी रोजी, बीएसएफच्या जवानांनी पश्चिम बंगालच्या उत्तर १४ परगणा जिल्ह्यातील ‘हकीमपूर’ सीमा चौकीजवळ तस्करी केल्या प्रकरणी दोन तरुणांना अटक केलीये. 

बीएसएफने दिलेल्या निवेदनात असं सांगण्यात आलं आहे की, मुस्ताकीन शेख आणि शाहीन सरदार हे १९ आणि २१ वर्षांचे दोन स्थानिक तरुण गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये गुंतलेले होते. त्यांच्या ताब्यातून फेन्सीडीलच्या ६० बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत. ज्याची वाहतूक करण्यासाठी त्यांना ५०० रुपये मिळणार होते.

शिवाय बीएसएफने हे देखील सांगितलं की, २०२२ च्या पहिल्या काही आठवड्यात, दक्षिण बंगाल फ्रंटियरने सीमा भागातील परिसरातून वेगवेगळ्या घटनांमध्ये प्रतिबंधित फेन्सीडील कफ सिरपच्या जवळपास ११३९ बाटल्या जप्त करण्यात आल्यायेत, ज्यांची अंदाजे किंमत २,१२,५९४ रुपये इतकी आहे. तर २०२१ मध्ये सुमारे १.६४ लाख फेन्सीडीलच्या बाटल्या जप्त केल्या असून २०२० मध्ये २.९९ लाख बाटल्या आणि २०१९ मध्ये १.९८ लाख बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या.

मग एक प्रश पडतो, का इतक्या मोठ्या प्रमाणात या कफ सिरपची तस्करी केली जातेय?

बीएसएफ अधिकाऱ्यांनी याबद्दल माहिती दिलीये. बांगलादेश हा बहुसंख्य मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे. आपल्याला माहीतंच आहे की, मुस्लिमांच्या धार्मिक श्रद्धेनुसार दारू पिण्यास मनाई आहे. अशात नशा करण्यासाठी तिथले लोक इतर उपायांचा अवलंब करतात. यात कोडीन फॉस्फेट असलेलं  कफ सिरप त्यांना मदत करतं. त्यामुळे लोक याचा नशा करतात.

या परिस्थितीत, त्यांना हे द्रव्य भारतातून पोहोचवलं जातं. कारण त्याचे चांगले पैसे मिळतात. फेन्सीडीलच्या एका बाटलीची किंमत भारतात सुमारे २०० रुपये आहे तर सीमा ओलांडल्यानंतर त्याची किंमत हजारोपर्यंत जाते. म्हणूनच याची तस्करी करण्याचं प्रमाण वाढलं आहे. 

असं असलं तरी भारतातून तुलनेने याची कमी प्रमाणात तस्करी होते. मात्र हीच बाब बीएसएफसाठी आव्हान बनतेय कारण यामुळे तस्करी रोखणं कठीण जातं. शिवाय अजून एक कारण म्हणजे स्थानिकांकडून वेगवेगळ्या पद्धतीने तस्करी करण्याचे फंडे वापरले जातात. गेल्या काही वर्षांत, बीएसएफने फेन्सीडील तयार करणारे कारखाने बंद केले आहेत. तरीही काही वेळा शेतकरी त्यांची तस्करी करतात, तर काही वेळा लोक ते सीमेच्या पलीकडे असलेल्या कुंपणावर फेकतात.

शाहिद कपूरचा ‘उडता पंजाब’ हा चित्रपट बघितला आहे? यामध्ये भारतातुन ड्रग्सची तस्करी कशी केली जाते हे दाखवलंय. अगदी चित्रपटाचा पहिलाच सीन आहे ज्यात दाखवलंय की शेतातून लोक ‘गोळाफेकी’चं कौशल्य वापरत पंजाबच्या सीमेवरून दुसऱ्या देशात ड्रग्स पावडरची पाकिटं फेकतात. अगदी हीच पद्धत फेन्सीडीलची तस्करी करण्यासाठी वापरली जाते. 

तर फेन्सीडील बरोबरच अजून एका औषधाची तस्करी देखील केली जाते. ते म्हणजे ‘याबा गोळ्या’

याबा गोळ्या मोठ्या प्रमाणात तस्करी केलं जाणारं आणखी एक अंमली पदार्थ आहे. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, या गोळ्या सहसा म्यानमारमधून आणल्या जातात आणि बांगलादेशातून भारतात येतात. याबा हे मेथॅम्फेटा माइन आणि कॅफिनचे मिश्रण आहे. लाल किंवा गुलाबी गोळ्या म्हणून हे विकलं जातं जे  मध्यवर्ती मज्जासंस्थेला उत्तेजक (stimulant to the central nervous system) म्हणून काम करतं.

२०२१ मध्ये, BSF दक्षिण बंगाल फ्रंटियरने सुमारे १४,१४७ गोळ्या भारतात तस्करी केल्या जात असताना जप्त केल्या. याच सीमेवर २०१९ मध्ये ५३,७६३ याबा गोळ्या जप्त केल्या होत्या.

आता फेन्सीडील प्रकरणी बीएसएफला यश आलं आहे. अटक करण्यात आलेले तस्कर आणि जप्त केलेल्या फेन्सीडीलच्या बाटल्या पुढील कायदेशीर कारवाईसाठी संबंधित कस्टम कार्यालय/पोलीस स्टेशनकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. तर दक्षिण बंगाल फ्रंटियर बीएसएफचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी आणि डीआयजी सुरजित सिंग गुलेरिया यांनी “आपल्या सैनिकांच्या नजरेतून कोणतीही गोष्ट लपून राहू शकत नाही, कोणत्याही परिस्थितीत आपल्या परिसरातून तस्करी होऊ देणार नाही”, असं स्पष्ट शब्दांत सांगितलंय. 

तस्कराशी संबंधित अचूक माहिती देण्यासाठी त्यांच्याकडे उत्कृष्ट टीम असल्याचंही त्यांनी सांगितलं. मग काय, आता भारतीय सैन्याचे बोल म्हणजे लोड घेण्याचं काहीच कारण नाही. 

पण तरीही अनेक प्रश्न यावरून समोर येत आहेत. अशा प्रकारच्या तस्करी वाढत आहेत ज्यात अगदी तरुण तसंच नाबालिक मुलं सापडत आहेत, तर भारताची तरुण पिढी कुठे जातेय? फक्त पैसे हेच एक कारण आहे का, ज्यामुळे हे काम करण्यास प्रवृत्त होतात? सैन्य तर त्यांचं काम करत आहे मात्र अशा मुलांपर्यंत योग्य मार्गदर्शन पोहोचवण्यात सरकार, शिक्षण व्यवस्था कमी पडत आहे का? आणि अजूनही एकातून एक प्रश्न निघतंच आहेत, ज्यांची उत्तरं शोधणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.