माणसामध्ये डुकराचं हृदय बसवल्यामुळे भिडूंना अनेक प्रश्न सतावतायत

मानवी शरीरातील अवयवांचे ट्रान्सप्लांट करणं ही गोष्ट आता नवीन राहिलेली नाहीये. अनेक जण अवयव दान करताना दिसतात. पण कधी प्राण्याचे अवयव मानवी शरीरात ट्रान्सप्लांट करण्यात आले असं ऐकलं की हे अशक्यच वाटतं. अनेकांच्या भुवया उंचावल्या जातात. सोशल मीडियावर अशीच एक बातमी सध्या खूप धुमाकूळ घालताना दिसते आहे. एका माणसाच्या शरीरात डुकराचं हृदय बसवण्यात आल्यानं एकंच आश्चर्याची लाट जगभरातील लोकांमध्ये पसरली आहे.

असं होणं शक्य आहे का ? माणसामध्ये प्राण्याचे अवयव कसे काम करू शकतात ? कुठे घडली याआधी अशी घटना ? याचीच उत्तर जाणूनच घेऊया…

काय आहे सध्याची घटना ?

ही घटना घडली आहे अमेरिकेमध्ये. अमेरिकेतील डॉक्टरांनी अनुवांशिकदृष्ट्या सुधारित डुकराचे हृदय ५७ वर्षांच्या व्यक्तीमध्ये यशस्वीरित्या प्रत्यारोपित केले आहे. यूनिवर्सिटी ऑफ मैरीलैंड मेडिकल स्कूल यांनी याबद्दल अधिकृत माहिती दिली आहे. या ५७ वर्षीय व्यक्तीचं नाव आहे डेव्हिड बेनेट. डेव्हिड बेनेटची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे त्यांचा जीव वाचवण्यासाठी जनुकीय सुधारित डुकराचे हृदय प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

डेव्हिडच्या प्रकृतीत आता सुधारणा होत असून नवीन अवयव कसे काम करत आहेत यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. बेनेट यांच्यात डुकराचे हृदय प्रत्यारोपण करणारे डॉ. बार्टले ग्रिफिथ म्हणाले की, हृदयाच्या शस्त्रक्रियेतील ही एक मोठी प्रगती आहे. त्यामुळे अवयवदानाच्या समस्येवर मात होण्यास मदत होणार आहे.

माणसामध्ये डुकराचे अवयव ट्रान्सप्लांट करणे कसे शक्य आहे?

तर डुकराचे अवयव मानवी शरीरात ट्रान्सलेट करण्याला ‘झेनोट्रांसप्लांटेशन’ असे म्हणतात. अशा प्रकारच्या सर्जरी करण्यासाठी आतापर्यंत केवळ डुक्कर या एकाच प्राण्याची निवड करण्यात आली आहे. डुक्कर मानवांपासून अनुवांशिकदृष्ट्या वेगळे असतात, परंतु त्यांचे अवयव समान आकाराचे असतात आणि त्यांची पैदास करणे सोपे असते, म्हणूनच ते झेनोट्रांसप्लांटेशनचे लक्ष्य बनले आहेत.

असा प्रकारच्या सर्जरीसाठी मानवांशी काही अनुवांशिक समानता असलेल्या डुकरांची पैदास केली जाते. शास्त्रज्ञ त्यांना ‘गॅलसेफ डुक्कर’ म्हणतात. या डुकरांच्या लिव्हर, किडनी आणि हृदयामध्ये पाच मानवी जीन्स जोडली जातात. ज्यामुळे या अवयवांची कापणी केली जाऊ शकते आणि प्रत्यारोपणासाठी वापरली जाऊ शकतात. शिवाय मानवी शरीरे त्यांना नाकारणार नाहीत.

पण यात एक समस्या आहे. सस्तन प्राण्यांच्या अवयवांमध्ये अगदी लहान फरकांमुळे मानव डुकराचे अवयव नाकारू शकतात. डुकरांसह बहुतेक सस्तन प्राणी अल्फा-गॅल नावाची साखर तयार करतात जे मानवांमध्ये तयार होत नाहीत. हे प्रभावी प्रत्यारोपणात अडथळा म्हणून काम करू शकतात. परंतु अल्फा-गॅल तयार न करण्यासाठी डुकराच्या किडनीमध्ये अनुवांशिकरित्या बदल केले जातात. ज्यामुळे हा धोका टाळू शकतो.

याआधी अशा सर्जरी झाल्या आहेत का?

होय. याआधी मानवी शरीरामध्ये डुकराची किडनी ट्रान्सप्लांट करण्याच्या घटना घडल्या आहेत. न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत दोन वेळा डुकराची किडनी मानवी शरीरामध्ये बसवण्यात आल्या आहेत. सप्टेंबर २०२१ मध्ये पहिल्यांदा हे प्रत्यारोपण करण्यात आले, तेव्हा पेशंटला ब्रेन-डेड मानले गेले होतं. तर दुसरी सर्जरी नोव्हेंबर २०२१ मध्ये करण्यात आली. या केसमध्ये पेशंट पूर्णपणे व्हेंटिलेटरवर होता.

या प्रक्रियेत किडनीच्या कार्याची चाचणी घेण्यासाठी, शास्त्रज्ञांनी प्रथम पायाच्या वरच्या भागातील रक्तवाहिन्या जोडल्या. त्यानंतर ते संरक्षणात्मक कवचाने झाकले गेले आणि ५४ तास निरीक्षण केले गेले. निरीक्षणानंतर दिसून आलं की त्या व्यक्तीच्या शरीराने किडनी नाकारली नाही आणि ती सामान्यपणे कार्य करत असल्याचंही दिसलं.

मानवी शरीरात डुकराचं हृदय बसवण्यात आल्याची ही  घटना खरंच मेडिकल आणि विज्ञान क्षेत्राला प्रोत्साहन देणारी आहे. दरवर्षी कित्येक लोकांना अवयव न मिळाल्यामुळे आपला जीव गमवावा लागतो. पण आता अशा प्रकारच्या यशस्वी सर्जरी झाल्याने नवीन आशेची किरण दिसत आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.