मृत्युपूर्वी तिचे वडील म्हणाले होते, “माझं काम ऐकलं नाहीस. तुझं सुवर्ण चुकेल, तुला रौप्य मिळेल”

पिंकी बल्हारा

इंडोनेशियातील जकार्तामध्ये सुरु असलेल्या आशियायी स्पर्धेत कुराश प्रतीयोगीतेत तिने भारतासाठी रौप्य पदक जिंकलय. सुवर्ण पदकाने पिंकीला हुलकावणी दिली असली तरी तिचं रौप्य देखील देशासाठी सुवर्ण पदकापेक्षा कमी मौल्यवान नाहीये. कारण पिंकीचा इथपर्यंतचा प्रवास अतिशय संघर्षपूर्ण राहिलाय.

आशियायी स्पर्धा सुरु होण्याच्या केवळ ३ महिन्या आधीच्या काळात तिने आपल्या कुटुंबातील १ नाही तर ३ सदस्यांना गमावलं होतं. खरं तर ही परिस्थिती कुठल्याही खेळाडूला मानसिक पातळीवर मोडून टाकणारी होती. पण अशा परिस्थितीत देखील पिंकीने स्वतःला सावरलं आणि आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करत आशियायी स्पर्धांमध्ये देशाचा तिरंगा अभिमानाने उंचावला.

स्पर्धेआधी सर्वप्रथम पिंकीने आपला चुलतभाऊ गमावला होता. त्यानंतर या दुःखातून सावरायला मदत  करू शकेल अशी एक बातमी येऊन धडकली की आशियायी स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पिंकीची निवड झाली आहे. ही बातमी शिळी होते न होते तोपर्यंतच नियतीने तिला दुसरा धक्का दिला. तिच्या वडिलांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं.

वडिलांच्या निधनामुळे पिंकी पुरती कोसळली होती. पण तिच्या काकांनी तिला यातून सावरण्यासाठी मदत केली. वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुला यातून सावरलं पाहिजे आणि देशासाठी पदक जिंकलं पाहिजे, असं तिला सांगितलं. तेव्हा कुठे पिंकी हळूहळू या दुःखातून बाहेर पडू लागली होती आणि अजून एक धक्का बसला तो म्हणजे आपल्या मुलाच्या निधनाचा धक्का सहन न करू शकलेले तिचे आजोबा देखील वारले.

पिंकी एका मागून एक धक्के सहन करत होती पण आता फक्त वडिलांचं स्वप्न होतं जे तिला लढण्यासाठी प्रेरित करत होतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच वडिलांच्या अंत्यविधीनंतर अवघ्या पाचव्या दिवशी ती स्पर्धेच्या तयारीला लागली होती. आजूबाजूच्या लोकांच्या खोचक टिपण्णीपासून वाचवण्यासाठी तिला रात्रीच्या वेळी आपला सराव करावा लागला होता.

सुवर्ण पदक चुकेल, रौप्य पदक मिळेल !

आशियायी स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्यानंतर पिंकीने आपल्या वडिलांशी संबंधित एक अतिशय भावनिक आठवण माध्यमांशी बोलताना सांगितलिये.

पिंकीने सांगते की, “ आशियायी स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच्या काळात मी स्पर्धेची तयारी करत होते. त्यावेळी एकदा वडिलांनी मला ग्लासभर पाणी मागितलं होतं.  त्यांचं बोलणं ऐकू न आल्याने मी तशीच पुढे निघून गेले.”

यावर पिंकीचे वडील गमतीमध्ये पिंकीला म्हणाले होते,

“तू वडिलांचं काम ऐकत नाहीस. त्यामुळे आता आशियायी स्पर्धेमध्ये तुझं सुवर्ण पदक चुकेल. तुला रौप्य पदक मिळेल”

ही आठवण सांगताना तिचे डोळे पाणावले होते, पण त्याचवेळी वडिलांचं स्वप्न पूर्ण केल्याची भावना आणि हे यश बघण्यासाठी वडील हयात नसल्याची खंत देखील होती.

Leave A Reply

Your email address will not be published.