‘पिंजरा’ तयार होतांना पडद्यामागे या १० इंटरेस्टिंग गोष्टी घडत होत्या

“पिंजरा … त्यो कुनाला चुकलाय ? अवो मानसाचं घरतरी काय असतं? त्योबी एक पिंजराच की”

हेच तत्वज्ञान आपल्या गावरान रांगड्या भाषेत सांगणारी चंद्रकला. अन ‘व्यक्ती मेली तरी चालेल समाजातील आदर्श जिवंत राहिले पाहिजेत’ या तत्वज्ञानावर विश्वास ठेवून जगणारे गुरुजी अशा दोन व्यक्तिरेखांवर आधारित पिंजरा !!! जीवाला चटका लावणारा !!!

व्ही.शांताराम यांचा पिंजरा. व्ही. शांताराम अर्थात शांताराम बापूंचं नाव कोणाला माहित नाही. 

बॉलिवूडला जितेंद्र सारखा अभिनेता आणि मराठी चित्रपटसृष्टीला श्रीराम लागूंसारखा अभिनेता देण्याचं श्रेय देखील त्यांनाच जातं.

आजच्याच दिवशी म्हणजेच ३१ मार्च १९७२ रोजी हा अजरामर पिंजरा चित्रपट प्रदर्शित झाला. आज या चित्रपटाला ५० वर्षे पूर्ण झालीत. मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला रंगीत सिनेमा आणि उत्कृष्ट कलाकृती म्हणून अजूनही त्याची जादू काय कमी झाली नाही. 

पण प्रत्यक्षात पिंजरा एका गुरूची गुरूदक्षिणा देणाऱ्यासाठी तयार करण्यात आलेली अजरामर कलाकृती होती. होय शांताराम बापु हे अनंत माने यांच्यासाठी गुरुतुल्य होते. दिग्दर्शक बापू झाले आणि अनंत माने सहाय्यक दिग्दर्शक झाले आणि सुरु झाली या चित्रपटाची निर्मिती….

तमाशापटांमध्ये आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या या दर्जेदार चित्रपटाची निर्मिती कशी झाली याबाबतच्या १० इंटरेस्टिंग गोष्टी  म्हणजे….

१. ज्या दोन चित्रपटांवर हा चित्रपट आधारित आहे. त्यापैकी ‘जल’ हा चित्रपट शांताराम बापूंनी १९३८ मध्येच ३-४ वेळा पाहिला होता. प्रेमभंगामुळे माणूस कसा आत्मघात करून घेतो हे तरुणांना मुद्दाम दाखवले पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. याच ‘ब्ल्यू एंजल’ चित्रपटाच्या कथानकावर नाटककार वसंत सबनीस यांनी ‘निळावंती’ हे नाटक लिहिले होते. ते सत्तरच्या दशकात रंगभूमीवर आले होते.

२. हा खरा कलावंताच्या अधःपतनाचा विषय आहे, पण शांतारामबापू हे समाजाविषयी कळकळ बाळगणारे असल्यामुळे शिक्षकाचे अधःपतन या चित्रपटात दाखवले तर ते जास्त परिणामकारक होईल असा विचार करून त्यांनी नायकाला शिक्षक बनवले. नंतर त्यांच्या असे लक्षात आले की, वैद्यकी करणारा शिक्षक असला (असे शिक्षक पूर्वी असत.) तर त्या शिकणारे/न शिकणाऱ्यांशीही संबंध येतो म्हणून त्यांनी यातला शिक्षक वैद्य दाखवला आहे.

३. शांताराम बापूंनी हा चित्रपट अनंत मानेंवर सोपवला होता. सिनेमा तू करणार. कथा, कलाकार, तंत्रज्ञ सगळं तू ठरवं. नायिका फक्त संध्या राहिल एवढी अट बापूंनी घातली होती. दुसरीकडे अनंत मानेंनी चित्रपटाच्या नायिकेसाठी त्यावेळची अत्यंत लोकप्रिय, गुणी आणि त्यांची हुकमी नायिका जयश्री गडकर यांची निवड केली होती. पण चित्रपटासाठी कथानक लिहून झाल्यानंतर संध्याबाईना ही भूमिका आपण करावी असे वाटू लागले आणि अर्थातच ती भूमिका त्यांच्या वाट्याला गेली.  

या बाबत स्वतः जयश्री गडकर यांनी ‘अशी मी जयश्री या आत्मकथनात लिहिलंय. तसेच त्यांनी डॉ. लागूंच्या नाटकांतील प्रभावी भूमिका आणि अभिनय बघितला होता, म्हणून त्यांची निवड नायिकेसाठी  करावी असे माने यांना सुचवल्याचेही त्यांनी ‘अशी मी जयश्री’मध्ये नमूद केले आहे. पुतण्या रवींद्र आणि दिग्दर्शक अनंत माने यांच्याही सांगण्यावरून त्यांनी रंगभूमीवर गाजलेले आणि तोपर्यंत एकाही चित्रपटात भूमिका न केलेल्या डॉ. श्रीराम लागूंना संधी देण्याचे ठरवले.

