मोदींच्या नव्या प्लॅननुसार आता मंत्र्यांच्या टिफिन बैठका होणारेत

शाळेत असताना दोन प्रकारची पोरं असायची. एक लई वांड आणि दुसरी शर्टाचं वरचं बटन लावून येणारी. आता प्रत्येक वर्गाची वांड पोरं वेगळी, त्यामुळं त्यांच्यात फिक्स राडा व्हायचा. वरचं बटन लाऊन येणारी पोरं वेगेवगळ्या वर्गात असली, तरी कायम निवांत असायची. शाळेत काय संमेलन वैगरे असलं की या कार्यकर्त्यांची मिटिंग व्हायची. तेही एकदम धीरगंभीर वातावरणात.

आता हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतंच आपल्या मंत्रिमंडळाचं ‘चिंतन शिबीर’ घेतलं.

मंत्रिमंडळाच्या एकूण पाच बैठका झाल्या. या पाचही बैठकांच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. या बैठकांना ‘चिंतन शिबीर’ असं नाव देण्यात आलं.

या बैठकीत नेमके काय निर्णय झालेत?

सगळ्यात मुख्य निर्णय म्हणजे मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या ७७ मंत्र्यांचं आठ वेगवेगळ्या गटांमध्ये विभाजन करण्यात आलं आहे. सरकारच्या कामकाजातली पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि मोदी सरकारच्या दक्षतेत वाढ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांनी पाळावयाची व्यक्तिगत दक्षता, मंत्रालयांचं कामकाज आणि सगळ्यांना सोबत घेऊन काम करणं अशा मुद्द्यांवर अनौपचारिक चर्चा झाली. केंद्र सरकार राबवत असलेल्या योजना प्रभावीपणे राबवण्याबाबतही बैठकीत चिंतन झालं. सोबतच एका बैठकीचा विषय पक्षांतर्गत ताळमेळ आणि संवाद हा होता.

एका बैठकीत मंत्र्यांसोबतच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती वंकय्या नायडू ही सहभागी झाले होते. त्या बैठकीचा विषय ‘संसदीय कामकाज’ असा होता.

मंत्रिमंडळाचं आठ गटांत विभाजन करताना प्रत्येक गटात ९ ते १० मंत्री असतील. एका केंद्रीय मंत्र्याकडे गटाची जबाबदारी देण्यात येईल.

या गटांकडे कोणती कामं असतील?

प्रत्येक मंत्रालयाचं पोर्टल तयार करणं. त्यावर केंद्राच्या प्रमुख योजना, धोरणं आणि कामगिरीबाबत अपडेट देणं. मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती देणारं डॅशबोर्ड तयार करणं. सोबतच बैठकांचं वेळापत्रक आणि पत्रव्यवहार सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी यंत्रणा तयार करणं.

एका गटाकडे संशोधन, कम्युनिकेशन आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांवर प्रभुत्व असणाऱ्या किमान तीन व्यावसायिकांची टीम तयार करण्याचं काम देण्यात आलं आहे. निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांचे अनुभव आणि सल्ले नोंदवण्याचं काम एक गट करेल.

या बैठकीत आणखी एक निर्णय झाला, तो म्हणजे ‘टिफिन बैठकांचा’. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांनी टिफिन बैठकांचा प्रयोग केला होता. यानुसार मंत्री आपापला डबा घेऊन येतील आणि भोजन करता करता कामकाजावर चर्चा करतील. मंत्र्यांमधला ताळमेळ वाढवण्यासाठी मोदींनी टिफिन बैठकांचा प्रस्ताव मांडला आहे.

मंत्री तीन, गाडी एक

टिफिन बैठकांसोबतच मोदींनी आपल्या मंत्र्यांना ‘कारपूल’चा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. एका गाडीतून तीन-चार मंत्री एकत्र बैठकीला येऊ शकतात. यामुळं आगामी निवडणुकांसाठी पक्ष संघटना मजबूत होईल असा यामागचा विचार आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.