म्हणून आत्ताच्या घडीला MPSC हाच प्लॅन ‘B’ ठेवायला हवयं…..

शनिवारी पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. कारण ठरलं महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीची मुख्य परीक्षा पास होऊन देखील २ वर्षे मुलाखत झाली नाही, परिणामी नोकरी नाही. यातून तो नैराश्यात गेला आणि त्यानं आत्महत्या केली.

लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना सामोरं जात असताना नैराश्य येणं हि अतिशय सहाजिक समजली जाणारी गोष्ट. याला कारण देखील तितकीच आहेत.

स्वप्निल कमीत कमी मुख्य परीक्षा तरी पास झाला होता. केवळ मुलाखत बाकी होती. पण लाखो मुलं या क्षेत्रात अशी दिसतात ज्यांनी आपल्या आयुष्यातील ५-६ वर्ष, आणि वयाची २७ ते २८ वर्ष ओलांडली तरी हातात काहीच लागलेल नसतं. पूर्व परिक्षा देखील पास झालेली नसते. परिणामी ही काही लाख मुलं नैराश्येत जातात. म्हणूनच कदाचित सरकारला सांगावं लागतं की, विद्यार्थ्यांमधील नैराश्य टाळण्यासाठी व्यवस्था उभारली जाईल.

त्यामुळेच या एमपीएससीलाच आता प्लॅन ‘B’ ठेवायला हवा असा सूर सगळीकडून उघडपणे निघू लागला आहे.

माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी देखील आपल्या फेसबूक पोस्टवरुन हिच भुमिका मांडली आहे.

mahesh zagade

मुळात कसं असतयं, तुम्ही, मी, आपले मित्र-मैत्रिणी रूममेट्स कित्येकांनी आयएएस, आयपीएस, डेप्युटी कलेक्टर बनण्याचे, लाल दिव्याच्या गाडीत फिरण्याचे स्वप्न पाहिलेले असते. यातुनच यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी ऑफिसर होऊ असं म्हणत म्हणत, मोटिवेशनल व्हिडिओ बघून बघून आयुष्यातले ३, ४, ५ वर्ष सहज निघून जातात आणि मग लक्षात येतं आपल्याने काय हे होणार नाही. जॉब मिळत नाही. लग्नाचं वय झालंय, बस्स इथचं आपला गेम होतो…

त्यामुळेच २०१९ च्या बॅच मधून पोलिस उपाधिक्षकपदी निवड झालेल्या डॉ. वंदना कारखेले ‘बोल भिडू’शी बोलताना सांगतात,

मुलं म्हणतात कि आता आपण एमपीएससी करत आहोत म्हणजे काही तरी बॅकअप प्लॅन पाहिजे. म्हणजे यातून काही झालं नाही तर आपण आपल्या प्लॅन बी कडे वळू शकतो. पण आताच्या घडीला अशी वेळ आली आहे कि, प्लॅन ‘ए’ आधी तयार करण्याची गरज आहे आणि MPSC लाच बॅकअप प्लॅन ठेवायला हवं.

त्याचं कारण म्हणजे सध्याच्या घडीला उमेदवारांना डबल टेन्शन आहे.

एक तर या क्षेत्रात सध्या तयार झालेली स्पर्धा आणि त्यातून यश मिळण्यासाठी लागणारा अनिश्चित वेळ. तर त्याचवेळी दुसऱ्या बाजूला घरची बेताची आर्थिक परिस्थिती, वाढत जाणार वय, परीक्षा आणि नियुक्ती याबाबतचे गोंधळ आणि अखेरीस रिकामा हात. या सगळ्यामुळे नैराश्य येत आहे. त्यामुळे त्यावर मात करण्यासाठी हातात कोणताही उद्योग, व्यवसाय किंवा नोकरी अर्थात प्लॅन ए असणं हे पहिल्यांदा गरजेचं आहे.

ज्यामुळे या प्रवाहातून बाहेर पडल्यावर काही तरी आपलं करिअर आपण करू शकतो, किंवा आर्थिक स्थिरता तरी येऊ शकते. टेन्शन येणार नाही. मी स्वतः आता ऑनलाईन क्लास घेत आहे.

तर उपजिल्हाधिकारी पदासाठी निवड झालेले हरेश सूळ हे प्लॅन ए आणि बी सोबतचं परिक्षांसाठी आयोगाच्या नाही तर स्वतःच्या वयोमर्यादेच बंधन असणं गरजेच असल्याचं मत व्यक्त करतात.

ते बोल भिडूशी बोलताना म्हणतात,

मी २०१३ ला माझं इंजिनिअरिंग पूर्ण झालं त्यानंतर सुरुवात केली. १ वर्ष यूपीएससी केली. पुढे स्टाफ सिलेक्शन आणि पाच वर्ष राज्यसेवा केली. यात २०१९ च्या बॅचमधून निवड झाली आहे. पण या सगळ्या काळात मी मागे वळून बघतो तेव्हा मला माझ्या काही चूका कळतात.

