फुलनदेवीच्या आत्मसमर्पणासाठी एका अधिकाऱ्याने स्वतःच्या मुलाचा जीव पणाला लावला होता !

चंबळ नदीचं खोरं म्हणजे डाकुंचं साम्राज्य!

सिनेमामधून किंवा वृत्तपत्रांमधून चंबळमधल्या थरारक घटनांच्या स्टोऱ्या आपण ऐकलेल्या असतात. आजही दुर्गम असलेल्या या भागातून प्रवास करायचा झाला तर जीव मुठीत धरून जावं लागतं. अशा ह्या चंबळच्या खोऱ्यात फुलनदेवी नावाच्या १६ वर्षाच्या पोरीनं स्वतःची गँग बनवली होती. अनेक खुंखार डाकू सुद्धा तिच्या नावाने थरथर कापायचे.

एका दलित कुटुंबात जन्मलेली फुलनदेवी ११ व्या वर्षी लग्न करून नांदायला गेली. काही दिवसातच तिला नवऱ्यानं टाकलं. घरच्यांनी परत घेतलं नाही. गावातल्या ठाकुरांनी  तिच्यावर ७ दिवस सामूहिक बलात्कार केला. पोलिसांकडे न्यायासाठी गेल्यावर त्यांनी देखील तिच्यावर अत्याचार केले. शेवटी हातात बंदूक उचलण्याशिवाय तिला तरणोपाय उरला नाही. इतक्या लहान वयात एवढं काही सोसल्यामुळे ती खूप क्रूर बनली.

काहीच वर्षात चंबळच्या जंगलावर तीचं राज्य सुरू झालं. तिच्यावर बलात्कार केलेल्या गावातल्या २२  ठाकुरांना तिने ओळीने उभं करून गोळ्या घातल्या. फुलनदेवीच्या दहशतीची कहाणी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापर्यंत पोहचली. तिला पकडण्यासाठी उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश पोलिसांमध्ये चढाओढ निर्माण झाली. मात्र फुलन काही कोणाच्या हाती लागत नव्हती.

शेवटी मध्यप्रदेश सरकारने तिच्यापुढे आत्मसमर्पण करायचा प्रस्ताव ठेवायचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री अर्जुनसिंग यांनी आपल्या विश्वासातल्या राजेंद्र चतुर्वेदी नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती चंबळच्या खोऱ्यात SP म्हणून केली.

अतिशय बेरकी आणि धाडसी अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चतुर्वेदी यांनी फुलनदेवीची भेट मिळवली. कोणतेही शस्त्र न घेता दऱ्या-खोरे-नद्या ओलांडत ते एकटे फुलनला भेटायला गेले. खूप पायपीट केल्यावर एका अज्ञात ठिकाणी त्यांची फुलनदेवीशी भेट घालून देण्यात आली. तिला आत्मसमर्पणाचा प्रस्ताव समजावून सांगण्यात आला. फुलनदेवीचा पोलिसांवर विश्वास नव्हता.

फुलन चतुर्वेदींना म्हणाली ,”चाहु तो मै तूम्हे गोली मार सकती हुं.”

 

हे ही वाचा –

चतुर्वेदींनी तिला सोबतचा कॅमेरा दाखवला. त्यात घेतलेले तिच्या नातेवाईकांचे फोटो दाखवले. फुलनला त्यांच्या सुरक्षिततेची काळजी लागून राहिली होती. चतुर्वेदींनी फुलनचे देखील फोटो काढले. त्यांनतर ती खुलली. आपल्या हाताने बनवलेल्या भाकऱ्या त्याना खाऊ घातल्या. मात्र आत्मसमर्पणासाठी ती अजून साशंक होती. खात्रीसाठी तिने आपल्या माणसाला चतुर्वेदींसोबत मुख्यमंत्र्यांना भेटायला पाठवलं.

पुढच्या काळात चतुर्वेदी अनेकदा फुलनला भेटले. फुलनचा विश्वास जिंकण्यासाठी एकदा तर आपली बायको आणि आणि लहान मुलाला घेऊन ते तिला भेटायला गेले. ह्या भेटीबद्दल फुलनदेवीने आपल्या आत्मचरित्रात खूप प्रेमाने उल्लेख केला आहे. आपल्या सुंदर बायकोला आणि लहान मुलाला त्यांचा जीव धोक्यात घालून असल्या दुर्गम ठिकाणी आणल्यामूळे फुलनदेवीचा चतुर्वेदींवर पूर्ण विश्वास बसला. असंही सांगितलं जातं की चतुर्वेदी यांनी फुलनला “आपका मुझ पर यकीन नही हो तो, आप मेरा इकलोता बेटा आपके पास रख सकते हो” असं देखील सांगितलं होतं.

चतुर्वेदींच्या प्रयत्नांना यश आलं आणि फुलन काही अटींनीशी आत्मसमर्पणाला तयार झाली. ती सुद्धा पोलीस आणि शत्रू गँग यांच्यापासून पाठशिवणीचा खेळ करून दमली होती. तिला देखील आपल्या जीवाची हमी हवी होती. त्यानंतर राजेंद्र चतुर्वेदी यांनी इंदिरा गांधींची भेट घेतली. इंदिराजींच्या सहमतीने आत्मसमर्पणाची तारीख ठरवण्यात आली.

१२  फेब्रुवारी १९८३.

फुलनदेवी आपल्या साथीदारांसह शरण आली. तिला बघायला तुफान गर्दी झाली होती.

डोक्याला लाल रुमाल बांधून आलेल्या फुलनदेवीने सर्वांसमोर मुख्यमंत्र्याच्या पायावर आपली रायफल ठेवली. त्यांना आणि जनतेला प्रणाम केला. दुर्गामातेसमोर नतमस्तक झाली.

एक धगधगते रक्तरंजित वादळ काबूत आले होते. पुढची ११ वर्षे तिला जेलमध्ये ठेवण्यात आलं. त्यांनतर मुलायमसिंग सरकारने फुलनवरचे सगळे गुन्हे माफ केले. समाजवादी  पक्षाकडून ती लोकसभेची खासदार बनली. पुढे तिची लोकप्रियता वाढू लागल्यावर ठाकूर समाजातील एका माणसाने तिचा खून केला. असं म्हणतात की तिची राजकीय महत्वाकांक्षा वाढल्यामुळेच तिचा काटा काढण्यात आला. ‘दस्यु सुंदरी’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या फुलनदेवीवर ‘बँडीट क्वीन’ नावाचा सिनेमा देखील प्रदर्शित झाला.

हे ही वाचा – 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.