पावसाळ्यात मराठवाड्यातल्या या 5 ठिकाणांना भेट द्या..तुम्हीही म्हणाल, “जन्नत”

मराठवाडा म्हणलं की, तुमच्या डोळ्यासमोर कोरडाठाक दुष्काळच दिसेल. मराठवाड्यात कुठं आलंय रम्य, हिरवंगार घनदाट जंगल? असा विचारही तुमच्या डोक्यात येऊन गेला असणार…थांबा असा विचार करून तुम्ही मराठवाड्यातील पर्यटन स्थळांना मुकाल.

आता ही लिहिणारी भिडू मराठवाड्यातली आहे म्हणून मराठवाड्याचं कौतुक करतेय असं नाहीये तर तुमचा इतिहास अन भूगोल थोडा जरी पक्का असेल तर तुम्ही मराठवाड्यातील काही स्थळं विसरूच शकत नाही.

मराठवाडा ही ऐतिहासिक वारसा लाभलेली भूमी आहे. मराठवाड्यात जिल्हे आहेत ८. औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली. या आठ जिल्ह्यांत आसपास बरीच लहान मोठी पर्यटनस्थळे आहेत.

पण त्याचं झालं असं की, सुरुवातीपासूनच मराठवाड्याचा अनुशेष भरून काढू अशा भरमसाठ आश्वासनांच्या नादात कोणत्याच सरकारांचं मराठवाड्यातल्या नैसर्गिक ठिकाणांकडे कधी लक्ष गेलंच नाही. अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे येथील पर्यटनस्थळे पर्यटनाच्या परीघ क्षेत्रातदेखील आलेली नाहीयेत….

पण बोल भिडू तुम्हाला सांगतंय मराठवाड्यात देखील अशी पर्यटन स्थळं आहे जी पावसाळ्यात फिरण्यासाठी बेस्ट आहेत. कोणती ?? तेच बघूया..

१. अजिंठा आणि वेरूळ

A weekenders trip to Ajanta-Ellora Daulatabad - Tripoto

मराठवाडा म्हणलं की, राजधानी औरंगाबादमध्ये असणाऱ्या अजिंठा आणि वेरूळ या पर्यटन स्थळांचा उल्लेख येतोच येतो. औरंगाबादला लेण्यांचा जिल्हा म्हणलं जातं. या दोन्ही ठिकाणांना १९८३ साली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचा दर्जा लाभलाय.  

वर्षाकाठी या लेण्यांना स्थानिक आणि परदेशी मिळून दहा लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात अशी नोंद आहे.  

अजिंठ्याला एकूण २९ लेण्या आहेत. या सर्व लेण्या विशेषतः बौद्ध धर्मातील हीनयान व महायान पंथीयांची असून इथे गौतम बुद्धांचे जीवनप्रसंग देखील कोरले आहेत. 

१९५१ मध्ये भारत सरकारने वेरूळच्या लेणीला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.  तर वेरूळचं वैशिष्ठय म्हणजे इथे हिंदू, बौद्ध आणि जैन लेणी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. पुराणातील शैव प्रतिमा आणि प्रसंग या लेण्यात कोरलेले आहेत. 

बोधिसत्वची मूर्ती आणि गौतम बुद्धांचे शिल्प, विश्वकर्माची लेणी प्रमुख मानली जाते. जैन मंदिरांची पाच-सहा गुहामंदिर देखील इथे आहेत. 

पर्वतावर शिव-पार्वती बसलेले आहेत आणि रावण तो पर्वत हलवत असताना एक लेणी आहे ज्यास कैलास लेणी असे म्हणतात. ही लेणी अतिशय भव्य आहे. 

तसेच इथे जैन मंदिरांची पाच-सहा गुहामंदिर आहेत. त्यात तुम्ही इंद्रसभा, छोटा कैलास, जगन्नाथ सभा पाहू शकता.जैन तीर्थंकर पार्श्वनाथ याची भव्य मूर्ती आहे. त्याचबरोबर इंद्र, गोमटेश्वर बाहुबली, भगवान यांच्या मूर्ती आहेत.

वेरूळ-अंजिठ्याला कसं जायचं ?

अजिंठा लेणी ही औरंगाबाद शहरापासून जवळपास ९० किलोमीटर अंतरावर सोयगाव तालुक्यात आहे. तर वेरूळ लेणी औरंगाबाद शहरापासून २७ किलोमीटर अंतरावर आहे.

