PM केअर्स मधून रुग्णांना बरं करण्यासाठी दिलेले व्हेंटीलेटर्स स्वतःच आजारी आहेत….

पंजाबमधील फरीदाकोट स्थित गुरु गोबिंदसिंह मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल. इथं जवळपास ३०० कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यात ३२ जण व्हेंटिलेटरवर होते. आज सकाळी अचानक यातील काही व्हेंटिलेटर्स थोड्या-थोड्या अंतराने रुग्णांवर उपचार सुरु असतानाच बंद पडले. मात्र सुदैवाने यादरम्यान कोणतीही जीवितहानी घडली नाही.

पण इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार हे सर्व व्हेंटीलेटर्स PM केअर्समधून या हॉस्पिटलला मिळाले होते. तस पहिले तर जवळपास ८० व्हेंटीलेटर्स या हॉस्पिटलला मिळाले होते. मात्र त्यातील आता तब्बल ७१ व्हेंटीलेटर्स आता पर्यंत बंद पडले आहेत.

यावर बाबा फरीद युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सचे कुलपती म्हणाले, 

पीएम केअर्स फंडमधून मिळालेल्या व्हेंटीलेटर्सची गुणवत्ता खूपच खराब आहे. हे व्हेंटीलेटर्स रुग्णांवर उपचार सुरु असताना अचानक बंद पडतात. त्यामुळे आम्ही रुग्णांच्या जीवाला पोहोचत असलेला धोका लक्षात घेऊन त्याचा वापर करू शकत नाही.

मागच्या काही दिवसांमध्ये अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार १० मे रोजी पंजाबमधीलच मोहाली शहरातील आयव्हीव्हाय हॉस्पिटल आणि ग्रेसीयन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या दोन्ही ठिकाणचे PM केअर्समधून मिळालेले २० व्हेंटीलेटर्स खराब निघाले आहेत. त्यानंतर या दोन्ही हॉस्पिटल्सनी जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून ते तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.

उत्तरप्रदेश :

तर उत्तरप्रदेशमधील इटावा स्थित सरकारी हॉस्पिटलमधील कोरोना सेंटरमध्ये सध्या १८ व्हेंटीलेटर्स उपलब्ध आहेत, पण त्यातील एक देखील वापरला जात नाही. लखनऊच्या लोकबंधु हॉस्पिटलमध्ये देखील हिच अवस्था आहे.

महाराष्ट्र : 

महाराष्ट्रामध्ये तर मागच्या काही दिवसांच्या कालावधीत अशा बऱ्याच घटना समोर आल्या आहेत. नुकतचं पुण्यामध्ये पीएम केअर फंडातून मिळालेले ५८ व्हेंटिलेटर खराब निघाले होते. याबाबत ससून रुग्णालयाचे डिन डॉ. मुरलीधर तांबे यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आढावा बैठकीत तक्रार देखील केली होती.

यात ससून मधील २५ पैकी २१ व्हेंटिलेटर्स बंद होते. अखेरीस एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात महापौरांनी ते स्वतः लक्ष घालून दुरुस्त करवून घेतले.

तर औरंगाबादमधील घाटी हॉस्पिटलला जवळपास १५० व्हेंटिलेटर दिले होते. मात्र खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या आरोपांनुसार, हे व्हेंटीलेटर्स काहीच कामाचे नाही. घाटी हॉस्पिटल त्याचा वापरच करू शकत नाही. त्यामुळे ते खासगी हॉस्पिटलला देण्यात आले. मात्र खासगी हॉस्पिटलही त्याचा वापर करु शकत नाहीत. 

बीडमध्ये देखील अशीच घटना २ दिवसांपूर्वी समोर आली होती. इथल्या लोखंडी सावरगाव मधील वृद्धत्व उपचार व मानसिक आरोग्य केंद्र आणि स्त्री हॉस्पिटल या दोन संस्थांमध्ये उभारलेल्या जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये तब्बल ६६ आणि स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटलमध्ये १७ व्हेंटीलेटर्स नादुरुस्त असल्यानं धुळखात पडले असल्याचं समोर आलं होतं.

नाशिकमधील महापालिकेच्या रुग्णालयासाठी पाठविण्यात आलेले तब्बल ६० व्हेंटीलेटर्स अर्धवट स्थितीत असल्याचं वृत्त मागच्या आठवड्यात महाराष्ट्र टाईम्सनं दिलं होतं. या व्हेंटीलेटर्सचे काही सुटे भाग या हॉस्पिटलला अजून पण मिळाले नसल्यामुळे त्यांचं इन्स्टॉलेशन थांबलं होतं.

सोबतचं यापूर्वी जून महिन्यात पाठविण्यात आलेल्या ३५ व्हेंटीलेटर्सपैकी ४ व्हेंटीलेटर्स नऊ महिन्यांचा कालावधी उलटला तरी अजून देखील ना दुरुस्त आहेत. संबंधित कंपनीकडून या व्हेंटीलेटर्सचे सुटे पार्ट मिळाले नसल्याचं सांगण्यात येत आहे. 

