पहिल्या सिझनपासून आयपीएल खेळणारा एकमेव खेळाडू, जो कधीच लिलावात ‘विकला’ गेला नाही…!!!

 

‘इंडियन प्रीमियर लीग’ अर्थात आयपीएल म्हणजे पैसा आणि ग्लॅमर यांचा तडका असणारं टी-२० चं फास्टफूड क्रिकेट. ३ तासात फुल इंटरटेनमेंट. आयपीएल म्हणजेच इंटरटेनमेंट… इंटरटेनमेंट… इंटरटेनमेंट…!!! असंच काहीसं समीकरण. २००८ साली आयपीएल सुरु झालं आणि खेळाडूंची देखील खरेदी केली जाऊ शकते आणि नंतर ते विकले जाऊ शकतात, ही खेळाडूंच्या लिलावाची पद्धत भारतीय क्रीडारसिकांना इंट्रोड्युस झाली. भल्या-भल्या खेळाडूंवर लिलावात बोली लागली आणि एका रात्रीत अनेक नवोदित खेळाडू देखील करोडपती झाली. खेळाडूंना झालेलं हे लक्ष्मीदर्शन अनेकांचे डोळे दिपवणारं होतं. असं असलं तरी एक खेळाडू असा होता की जो आजपर्यंत झालेल्या प्रत्येक आयपीएलमध्ये सहभागी होता परंतु त्याच्यावर आयपीएलमध्ये कधीच बोली लागली नाही, तो कधीच ‘विकला’ गेला नाही. हा खेळाडू म्हणजे दुसरा-तिसरा कुणी नसून भारताचा धडाकेबाज बॅट्समन ‘विराट कोहली’ होय. समजून घेऊयात पहिल्या आयपीएलच्या लिलावाच्या वेळी कोहली ‘आयकॉन प्लेअर’ नसतानाही हे नेमकं कसं शक्य  झालं की कोहलीवर आयपीएलच्या लिलावात कधीच बोली लागली नाही.

 ‘आयकॉन प्लेअर’ म्हणजे काय ..?

२००८ साली जेव्हा सर्वप्रथम आयपीएलमधील टीमसाठी लिलाव करण्यात आला, त्यावेळी सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग इ. खेळाडूंना आयकॉन खेळाडूंचा दर्जा देण्यात आला होता. म्हणजेच हे प्लेअर लिलावासाठी उपलब्ध नव्हते, तर ते ज्या राज्यचं प्रतिनिधित्व करतात त्या राज्यातील शहराच्या नावे असणाऱ्या टीममध्ये ते असणार होते. आयपीएल लोकप्रिय व्हावी यादृष्टीने अशा प्रकारची योजना होती. म्हणूनच आपल्याला सचिन ‘मुंबई इंडियन्स’ कडून तर गांगुली ‘कोलकाता नाईट रायडर्स’ कडून खेळताना बघायला मिळाले. या ‘आयकॉन प्लेअर’ त्यांच्या संघातील सर्वाधिक बोली लागलेल्या खेळाडूच्या १५% अधिक मानधन देण्यात येणार होतं.

virat

आयकॉन प्लेअर’ नसतानाही कोहलीचा लिलाव का नाही झाला..?

रॉयल चँलेंजर्स बँगलोरने विराट कोहलीला ‘कॅचमेंट प्लेअर’ म्हणून आयपीएलच्या पहिल्या सिझनमध्ये आपल्या संघात स्थान दिलं होतं. या अंतर्गत त्याच्याशी युवा खेळाडू म्हणून करार करण्यात येऊन ३०००० डॉलरमध्ये तो रॉयल चँलेंजर्सचा सदस्य झाला होता. हा करार ३ वर्षांसाठी होता. पहिल्या २ आयपीएलमध्ये जरी विराट कोहलीची कामगिरी फारशी समाधानकारक झाली नव्हती, तरी आयपीएलच्या तिसऱ्या सिझनमध्ये मात्र कोहलीने ३०७ धावा फटकावत संघातील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला. त्यामुळे हा करार २०१० मध्ये संपुष्टात आल्यानंतर देखील रॉयल चँलेंजर्सने पुढच्या सिझनसाठी त्याला आपल्याकडे कायम ठेवले. त्यामुळे तो लिलावासाठी उपलब्ध झाला नाही.

२०११ ची आयपीएल कोहलीसाठी स्वप्नवत राहिली, त्याने आणि त्याचा टीममेट ख्रिस गेलने रन्सचा पाऊस पाडला. गेल सर्वाधिक रन्स करणाऱ्या खेळाडूच्या यादीत पहिल्या तर कोहली दुसऱ्या स्थानी राहिला. रॉयल चँलेंजर्स देखील स्पर्धेचे उपविजेते राहिले. त्यानंतर कोहलीचा फॉर्म उत्तरोत्तर बहरत  गेला. २०१३ साली तो रॉयल चँलेंजर्सचा कॅप्टन झाला. रॉयल चँलेंजर्सने युवा खेळाडू करारांतर्गत टीममध्ये घेतलेला प्लेअर भारतीय संघाचा आधारस्तंभ बनू लागला. त्यामुळे प्रत्येकवेळी रॉयल चँलेंजर्सने विराट कोहलीला आपल्या संघात कायम ठेवलं आणि विराट कोहलीचा कधीच लिलाव झाला नाही. आयपीएलच्या आत्तापर्यंतच्या सर्वच सिझनमध्ये एकाच संघाचं प्रतिनिधित्व करणारा देखील विराट एकमेव खेळाडू ठरला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.