त्यांचा केरळमध्ये उदय एका राजकीय खुनाच्या आरोपातून झाला..

२८ एप्रिल १९६९. केरळ मधील कन्नूर शहर. संध्याकाळची वेळ होती. कन्नूर च्या छोट्या छोट्या रस्त्यांवर हळूहळू शांतता पसरण्यास सुरवात झाली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्य शिक्षक वडिक्क्ल रामकृष्णन हे आपल्या घरी निघाले होते.

अचानक दोनशे लोकांचा तरुणांचा मॉब आला. हे सर्व कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते होते. यातील बरेच विद्यार्थी चळवळीतील नेते होते. जोरजोरात घोषणा करत आलेल्या कार्य्रकर्त्यांचा नूरच वेगळा होता. त्याकाळचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. या तरुणांनी रामकृष्ण यांच्या वर हल्ला केला. सुरवातीला वाटलं होतं कि फक्त मारहाण होईल. पण तेवढयावर भागलं नाही.

कार्यकर्त्यांपैकी काहीजण जास्तच आक्रमक होते. त्यांनी सोबत आणलेल्या कोयता कुऱ्हाडीचा वार करून रामकृष्ण यांना घायाळ केले. रक्ताचे पाट वाहत होते. असच उचलून रामकृष्ण यांना एका रिक्षात टाकण्यात आलं. 

अगदी काही मिनिटात हे सगळं घडून गेलं. आरएसएसच्या रामकृष्ण यांची हत्या शेकडो लोकांच्या समोर  झाली होती. मात्र कम्युनिस्ट पक्षाचं कन्नूर मध्ये वजन एवढं होतं की कोणीही काहीही बोलू शकले नाही. तरीही पोलिसांनी दोन जणांवर केस दाखल केले.

एम.व्ही.राजगोपालन नावाच्या नेत्याने हा हल्ला घडवून आणल्याची दबक्या आवाजात चर्चा होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल तर झालाच पण त्यांच्या सोबत आणखी एका तरुण मुलाचं नाव या केसमध्ये होतं.

पिनारयी विजयन.

आज केरळचे मुख्यमंत्री असणारे विजयन तेव्हा २४ वर्षांचे होते. घरची परिस्थिती यथा तथाच होती. कॉलेजमध्ये जाण्यापूर्वी हातमागावर कामाला जायचे. थालासरीच्या सरकारी कॉलेजमध्ये इकॉनॉमिक्स शिकण्यासाठी ऍडमिशन घेतलं. कॉलेजमध्ये मार्क्स वाचला आणि डाव्यांच्या विद्यार्थि चळवळीकडे आकर्षित झाले.

वक्तृत्वावर पकड होती. व्यक्तिमत्व डॅशिंग होतं. त्यांना केरळ स्टुडन्ट फेडरेशनचा कन्नूर जिल्ह्याचा अध्यक्ष बनवण्यात आलं. हीच संघटना स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडिया यामध्ये रूपांतर करण्यात आली.  कन्नूर जिल्ह्यात काम करणाऱ्या तरुणांना एकत्र करून विद्यार्थी चळवळ मोठी करणाऱ्यांत विजयन यांचं नाव घेतलं जातं.

त्या दिवशी rss च्या रामकृष्णन यांच्यावर हल्ला झाला तेव्हा प्रत्यक्षदर्शी छातीठोकपणे सांगतात कि त्यांनी हातात कुऱ्हाड घेतलेल्या विजयन यांना स्पष्टपणे पाहिलं होत.

खरं तर दक्षिण भारतात डावे आणि हिंदुत्वाचा प्रचार करणारे संघ प्रचारक यांच्यातील संघर्ष १९४२ सालापासून सुरु होता. पण रामकृष्णन यांच्यावरील हल्ला हा सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या केरळ मधील पहिली राजकीय हत्त्या ठरली. असं म्हणतात कि तत्कालीन मुख्यमंत्री इ.एम.एस.नुबद्रीपाद यांनी आपलं सगळं राजकीय वजन पिनारायी विजयन आणि एम.व्ही.राजगोपालन यांच्या पाठीशी उभं केलं. कोणतेही साक्षीदार पुढे आले नाहीत आणि पुराव्या अभावी त्यांच्यावरील केस पोलिसांनी मागे घेतली.

मात्र या घटनेमुळे पिनारायी विजयन हे नाव केरळमध्ये सर्वां पर्यंत पोहचलं. त्यांच्यावर खोटे आरोप केले असल्याचं म्हणत डावे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे राहिले. विजयन यांना हिरो बनवण्यात आलं. विजयन हा केरळचा भविष्यातला मोठा नेता आहे याची चुणूक दाखवली गेली.

पुढच्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने त्यांना तिकीट दिल आणि ते भरघोस मतांनी निवडून देखील आले.

आज या घटनेला जवळपास ५० वर्षे उलटून गेली. पिनारायी विजयन हे गेली पाच वर्षे केरळचे मुख्यमंत्री आहेत. आजही भाजप त्यांच्यावर आरएसएसच्या कार्यकर्त्यांवर डाव्यांकडून हल्ला केले जातात अशी टीका करते. यंदाच्या निवडणुनीत अमित शहा जेव्हा केरळ मध्ये प्रचाराला आले होते तेव्हा त्यांनी आजवर डाव्यांनी खून केलेल्या संघ प्रचारकांची यादीच जाहीर केली होती.

अमित शहा व भाजपने केरळमध्ये प्रचंड प्रयत्न केले मात्र त्यांना अजूनही यश मिळालेले नाही.

संघाच्या कार्यकर्त्यांवर विजयन यांच्या कालखंडांत मोठे हल्ले झालेत हे नाकारणे शक्य नाही पण आरोप कितीही झाले तरी केरळची जनता आजही पिनारायी विजयन यांच्याच पाठीशी आहे. भाजप आणि कोन्ग्रेचा पराभव करून विजयन यांनी आपल्या लोकप्रियेतवर शिक्का मोर्तब केलाय. आजच्या निकालाच्या कलावरून तरी हेच दिसतंय.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.