इमरान खान भारत आणि पाकिस्तान यांच्यात ‘शांततेचं रोपटं’ लावतील काय…?

पाकिस्तान सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आहे आणि कधी नाही तो ‘विधायक’ कारणासाठी चर्चेत आहे. कारण इमरान खानच्या ‘कॅप्टन’शिपखाली खेळणाऱ्या पाकिस्तानने देशाला ‘हिरवं’गार बनविण्यासाठी एक नवीन उपक्रम हाती घेतलाय !

आता तुम्ही म्हणाल की पाकिस्तान आधीच ‘हिरवा’ होता, आता इमरान खान अजून कित्ती हिरवं बनवणार…? थांबा, इतकं जजमेंटल होण्याची घाई करू नकात. (इमरान खानची प्रतिमा तुम्हाला त्यासाठी कितीही प्रोत्साहित करत असली तरीही) कारण हा ‘हिरवा’ रंग धार्मिक कट्टरतेचा नाही तर ‘निसर्गा’चा आहे.

तर शेजारच्या पाकिस्तानमधली सध्याची ट्रेंडिंग घटना म्हणजे इमरान खानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान सरकारने देशाला हिरवंगार बनवण्यासाठी हाती घेतलेलं ‘Plant4Pakistan’ हे अभियान होय.

जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप जिथे ‘क्लायमेट चेंज’सारखी काही गोष्टच अस्तित्वात असल्याचंच मान्य करायला तयार नाहीत तिथं इमरान खानने या प्रश्नात गांभीर्याने लक्ष घालत त्याच्या भयावह  परिणामापासून देशाला वाचविण्यासाठी हाती घेतलेला हा उपक्रम म्हणूनच कौतुकास्पद वाटतो.

काय आहे Plant4Pakistan अभियान…?

plant 4 pakistan

हरित पाकिस्तानच्या निर्मितीसाठी हे अभियान हाती घेण्यात आलं असून २ सप्टेबर रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी रोपट लावत या अभियानाची सुरुवात केली.

या अभियानांतर्गत एका दिवसात १५ लाख नवीन रोपे लावण्याचं उद्दिष्ट्ये ठेवण्यात आलं होतं. दीर्घकालीन उद्दिष्ट्य म्हणून ५ वर्षात १० हजार कोटी झाडे लावण्यात येणार आहेत.

पाकिस्तान सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार २ सप्टेबर रोजी पहिलं उद्दिष्ट्य साध्य करण्यात आलं असून जवळपास २०  लाख नवीन रोपे  पाकिस्तानात लावण्यात आली आहेत. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने देखील या घटनेची दखल घेत इतर देशांनी देखील आपापल्या ठिकाणी अशा प्रकारचा उपक्रम हाती घ्यावा असं आवाहन केलंय.

अभियानच्या यशस्वितेसाठी सर्वाधिक रोपे लावणाऱ्या आणि त्यांचा सांभाळ करणाऱ्या जिल्ह्यासाठी १ कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा देखील पाकिस्तान सरकारकडून करण्यात आलीये.

बिलियन ट्री त्सुनामी

imran khan

पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यानंतर इमरान खान यांच्या सरकारने हाती घेतलेली ही मोठी मोहीम असली तरी या क्षेत्रात इमरान खान खूप पूर्वीपासून काम करताहेत.

‘बिलियन ट्री त्सुनामी’ उपक्रमांतर्गत  सत्तेवर येण्यापूर्वी पासूनच इमरान यांनी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती. इमरान यांच्या बरोबरच पाकिस्तानचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर वसिम आक्रम हे देखील या उपक्रमात त्यांच्याशी जोडले गेलेले आहेत.

सध्या तरी पाकिस्तान सरकारच्या या उपक्रमाचं जगभर कौतुक होतंय. भविष्यात हा उपक्रम यशस्वी होईल का…? उपक्रमांतर्गत लावण्यात आलेली झाडे जगवली जातील का..? की ही फक्त एक तात्पुरती लोकप्रियता मिळविणारी कृती ठरेल हे येता काळच ठरवेल.

सध्या तरी इमरान खानचे यांचे हे प्रयत्न यशस्वी ठरावेत आणि त्यांनी  भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये देखील एक सौहार्दपूर्ण संबंधाच्या स्थापनेसाठी  एक ‘शांततेचं रोपटं’ देखील लावावं या अपेक्षेसह इमरान यांच्या या उपक्रमास शुभेच्छा द्यायला काय हरकत आहे..?

हे ही वाच भिडू- 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.