यातील पहिली चूक म्हणजे उशिरा केलेली सुरुवात आणि दुसरी गोष्ट म्हणजे बराच काळ यात घालवला. पण २०१९ च्या अटेम्टला जर क्वालिफाय झालो नसतो तर मी हे क्षेत्र सोडून शेतीकडे वळणार होतो हे तितकंच खरं. सोबतचं आता माझं वय २८ झालयं. आता इथून पुढच्या टप्प्यावर सेटल कधी होणार? जर या टप्प्यावर झालं नसतं तर माझं एकुणच काम अवघड होतं.

त्यामुळेच १२ वी नंतर क्लिअर पाहिजे की मला इकडे वळायचं आहे. सोबतचं प्लॅन ‘ए’ तुमचा रेडी असायला हवा. म्हणजे ग्रॅज्युएशन करतानाच असं व्होकेशनल कोर्समध्ये करा की ज्याचा उपयोग पुढे जावून नक्की होईल. पुढे जास्तीत जास्त ३ वर्ष ट्राय किंवा वयाच्या २४ व्या वर्षापर्यंत प्रयत्न करायचे. या काळात आपल्याला एखादी तरी प्री निघायला हवी.

जर ती निघत नसेल तर समजायचं हा आपला मार्ग नाही. बिनधास्त सोडून आपल्या जॉब आणि व्यवसायावर लक्ष केंद्रीत करायचे. कारण जर झालं तर कौतुक करणारा आणि नाही झालं तर नाव ठेवणारा तोच समाज असतो.

तर पोलिस उपाधिकक्षक धनंजय पाटील ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणतात,

हा सगळा चित्रपटांचा इम्पॅक्ट आहे.. ते पाहून मुलांना वाटतं की आपल्याला देखील सिस्टीममध्ये गेल्यावर सगळं काही असचं मिळेल. पण तसं नसतं. जेवढ वरचं पद मिळेल तेवढ्या जबाबदाऱ्या आणि तणाव वाढतं जातो. त्याचं वेळेस मुलांना वाटतं असलेलं ग्लॅमर गळून पडलेलं असतं.

त्यामुळेच मी वारंवार मुलांना जीव तोडून सांगतो की गाडी आणि चार सॅल्युट करणारे पोलिस हि एवढीच गोष्ट नाही. पण मुलांना एवढीच गोष्ट माहित असती आणि तयारीला सुरुवात करतात. हरकत नाही, पण या अनिश्चिततेच्या क्षेत्रात येण्याआधी कोणताही एक व्होकेशनल शिक्षण घेणं गरजेचं आहे. म्हणजेचं तुमचा प्लॅन ए ऑलरेडी तयार असणं गरजेचं आहे.

वेळेच्या बाबतीत देखील धनंजय पाटील म्हणतात कि, केवळ २ वर्षचं पाण्यात राहणं गरजेचं आहे. त्यानंतर आपला मार्ग आपल्याला कळायला हवा…

तर मागच्या २ वर्षापासून जाहिरात निघाली नसली तरी प्लॅन ए म्हणून सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला आदित्य जाधव म्हणतो, 

मी सध्या मुंबईच्या एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. म्हणजे इंजिनियरींगच्या याच डिग्रीने मला मागच्या वर्षभरापासून परीक्षांची जाहिरात निघाली नाही या गोष्टीबद्दल फारसं टेन्शन घेवू दिलं नाही. त्यामुळे एक प्रकारे याच डिग्रीच्या जीवावर मला वर्षभरात जगण्यासाठी कोणतही टेन्शन आलेलं नाही.

मात्र प्रश्न असा आहे तो म्हणजे आता ३ वेळा परिक्षा पुढे ढकलली त्या जाहिरात मधून जवळपास ३ लाख उमेदवारांनी अर्ज भरला होता. त्यातील हवशे गवशे सोडून ५० हजार बसले होते असं आपण गृहित धरु. आता त्यातील अवघे ५०० जण अधिकारी होतील. पण उरलेल्या ४९ हजार ५०० जणांच काय?

यातुनच मग टेन्शन आणि नैराश्य चालू होतं. त्यामुळे काही तरी ठोस करत असू तरचं मग या चक्रव्हूवामधून सहज बाहेर पडू शकतो. अन्यथा यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी म्हणत कधी ५ ते ६ वर्ष निघून जातात आणि आपला गेम होवून जातो कळत पण नाही.. त्यामुळेच आता MPSC ला आता प्लॅन बी ठेवण्याची वेळ आलेली आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.