झक मारली आणि महाराष्ट्र भूषण दिला…

महाराष्ट्र भूषण पुरस्कारांची सुरवात युतीच्या शासनात करण्यात आली. नेमका कोणाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा याबाबत सरकारी पातळीवर खल चालू असतानाच शासनातील काही लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांच नाव समोर आणलं. बाळासाहेबांनी लगेच स्वत:च्या नावाला कात्री लावत हा पुरस्कार पु.ल. देशपांडेना देण्यात यावा अस सुचवलं.

महाराष्ट्र शासनचा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार पु.ल.देशपांडे यांना जाहिर झाला. पुलंनीही पुरस्कार स्वीकारण्यास संमती दाखवली आणि पुरस्कार समारंभ मोठ्या दिमाखात पार पाडण्याचं नियोजन करण्यात आलं.

समारंभाच्या दिवशी मात्र प्रत्यक्ष पु. लं. देशपांडे भाषण न करता त्यांच्या पत्नी सुनिताबाईंनी भाषण केलं. बाळासाहेबांच्या उपस्थितीत आयोजिक केलेल्या या समारंभात सुनिताबाईंनी अप्रत्यक्षपणे बाळासाहेबांवरच टिका करत हुकूमशाही प्रवृत्तीवर टिका करणार जोरदार भाषण केलं. आत्ता बाळासाहेब देखील त्याला उत्तर देणारं अस वाटतं असताना बाळासाहेबांनी मात्र या कार्यक्रमात मौनच बाळगलं.

दूसऱ्या दिवशी सायन येथील एका पुलाच्या उद्धाटनानिमित्त बाळासाहेब ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी नेमका त्यांचा घसा बसला असल्या कारणाने बाळासाहेब आज काहीच बोलणार नाही हे पत्रकारांना कळून चुकलेलं. पण अचानकपणे बाळासाहेबांनी माईकचा ताबा घेतला आणि म्हणाले, जुने पुलं पाडून नवे पुल बांधायला हवेत…
त्यानंतर बाळासाहेबांनी त्यांच्या स्टाईलमध्ये जोरदार चौकार षटकार ठोकत भाषण केले भाषणाच्या ओघातच बाळासाहेब बोलून गेले की,
झक मारली आणि महाराष्ट्रभूषण दिला…
पुलंसारख्या जेष्ठ साहित्यिकावर या भाषेत टिका करणं अनेकांना रुचलं नाही. त्यांच्या या वाक्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. वर्तमानपत्रात देखील झक मारली हा शब्द वापरावा का याबाबत चर्चा झडू लागल्या. नाना पाटेकर यांनी देखील या वादात उडी घेतली. ते म्हणाले,
“बाळासाहेब तुम्ही खूप पुढे गेला आहात यापुढे ही जात राहाल पण मागे वळून पाहाला, तर सोबत कुणी नसेल” नाना पाटेकरांच हे वक्तव्य देखील अनेकांना झोंबल. खुद्द नाना पाटेकर यांनी बाळासाहेबांना भेटूनच या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतरच्या काळात खुद्द बाळासाहेब ठाकरे पुलं देशपांडेच्या घरी त्यांना भेटण्यास गेले..

तिथेच या प्रकरणावर खऱ्या अर्थाने पडदा पडला. टिकेतून मतभेत होतील पण ते मिटवण्यासाठी मनाचा मोठ्ठेपणा बाळासाहेब ठाकरेंनी दाखवला..

Leave A Reply

Your email address will not be published.