४. महत्वाची गोष्ट म्हणजे श्रीराम लागूंनी कथा वाचल्याशिवाय भूमिका स्वीकारायला नकार दिला. शांताराम बापू तर कथा आणि तद्नुषंगिक बाबी यांच्या गुप्ततेबाबत खूप काळजी बाळगणारे होते. यातून रवींद्र आणि माने यांनी कसा मार्ग काढला ते लागूंनी त्यांच्या आत्मकथन ‘लमाण’मध्ये सविस्तर लिहिले आहे.

५. या चित्रपटासाठी खेबूडकरांनी एकंदर १००-११० च्या आसपास गीते लिहिली. सर्वसाधारणपणे एका चित्रपटात ७-८ गीते असतात असे धरले तर खेबूडकरांनी १३-१४ चित्रपटांसाठी गाणी लिहिली असे मानता येईल.

‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’, ‘दिसला गं बाई दिसला’ गाण्यांची गोष्ट ….

६. खेबूडकर ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’ हे गाणे लिहीत होते पण त्यांच्या मनासारखे काय होईना. बरीच रात्र झाली. मग खेबूडकर आणि कदम ‘राजकमल’मध्येच झोपले. पण अस्वस्थ असणारे खेबूडकर मध्यरात्री उठले आणि भराभर गीत लिहून मोकळे झाले. ते त्यांना स्वतःला आवडल्यामुळे सकाळी उठल्यावर रामभाऊंना दाखवू असा विचार करून ते अंथरुणावर पडले. तोच जागे असलेल्या कदमांनी ते गीत पहावयास मागितले. त्यांनाही ते गाणे आवडल्यामुळे त्यांनी ताबडतोब गाण्याला चाल लावून टाकली अन जाऊन सकाळ-सकाळी बापूंना ते गीत आणि त्याची चाल ऐकवली अन बापूही खूष झाले.

७. ‘दिसला गं बाई दिसला’, या गाण्याला लावलेल्या अनेक चालींपैकी फक्त दोन चाली उरल्या होत्या. त्याबाबत बापू आणि त्यांचे अन्य सहकाऱ्यांना निर्णय घेता येईना. अखेरीस म्हणाले की, त्यांच्या तिशीत असणाऱ्या किरणाला जी चाल आवडेल ती फायनल करूया. या गाण्याच्या लोकप्रियतेनं नंतर कळस गाठला.

एकंदरच या चित्रपटातील सर्वच गाणी त्या दोन-तीन वर्षात नभोवाणी (आपली आवड, चित्रपट संगीत) घरोघरी, सत्यनारायण, जाहीर कार्यक्रम अशा ठिकाणी सतत वाजत असायची. त्या काळात कॅसेट प्ले नुकतेच लोकप्रिय झाले होत होते, ते अत्यंत सोयीचे असल्यामुळे सहली, पिकनिक अशा सगळ्या जागी या गाण्यांनी धुमाकूळ घातला होता!

८. ‘पिंजरा’ने गावोगावी अफाट लोकप्रियता मिळवून उत्पन्नाचे जुने विक्रम मोडले. 

बऱ्याच ठिकाणी रौप्य महोत्सव तर काही ठिकाणी सुवर्ण महोत्सवही झाला. मुंबईत ‘प्लाझा’मध्ये ४३ आठवडे चालला. या चित्रपटामुळे बापूंना एव्हडा आर्थिक फायदा झाला की, आधीच्या पडलेल्या चित्रपटामुळे आणि हिन्दी ‘पिंजरा’ अजिबात न चालल्यामुळे झालेले नुकसान यांची त्यांना झळ पोचली नाही. आणि अभिनेत्री संध्याला नायिकेच्या भूमिकेसाठी ‘फिल्मफेअर’ पारितोषिक मिळाले.

९. आता प्रश्न पडेल कि पिंजरा हिंदीतही होता ?

होय, हाच चित्रपट बापूंनी हिंदीतही ‘पिंजरा’ नावाने निर्माण केला होता. तो सपाटून आपटला. मराठी ‘पिंजरा’मुळे अभूतपूर्व फायदा ‘जिरवण्यासाठीच’ या पडेल ‘पिंजडा’ची निर्मिती केली होती, असे चित्रपट वर्तुळात बोलले जात असे!

१०. महत्वाची गोष्ट म्हणजे शांताराम बापूंविषयी जे काही उलट-सुलट ऐकले होते त्यापैकी कशाचाही प्रत्यय आपल्याला आला नसल्याचे डॉ. श्रीराम लागूंनी मोकळेपणाने ‘लमाण ‘मध्ये नमूद केले आहे.

अशाप्रकारे शांताराम बापूंच्या कथेचे सोने करून अनंत मानेंनी असा हा सर्वांग सुंदर, रंगीत चित्रपट बनवला आणि मराठी चित्रपट सृष्टीत रंगीत चित्रपटांचे युग सुरु झाले.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.