‘पायरेट्स ऑफ दी कॅरेबियन’ सिनेमा आणि ‘मराठा आरमार’ यामध्ये “हे” कनेक्शन आहे..

‘समुद्रावरील शिवाजी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कान्होजी आंग्रेंचा दबदबा साऱ्या जगभरात पसरला होता. इंग्रजांच्या व्यापाराची उलाढाल ही तत्कालीन जगाच्या 30% होती. पण या महाबलाढ्य सत्तेला लोटांगण घालायला लावणाऱ्या कान्होजी आंग्र्यांच्या साथीदारांची ही अपरिचित गोष्ट.

‘पायरेट्स ऑफ दी कॅरेबियन’ चित्रपटात दाखवलेल्या सर्व पात्रांचा आणि मराठ्यांचा आरमाराचा अगदीच जवळचा संबंध आहे.

सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात एक इंग्रज अधिकारी प्रायव्हेटीयर जहाजावर काम करत होता. ज्या भागात इंग्रजांची सत्ता नाही, तिथे लूटमार करून आपल्या माणसांचा पगार तो चालवत असे. सण 1696 मधील ही गोष्ट आहे. त्याला वेळेवर पैसे मिळाले नाहीत. रागाच्या भरात त्याने भारताच्या किनाऱ्यावर असलेली ‘राजापूरची वखार’ लुटली आणि आपल्या माणसांचे पगार केले.

काही दिवसांनी सुरतेच्या बंदरावर असलेल्या ‘केहाद’ जहाजाची लुट केली. हे जहाज होते औरंगजेबाचे. या जहाजावर प्रचंड खजिना होता. झाले. इंग्रजांचीच या समुद्री लुटारूला फुस आहे, असा औरंगजेबाचा समज झाला. इंग्रजांनी तात्काळ या समुद्री लुटारू विरोधात पत्रक काढले आणि त्याला पकडण्याची तयारी सुरू केली.

या लुटारूचे नाव होते ‘कॅप्टन विलियम कीड’. ‘पायरेट्स’ चित्रपटात दाखवण्यात आलेला ‘जॅक स्पॅरो’..

जेव्हा कीडने राजापूरची वखार लुटली तेव्हा मराठ्यांनी ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या तत्वाने त्याला मदत केली होती. कीडला पकडण्यात आले, त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तब्बल तीन वर्षे थेम्स नदीच्या काठी त्याचा मृतदेह लटकवून ठेवण्यात आला होता.

या घटनेने सारे समुद्री चाचे चिडले. जगातील प्रमुख समुद्री लुटारूंचे ठराविक भागावर अधिपत्य होते. अमेरिकन समुद्र किनाऱ्यावर ‘एडवर्ड टीच’ उर्फ ब्लॅकबियर्ड (चित्रपटातील नाव सुद्धा ब्लॅकबियर्ड).

आफ्रिकन समुद्र किनाऱ्यावर ‘कॅप्टन एडवर्ड इंग्लंड’ (चित्रपटातील नाव कमोडोर जेम्स नोरिंगटन).. मादागास्करचा राजा आणि रोंटर बे चा बादशाह ‘जेम्स प्लांतेन’ या सर्वांचे पायरेट राउंडवर वर्चस्व होते. पॅसिफिक महासागर- टोर्टुगा बेट-कॅरिबियन देश-मादागास्कर-गोवा अशा ‘पायरेट राउंड’ मुळे जगभरातले समुद्री चाचे एकमेकांना जोडल्या गेले होते. (चित्रपटात भरपूर वेळेस टोर्टुगा बेट दाखवले आहे.) या राउंडवर वर्चस्व ठेवण्यासाठी इंग्रजांना दरवर्षी ‘200 कोट रु.’ खर्च करावा लागत असे.

जगभरातल्या समुद्री लुटारूंना आश्रयासाठी सर्वात सुरक्षित जागा होती, भारताचा पश्चिम किनारा.. आणि या किनाऱ्यावर सत्ता होती ‘कान्होजी आंग्रे’ यांची.

संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आंग्र्यांचे नियंत्रण होते. मराठ्यांच्या आरमाराची एवढी धास्ती होती, की कान्होजी आंग्रेंच्या दस्तकाशिवाय इंग्रजांना भारताची पश्चिम किनारपट्टी ओलांडता येत नव्हती. आंग्रे इंग्रजांच्या विरोधात एकदाही युद्ध हरले नाहीत. ईस्ट इंडिया कंपनीला मराठ्यांच्या आरमारावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन वेळेस गव्हर्नर बदलावा लागला.

जेम्स प्लांतेन याच्यावर जेव्हा इंग्रजांनी हल्ला केला, तेव्हा त्याने मराठ्यांकडे मदतीची याचना केली. आंग्र्यांनी त्याला मदत तर केलीच, पण आपल्या जहाजावर ‘सरनौबत’ म्हणून सेवेत घेतले. या जेम्स प्लांतेनकडे एक बलाढ्य जहाज होते ‘फ्लाईंग ड्रॅगन’ नावाचे.. हेच चित्रपटात दाखवण्यात आलेले ‘फ्लाईंग डचमन’ जहाज.