रेल्वे, एसटीमार्फत तुम्ही औरंगाबादपर्यंत जाऊ शकताय. औरंगाबादहुन तुम्हाला खास अजिंठा-वेरूळच्या बस देखील मिळतात. अजिंठा वेरूळ लेणी पाहण्याची सर्वात बेस्ट वेळ म्हणजे पावसाळा. राष्ट्रीय सुट्टयांचे दिवस सोडून इतर दिवशी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या लेण्यांना तुम्ही बेत देऊ शकता. 

२. नाथसागर 

Image of जायकवाडी  धरण

म्हणजेच औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीवर बांधलेले जायकवाडी धरण. या धरणाचं  वैशिष्ठय एका वाक्यात सांगायचं तर, आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी ख्याती या जायकवाडी धरणाची आहे.

या धरणाच्या बांधकामाला १९६५ ते १९७६ अशी जवळपास ११ ते १२ वर्षे लागली होती..  

हे धरण एकदा का भरलं तर दोन वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि ४ वर्षांच्या पिण्याची पाण्याची सोय होऊन जाते. या नाथसागरावर मराठवाड्यातील तब्बल ५ जिल्हे अवलंबून असतात. औरंगाबाद, बीड, जालना, परभणी आणि नांदेड. यावरूनच तुम्ही या धरणाच्या विशालतेची कल्पना करू शकता..म्हणून या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र समजला जातो..

या नाथसागरची आणखी एक ओळख म्हणजे रंगी-बेरंगी पक्षांचं आश्रयस्थान असलेलं जायकवाडी पक्षी अभयारण्य. हजारो किलोमीटरचा प्रवास करत देश-विदेशातील ३०० हून अधिक प्रजातीचे पक्षी या पक्षी अभयारण्यात येतात. 

दुसरं म्हणजे पैठण, 

वारकरी संप्रदायात पैठणची वारी करणारे वारकरी आजही आहेत. इथे संत एकनाथ यांचे जन्मस्थान आहे. इथेच त्यांचं समाधीस्थळ देखील आहे. वारकरी संप्रदायाइतेकच महानुभावी पंथ व जैन धर्मीयही पैठणला तीर्थस्थान म्हणून मानतात. तसेच पैठणमध्ये संत ज्ञानेश्वर उद्यान आहे, तसेच इथे जगप्रसिद्ध पैठणी, हिमरू शाली देखील मिळतात..त्यामुळे इथे तुमची खरेदी देखील होते.  

तर पैठण आणि नाथसागरला कसं जायचं ?

तर इथे जाण्यासाठी तुम्हाला औरंगाबादपर्यंत रेल्वे आणि बसेसची सुविधा आहे. औरंगाबाद शहरापासून पैठण ८४ किलोमीटर अंतरावर आहे. इथे जाण्यासाठी तुम्हाला औरंगाबादमधून खाजगी गाड्या आणि लक्झरी बसेस उपलब्ध आहेत.

३. म्हैसमाळ.

Screenshot 2022 07 16 at 4.32.27 PM

म्हैसमाळ म्हणजे मराठवाड्याचे ‘महाबळेश्वरच ! म्हैसमाळ सह्याद्री पर्वतरांगाचा सर्वात पूर्वेकडचा भाग. इथे निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तूंचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. विविध प्रकारच्या वनस्पती, वेगवेगळ्या सुंदर फुलांचे प्रकार पहायाला मिळतील. थोडक्यात वनस्पतिशास्त्राची येथे जणू प्रयोगशाळाच. 

पावसाळ्यात तर येथील डोंगर- दऱ्यांमध्ये पसरलेला हिरवा गालिचा अन् पायाशी लोळणारे ढग हे डोळ्याचे पारणे फेडतात. वर्षभरात तुम्ही कधीही आलात तरीही इथे किमान तापमान साधारणपणे ७ अंश सेल्सिअसपर्यंत असतं.  

म्हैसमाळ शिवाच्या एका जुन्या मंदिराच्या अवशेषाचेही ठिकाण त्यामुळे याचं नाव महेशमाळ असं होतं अपभ्रंश होत म्हैसमाळ नाव पडलं. पठारावर गिरजा देवीचे मंदीर, बालाजी मंदीर आहे. इथून घृष्णेश्वर मंदीर १४ किलोमीटर अंतरावर आहे तर खुलताबादेतील भद्रा मारोती मंदीर १२ किलोमीटरवर अंतरावर आहे. आणि औरंगाबाद- म्हैसमाळ मार्गावरच दौलताबादचा किल्ला आहे. तोही तुम्ही पाहू शकता..

तर म्हैसमाळला कसं जायचं ? 

म्हैसमाळला येण्या- जाण्यासाठी औरंगाबादपर्यंत रेल्वे आणि बसची व्यवस्था आहे. औरंगाबादपासून म्हैसमाळ ३६ किलोमीटर आहे. त्यासाठी औरंगाबादेतून आधी खुलताबाद यावे लागते, इथून म्हैसमाळ १२ किलोमीटर असून खासगी गाड्या आणि बसेस असतात. 