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार झारखंडच्या हजारीबागमध्ये देखील ३८ पैकी तब्बल ३५ व्हेंटीलेटर्स खराब होऊन पडले आहेत.

तर राजस्थानच्या भिलवाडामधील महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये मागच्या अनेक दिवसांपासून जवळपास ३७ व्हेंटीलेटर्स बंद होते. नुकतेच ते प्रशासनाकडून दुरुस्त करण्यात आले आहेत, मात्र कधी बंद पडतील याची खात्री नाही असं इथल्या डॉक्टरांच म्हणणं आहे.

छत्तीसगड :

तर छत्तीसगडमधील बालोद जिल्हा हॉस्पिटलमध्ये ६ व्हेंटिलेटर्स आहेत. पण फक्त दोनच इन्स्टॉल करण्यात आले आहेत. केंद्राकडून पीएम केअर्समधून जवळपास २३० व्हेंटिलेटर्स मिळाले होते. पण पाठवलेले अनेक व्हेंटिलेटर्स काम करत नाहीत, असा दावा छत्तीसगड सरकारनं केला आहे.

तर देशातील इतर देखील बऱ्याच ठिकाणी कुठं प्रशिक्षित स्टाफ नाही, कुठे वायरिंग नाही, तर कुठे अडाप्टर नाही म्हणून पीएम केअर्समधील व्हेंटीलेटर्स बंद असल्याचं वारंवार समोर आलं आहे.

पंतप्रधानांनी १३ मे २०२० रोजी पीएम केअर्समधून २ हजार कोटी रुपये ५० हजार मेड इन इंडिया व्हेंटिलेटर बनवण्यासाठी दिले असल्याचं सांगितलं होतं. 

त्यापैकी एका हिंदी वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार एप्रिल अखेरपर्यंत जवळपास ३० हजार व्हेंटीलेटर्स खरेदी करण्यात आले आहेत. मात्र रुग्णांना आजारातून बरं करण्यासाठी तयार करण्यात आलेले व्हेंटीलेटर्स आज वर्षभरानंतर स्वतःच आजारी असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे या व्हेंटीलेटर्सवर आज देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

असा आहे या व्हेंटीलेटर्सचा इतिहास… 

पंतप्रधानांनी घोषित करण्यापूर्वीच मार्च २०२० मध्ये नोएडाच्या AgVa नावाच्या कंपनीने सरकारसोबत १० हजार व्हेंटिलेटर तयार करण्याचा करार केला. त्यानंतर या कंपनीचा व्हेंटिलेटर १६ मे रोजीच्या पहिल्या क्लिनिकल चाचणीत फेल ठरला. १ जून २०२० रोजी दुसरी क्लिनिकल चाचणी झाली, त्या चाचणीतही हा व्हेंटिलेटर फेल ठरला.

यानंतर आणखी दोन कंपन्यांना कंत्राटही देण्यात आले. यापैकी एक आंध्राची सरकारी कंपनी AMTZ होती. तर दुसरी गुजरातची खाजगी कंपनी Jyoti CNC. ऑगस्ट २०२० मध्ये एका माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की,

या दोन्ही कंपनीचे व्हेंटिलेटर क्लिनीकल चाचण्यांमध्ये फेल झाले आहेत.

यानंतर HLL या सरकारी कंपनीमार्फत AMTZ कंपनीला दिलेले १३ हजार ५०० व्हेंटीलेटरचे कंत्राट १० हजार पर्यंत कमी केले. हेच कंत्राट चेन्नईस्थित कंपनी Trivitron या कंपनीला हे वेगळे कंत्राट दिले गेले.

या नव्या कंत्राटात Trivitron कंपनीला ३ हजार ऍडव्हान्स व्हेंटीलेटर आणि ७ हजार बेसीक व्हेंटिलेटर तयार करण्यासाठी ३७३ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार Trivitron ने व्हेंटिलेटर बनवले. परंतु, निविदा मागे घेण्यावरुन MMTZ व HLL यांच्यात चढाओढ झाली. या चढाओढीमध्ये Trivitron ला डिस्पॅच ऑर्डर मिळाली नाही. यामुळे एकाही व्हेंटीलेटरचा पुरवठा सरकारला Trivitron कडून होऊ शकला नाही.

अलीकडेच AgVa चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिवाकर वैश यांनी सांगितलं कि, सरकारच्या ऑर्डरनुसार आम्ही १० हजार व्हेंटीलेटर्स बनवले आहेत, पण एका वर्षानंतर देखील सरकार ५ हजार डिव्हाईस उचलू शकले आहे. ५ हजार अजून देखील आमच्या गोडाऊनमध्ये पडून आहेत. त्यामुळे सरकारच्या व्हेंटीलेटर्स आज देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.