गव्हर्नर बुनला आंग्र्यांचा बंदोबस्त करायचा होता. समुद्रावर वाढती दहशत आणि जगभरातल्या लुटारूंना दिलेल्या आश्रयामुळे आंग्र्यांना सर्वजण ‘पायरेट लॉर्ड’ म्हणू लागले.

बूनने लढाई करण्यासाठी Great and mighty floating machine या शब्दात वर्णन केल्या गेलेल्या ‘Pharm’ या नवीन जहाजाची निर्मिती केली. वाल्टर ब्राउनकडे या मोहीमेचे नेतृत्व देण्यात आले. त्याच्या ताफ्यात सामील असणाऱ्या जहाजापैकी ‘London’ नावाच्या जहाजाचा कप्तान होता ‘उप्टन’. ह्या उप्टनने त्याच्या डायरीमधे नोंद करुन ठेवली होती, की

‘ज्या माणसाला लढाईचा कसलाही पूर्वानुभव नाही, त्याकडे ह्या मोहीमेचे नेतृत्व देण्यात आले आहे.’

सप्टेंबर 1720 च्या सुमारास आपल्या 3 लढाऊ जहाजांच्या ताफ्यानिशी ब्राउन विजयदुर्गाजवळ पोहोचला आणि त्याच वेळेस, एडवर्ड इंग्लड आपल्या लुटीच्या मालासहीत विजयदुर्गच्या किनार्यावर डेरेदाखल झाला होता. ही बातमी अजून इंग्रजांपर्यंत पोहोचली नव्हती. पलीकडे आंग्रे आणि अलीकडे इंग्लंड, अशा कात्रीत इंग्रज सापडले. तेवढ्यात इंग्लडचे 50 तोफांनी सजलेले एक अवाढव्य जहाज पुढे आले आणि ब्राऊनवर तोफांचा भडिमार होऊ लागला.

बूनने मोठ्या अपेक्षेने बनवलेले ‘Pharm’ जहाज अपयशी ठरले. त्याच्या बांधनीमधे angle चुकला होता आणि त्यामुळे ज्या तोफांचा मारा जहाजावरून झाला, त्याचा अपेक्षित परिणाम भेटला नाही.सर्व उडवलेले गोळे निरुपयोगी ठरले. ब्राऊन कसाबसा पळून जाण्यास यशस्वी झाला. मराठ्यांनी एकही गोळा न उडवता परस्पर इंग्रजांना परास्त केले.

कॅप्टन इंग्लडने या युद्धात वापरलेल्या 50 तोफांचे जहाज होते ‘पर्ल’. चित्रपटात दाखवण्यात आलेले जगप्रसिद्ध ‘ब्लॅक पर्ल’.

मराठ्यांच्या आरमाराला हरवण्यासाठी कित्येक वेळेस प्रयत्न झाले. परंतू, कान्होजी आंग्रे आणि त्यांच्या वारसदारांनी मराठा आरमाराला अजिंक्य ठेवले. ‘पायरेट्स ऑफ दी कॅरेबियन’ च्या तिसऱ्या भागात, ‘एट वर्ल्डस एन्ड’ मध्ये दाखवलेले ‘पायरेट लॉर्ड श्री संभाजी’ म्हणजेच कान्होजी आंग्रे पुत्र ‘सरखेल संभाजी आंग्रे’ होय.

अठराव्या शतकाच्या अखेरीस The Gentlemens magazine मध्ये जगभरातील सर्वात महान २१ सरखेलांची यादी छापण्यात आली. त्यामध्ये १८ इंग्लंडचे, ३ फ्रांसचे आणि १ मराठा सरखेल होता. त्यांचे नाव म्हणजे ‘तुळाजी आंग्रे.’ आणि विशेष बाब अशी, की या यादीमध्ये तुळाजींना सर्वोच्च स्थान देण्यात आले.

13 सागरी किल्ले,27 जमिनिवरील किल्ले आणि 36 लाखांचा मुलुख एवढे आपल्या पराक्रमाने स्वराज्याला मिळवून देणाऱ्या ‘पायरेट लॉर्ड’ कान्होजी आंग्रे, संभाजी आंग्रे, तुळाजी आंग्रे आणि संपूर्ण मराठा आरमाराची ही वैभवकहाणी..

संदर्भ :
1 An authentic and faithful history of that arch-pirate Tulagee Angriya
2 A history of Indian War
3 Angreys of Kolaba in British records
4 माळगावकर लिखीत कान्होजी आंग्रे
5 The pirates of Malabar and an Englishwomen in India two hundred years ago : John Biddulph
6 The Gentlemen’s magazine Vol. 93
7 History of the konkan

  • भिडू केतन पुरी

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Gayatri deshmujb says

    मस्त

Leave A Reply

Your email address will not be published.