४. सहस्त्रकुंड

Top 20 Tourist Attraction in Islapur - Best Places to Visit - Justdial

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लापूर गावातील पैनगंगेवरचा हा सहस्रकुंड धबधबा. या धबधब्याचं वैशिष्टय म्हणजे धबधब्याच्या अलीकडे मराठवाड्याची जमीन आणि धबधब्याच्या पलीकडे विदर्भाची जमीन. 

नांदेड जिल्ह्याला कर्नाटक आणि तेलंगाणा अशा दोन राज्यांच्या सीमा लागतात, त्यामुळे हा सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी विदर्भ, मराठवाड्यासोबतच आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकातून देखील पर्यटक येत असतात. 

या सहस्रकुंड धबधब्याच्या काठावर असलेलं पंचमुखी महादेव मंदिर म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान. ते महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध आहे. तसेच काठावर असणारा सुंदर बगीचा, येथील जंगल, वन्य प्राण्यांचे वैविध्य आणि विविध प्रजातींचे फुलपाखरे देखील पाहायला लोकं गर्दी करतात. 

इथून ५० किलोमीटर अंतरावर असलेला माहूर तालुक्यात देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी मूळ जागृत पीठ माहूरच्या रेणुकामातेचं मंदिर आहे.

तर सहस्रकुंड धबधब्याला कसं जायचं ? 

नांदेडहून जवळपास १५० किलोमीटर अंतरावर हे सहस्त्रकुंड स्टेशन आहे.  स्टेशनपासून फक्त ५ किमी अंतरावर सहस्त्रकुंड ठिकाण आहे. ज्यासाठी ऑटो-रिक्षा उपलब्ध असतात.

५. सौताडा धबधबा

Sautada Waterfall - Tourist attraction in Velur, India | Top-Rated.Online

मांजरा, सिंदफणा, बिंदुसरा, डोमरी आणि विंचरणा या नद्यांचे उगमस्थान बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातून होते.. पाटोदा तालुक्यातील डोंगराळ परिसरात उगम पावणारी विंचरणा नदी वाहत जाऊन पुढे सौताडा येथे सुमारे सत्तर मीटर उंचीवरून दरीत कोसळते…याच दरीत भगवान राम आणि सीता यांनी महादेवाचे ‘रामेश्वर’ मंदिर बनवले अशी आख्यायिका आहे..आणि हेच ठिकाण म्हणजे हेच सौताडा धबधबा….

जर तुम्हाला शांत वातावरणात एक दिवस जगायचा असेल तर, सौताडा धबधबा हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य आहे.

सौताडा धबधब्याला कसं जायचं ? तर हे ठिकाण अहमदनगर आणि बीड जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. इथे जाण्यासाठी तुम्हाला जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे अहमदनगर आणि पोपली. तसेच तुम्ही थेट बीडपर्यंत बसेस मार्गे जाऊ शकता आणि बीड शहारावरून ४० किलिमीटर अंतरावर हे ठिकाण आहे आणि त्यासाठी तुम्हला खासगी गाड्या तिथे उपलब्ध असतात. 

तर ही झालीत निवडक ५ ठिकाणं…जिथे तुम्ही पावसाळ्याच्या सिझनमध्ये जाऊन निसर्गाचा आनंद लुटू शकता.. 

बरं हे एवढेच नाही तर याव्यतिरिक्‍त मराठवाड्यात महत्वाची पर्यटन स्थळं आहेत. ज्यात घृष्णेश्‍वर मंदिर, खुलताबाद, दौलताबाद चा देवगिरी किल्ला, पैठण, बीबी का मकबरा, पाणचक्की, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, औरंगजेबची कबर, मलिक अंबरची कबर, ऐतिहासिक ५२ दरवाजे, कंधारचा भुईकोट किल्ला, अंबाजोगाईच्या शिवलेणी, कपिलधार धबधबा, धारूरचा किल्ला, बिंदुसरा उद्यान, तुळजाभवानी मंदिर, नळदुर्ग किल्ला अशी अनेक ठिकाणं मारवाड्यातल्या जिल्ह्यात आहेत मात्र पुरेशी वाहतूक सुविधा, रस्ते व्यवस्थित नसल्यामुळे आणि मार्केटिंग झालेली नसल्यामुळे पर्यटक इकडे फिरकतच नाहीत.

मात्र आम्ही सांगितलेली ठिकाणं तुम्ही नक्की फिरून बघा…तुम्हीही म्हणाल काय “जन्नत”

 हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.