सायको जयशंकर दोन वेळा पोलिसांच्या तावडीतून निसटला पण शेवटी जेलमध्ये येऊन सुसाईड केली

रोज घडणाऱ्या हत्या आणि त्यांचे न लागणारे तपास, रोज अनेक लोकांच्या हत्या घडतात त्याकडे कोणाचं जास्त लक्ष जात नाही मात्र एखाद्याच दिवशी एखादा गुन्हेगार पुढे येतो आणि त्याने एकट्यानेच बरेच मर्डर केलेले असतात. असाच आजचा किस्सा आहे, या घटनेतल्या सायको किलरने तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये जबर दहशत बसवली होती.

तर हा सायको किलर होता एम. जयशंकर. तामिळनाडूच्या कनियनपट्टी सारख्या खेड्यातून हा जयशंकर आलेला होता. त्याच लग्न होऊन त्याला ३ मुली होत्या आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जयशंकर ट्र्क ड्रायव्हर म्हणून काम करायचा. 

२००८ पासून मात्र त्याच वागणं बदललं. त्याचा पहिला गुन्हा उघडकीस आला तो ३ जुलै २००९ रोजी. यात त्याने एका ४५ वर्षीय महिलेचा बलात्कार करून तिची हत्या केली होती. तो सायको म्हणून जरी प्रसिद्धीस आला तरी त्याच्या हालचाली आणि हत्येच्या तयाऱ्या एकदम थंड डोक्याने केलेल्या असायच्या. एक काळी पिशवी कायम त्याच्या सोबत असायची आणि त्या पिशवीत धारदार सुरा असायचा.

नाईट ड्युटीवर असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलला एम.जयशंकरने किडनॅप केलं पुढे तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या घडवून आणली. पुढे महिन्याभराने या लेडी कॉन्स्टेबलची बॉडी पोलिसांना मिळाली. आपल्या वेगळ्याच धुंदीच्या नादात जयशंकरने १२ महिलांवर बलात्कार करून त्यांचा खून केलेला आणि सहा महिलांवर अत्याचार केलेला. 

एम. जयशंकरच्या भीतीने आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकात महिला घराबाहेर पडायला धजावर नसायच्या. रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या वेश्याना तो टार्गेट करत असे आणि फार्म हाऊसवर नेऊन त्यांच्यावर तो अत्याचार करत असे.

पोलिसांच्या हाती तो दोन वेळेस लागला होता पण आपल्या विचित्र डोक्याने त्याने आयडिया लावून दोन्ही वेळेस पळून गेला होता. पोलिसांमधल्या एका पोलिसांकडून पैसे देण्याचं आश्वासन देऊन त्याने नकली चावी बनवून घेतली आणि एक काठी आणि चादरीच्या जोरावर त्याने जेलमधून हुशारीने पलायन केलं होतं.

२००८ ते २०११ या काळात त्याने तिन्ही राज्यांमध्ये एम.जयशंकर नावाने दहशत बसवली होती. आपल्या गुन्ह्यांची पूर्तता करण्यासाठी त्याला मराठी ,हिंदी, तामिळ, कन्नड अशा भाषा अवगत होत्या. भाषेच्या बळावर तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असे आणि आपली नियोजित योजना राबवत असे.

पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी जंग जंग पछाडले होते. पण एम. जयशंकर काय हाती लागत नव्हता. आधीच त्याने दोनदा पोलिसांना गुंगारा दिल्याने देशभरातून पोलिसांवर टीका होत होत्या. पोलिसांनी त्याला मोठ्या कसोशीने पकडलं होतं पण तो अशा परिस्थितसुद्धा जेलमधून पळून गेला होता.

तिसऱ्या वेळी मात्र जयशंकर पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला. इथे पोलिसांनी त्याच्यावर चांगलीच पाळत ठेवली. त्याच्या बारीकसारीक हालचालींवर लक्ष द्यायला सुरवात केली. तामिळनाडू आणि कर्नाटक मधील १५ हत्या आणि ३० रेप असे आरोप त्याच्यावर सिद्ध झाले आणि दहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. त्याच्या पायाला मोठी जखम आणि फ्रॅक्चर झालेलं होतं त्यासाठी सरकारने ७५ हजार खर्च केले होते. 

२७ फेब्रुवारी २०१८ ला जेलमध्ये त्याने आपल्या शर्टमधून एक ब्लेड काढलं, जे त्याने अटक झाली तेव्हा शर्टात एका ठिकाणी लपवून ठेवलेलं होतं. त्या ब्लेडनेच त्याने स्वतःच्या गळ्यावर वार करून घेतले आणि रक्तस्त्राव जास्त झाल्याने तो तिथेच मृत्युमुखी पडला. पोलिसांना तो रक्ताच्या थारोळ्यात सापडला.

अशा प्रकारे हे एम.जयशंकर प्रकरण देशाला हादरवणारं ठरलं होतं. पुढे २०१७ मध्ये एम.जयशंकरच्या प्रकरणावर सायको शंकर नावाचा कन्नड सिनेमासुद्धा आला होता. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.