नवरात्रीवेळी या मंदिरात बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश देत नवकन्येचे पुजन केले जाते

गणेशोत्सव संपतो ना संपतो तेच महाराष्ट्रात नवरात्रोत्सवास सुरुवात होते. देवीभक्त त्याच जल्लोषाने नवरात्र उत्सवाची तयारी करतात. नवरात्र उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे हा सण महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेडेगावात साजरा होतो.

आज प्रत्येक गावात, जिल्ह्यात, शहरात आपल्याला त्या त्या शहराची, गावाची व जिल्ह्याची कुलदैवता, देवी बघायला मिळते. बहुतांशी ठिकाणच्या देवी या स्वयंभू असतात. त्यांची स्थापना कधी झाली याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसते. पण कथेच्या माध्यमातून त्या आपल्यापर्यंत पोहोचत असतात.

आज अशाच एका देवीला आपण भेट देणार आहोत.

मोर्शी-अमरावती राज्य महामार्गावर अमरावतीपासून ३५ किमी.अंतरावर गोराळा हे गाव आहे. तेथून दीड किमी. अंतरावर निसर्गरम्य टेकडीवर पिंगळाक्षी देवीचे मंदिर आहे. मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई देवी गडाला विदर्भाचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते.ही देवी माहूरच्या रेणुका मातेचं प्रतिरूप आहे.

आदी शक्ती देवीच्या वेगवेगळ्या रूपातील सात स्थानांपैकी पिंगळाई देवी हे एक मानाचं स्थान आहे.

या देवीचे मंदिर कधी बांधले गेले याबद्दल ठोस असा पुरावा उपलब्ध नाही. पण हे मंदिर प्राचीन हेमाडपंथी शैलीचं बांधकामात बांधलेले असून हे मंदिर ५०० ते ६०० वर्षापूर्वीचं असल्याचं समजतं.मंदिराच्या गाभाऱ्यात विशिष्ट पद्धतीचे हेमाड चक्र आहे.

अस म्हणतात की, फार पूर्वी एका राजाचे पोट दुखायला लागल्यामुळे या मंदिराच्या पुजार्‍याने देवीची आराधना केली आणि राजाला अंगारा लावला. तेव्हा त्या राजाचे दुखणे बरे झाले. म्हणून त्या राजाने देवी मंदिरात सभामंडप बांधून दिला.

मंदिराच्या प्रवेशाद्वारासमोरच एक दीपस्तंभ आहे. या स्तंभाला ‘निग्नेशिक सर्व्हे स्टँड’ असे म्हणतात. येथून दूरदूरच्या प्रदेशाची टेहळणी केली जायची.

मंदिरात असणाऱ्या देवीच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीचा चेहराच फक्त जमिनीवर आहे. देवीचे उर्वरित शरीर जमिनीत आहे. या मूर्तीच्या खाली विहीर असून या विहिरीतून ही स्वयंभू मूर्ती निघाली असल्याची सांगितले जाते.

या मंदिराचे अजुन एक वैशिष्टय म्हणजे या मंदिरात दिवसातून तीन वेळा देवीची पूजा केली जाते. ही पूजा देवीच्या वेगवेगळ्या रूपात केली जाते. सकाळची पूजा ही बाल अवस्थेतील रूपातील, दुपारची पूजा तारुण्य अवस्थेतल्या रूपातील, तर सायंकाळची पूजा ही वृद्ध अवस्थेतल्या रूपातील असते.

या गडावर नवरात्रौत्सवानिमित्त देवीची स्थापना करून अखंड नंदादीप प्रज्वलित करून ९ दिवस आदिमायेची मनोभावे पूजा केली जाते. यासोबतच बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश देत या मंदिरात मुलींना देवी मानून येथे नवकन्येचे पुजनही केले जाते.

या देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातून सुद्धा भाविक पिंगळाई देवीच्या गडावर गर्दी करतात.

नवसाला पावणारी देवी म्हणून पिंगलाक्षी देवी प्रसिद्ध आहे. दर मंगळवारी आणि शुक्रवारी या गडावर भाविकांची मोठी गर्दी होते. तर वर्षातून एकदा चैत्र महिन्यात व नवरात्रीत देवीच्या गडावर मोठी यात्रा भरते.

  •  कपिल जाधव

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.