भारतातील अशी ठिकाणे जिथे भारतीयांनाच प्रवेश नाही !
इंग्रज राजवटीखाली भारतीयांशी करण्यात आलेल्या भेदभावाविषयी तर आपल्याला माहितीच आहे. पण तुम्हाला जर सांगितलं स्वातंत्र्य भारतात सुद्धा अशी काही ठिकाणे आहेत, जिथे भारतीयांनाच प्रवेश नाकारला जातो तर..? पचवायला थोडं जड जातंय ना..? पण हे खरं आहे. चला तर मग जाणून घेऊयात की ती अशी कोणती ठिकाणे आहेत ज्यांनी भारतीयांना प्रवेश नाकारला होता.
उनो-इन हॉटेल, बंगळूरू
२०१२ साली निप्पोन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या मदतीने भारताची टेक-सिटी बंगळूरूमध्ये खास जापनीज लोकांसाठी ‘उनो-इन’ नावाचं हॉटेल सुरु करण्यात आलं होतं. या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांना तसेच इतरही भारतीय ग्राहकांना हॉटेलच्या छतावर जाण्याची परवानगी नव्हती. काही दिवसातच तिथे वंशभेदाच्या घटना घडू लागल्या होत्या. त्यामुळे २०१४ साली ग्रेटर बंगळूरू महानगरपालिकेने हे हॉटेल बंद करण्याचे आदेश दिले.
फ्री कॅसोल कॅफे, हिमाचल प्रदेश
२०१५ साली हिमाचल प्रदेशातील फ्री कॅसोल कॅफे चर्चेत आला होता. त्यावेळी या कॅफेच्या मॅनेजरने एका भारतीय तरुणीला कॅफेत प्रवेश करण्यास मनाई केली होती. मात्र त्याचवेळी इजरायली पाहुण्याचं मात्र कॅफेत स्वागत करण्यात येत होतं. त्यामुळे यावेळी सुद्धा वंशभेदाचे आरोप झाले होते.
गोवा आणि पुदुच्चेरीमधील ‘फक्त फॉरेनर्स’साठी असणारे बीच
गोवा आणि पुदुच्चेरी येथील बीच देशविदेशात प्रसिद्ध आहेत. देशभरातून तसेच विदेशातून अनेक पर्यटक येथे येत असतात. पण या दोन्हीही ठिकाणी काही अशी बीच आहेत, जिथे फक्त विदेशी पर्यटकांनाच जाण्याची परवानगी आहे.
भारतीय पर्यटकांच्या ‘कामुक’ नजरेपासून विदेशी पर्यटकांचं संरक्षण करण्यासाठी भारतीयांना प्रवेश नाकारण्यात आल्याचं तेथील समुद्री तटावरील जागांचे मालक सांगतात. या दोन्हीही ठिकाणी काही अशी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट आहेत, जिथे फक्त विदेशी पर्यटकांनाच प्रवेश दिला जातो.
रेड लॉलीपॉप हॉटेल, चेन्नई
चेन्नईमधील रेड लॉलीपॉप हॉटेल भारताला पाहिलांदा भेट देणाऱ्या विदेशी नागरिकांसाठी राखीव आहे. विशेष म्हणजे ते फक्त पासपोर्ट बघूनच हॉटेलमध्ये प्रवेश देतात, असं या हॉटेलच्या वेबसाईटवर सांगण्यात आलेलं आहे.
रशियन कॉलनी, कुडानकुलम
कुडानकुलम अणुप्रकल्पाच्या जवळ एक रशियन कॉलनी वसविण्यात आलेली आहे. अणुप्रकल्पासाठी काम करणारे रशियन लोक या कॉलनीत राहतात. या कॉलनीच्या आत भारतीयांना प्रवेश नाही.
हे ही वाच भिडू
- अशीही मंदिर आहेत जिथं पुरूषांना प्रवेश नाही तुम्ही कधी आंदोलन करणार ?
- हिमालयातल्या कुशीतलं असं गाव, जिथे फक्त महादेवाच्या शपथेवर मिळतं कर्ज !
- राजा हरिश्चंद्र आणि महाराष्ट्राचं काय होतं नातं ? वाचा हरिश्चंद्र गडाची कहाणी.
- जगप्रसिद्ध गांजा पिकवणारं गाव भारताचा कायदा मानत नाही पण अकबराची पूजा करतं..!!!