आधीच सुरु असलेल्या मार्गांचं मोदींच्या हस्ते उदघाटन, पण गोष्ट मुंबईकरांच्या फायद्याची आहे…

१९ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईला येणार आहेत. या दौऱ्याची जय्यत तयारी सुद्धा सुरू आहे. या दौऱ्यामागचं कारण म्हणजे बऱ्याच विकासकामांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय असलेलं एक कारण म्हणजे, मोदींच्या हस्ते मुंबईमधल्या दोन मेट्रो लाईन्सचं उद्घाटन होणार आहे.

मुंबई मेट्रो २-अ आणि मुंबई मेट्रो-७ या दोन लाईन्सचं उद्घाटन होणार आहे.

मेट्रो २-अ ही लाईन मुंबईतल्या दहीसर पुर्व पासून ते अंधेरी पश्चिमेला डी एन नगर पर्यंत जोडली जाणार आहे.

या डी एन नगर मेट्रो स्टेशन हे मुंबई मेट्रो-१ मध्ये सुद्धा आहे. त्यामुळे, इथून पुढे अंधेरी रेल्वे स्टेशन, पूर्वेतल्या साकीनाका, एअरपोर्ट रोड ते थेट घाटकोपर या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग उपलब्ध असेल.

मुंबई मेट्रो-७ ही लाईन दहीसर पूर्व ते अंधेरी पूर्व अशी आहे.

दहीसर पूर्व हा पहिला स्टॉप असणार आहे तर, अंधेरीला गुंदवली स्टेशनला या लाईनचा शेवटचा स्टॉप असेल. या गुंदवली मेट्रो स्टेशनपासून मेट्रो लाईन-१ मधलं अंधेरी वेस्टर्न एक्सप्रेस वे मेट्रो स्टेशन अगदी जवळ आहे. त्यामुळे, मेट्रो-७ लाईन सुरू झाल्यावर इथून अंधेरी पश्चिमेतल्या मेट्रो स्टेशन्स आणि पुर्वेतले एअरपोर्ट रोड, साकीनाका पासून ते घाटकोपर पर्यंत मेट्रोने जाणं शक्य होईल.

आताच्या घडीला मुंबईमध्ये कोणत्या मेट्रो लाईन्स सुरू आहेत ते ही बघुया.

मुंबई मेट्रो-१ ही सर्वात पहिली मेट्रो लाईन मुंबईमध्ये सध्या सुरू आहे. ही लाईन अंधेरी पश्चिमेतल्या वर्सोवा पासून अंधेरी रेल्वे स्टेशन पुढे अंधेरी पश्चिम ते घाटकोपर असा प्रवास करते.

मुंबई मेट्रो-२अ या लाईनचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार असलं तरी, आताही ही लाईन अंशत: सुरूच आहे. दहीसर पुर्वपासून ते कांदिवलीच्या डहाणुकर वाडी पर्यंतचा मार्ग आताही सुरू आहे.

मुंबई मेट्रो-७ या लाईनचंही उद्या पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत. असं असलं तरी ही लाईन आताही दहीसर पूर्व ते गोरेगावमधल्या आरे कॉलनीपर्यंत सुरू आहे.

या मेट्रो लाईन्सच्या उद्घाटनाचा मुंबईकरांना बऱ्यापैकी फायदा होण्याची शक्यता आहे.

या दोन मेट्रो लाईन्सचं उद्घाटन झाल्यानंतर मुंबई उपनगरातील दहीसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी आणि अंधेरी पासून ते घाटकोपर पर्यंत एक जाळं तयार होईल. या भागात राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या नागरिकांसाठी प्रवासाचा एक सहज आणि वेगवान पर्याय म्हणून मेट्रो समोर येईल.

यामुळं मुंबई लोकल ट्रेन आणि बेस्ट बस उपक्रमावरील ताण काही अंशी कमी होईल. तर, खाजगी वाहनं रोजच्या प्रवासासाठी वापरणाऱ्यांची संख्याही कमी होऊ शकते असा अंदाज वर्तवला जातोय. त्यामुळे, काही अंशी का होईना पण ट्रॅफिकची समस्याही कमी होईल असं म्हटलं जातंय.

याशिवाय असलेला एक मुद्दा म्हणजे, अंदाजाप्रमाणे खाजगी वाहनांची संख्या कमी झाली तर भविष्यात मुंबईतलं वायू प्रदुषण आटोक्यात राखायलाही मदत होईल.

भविष्यात मुंबईतलं मेट्रोचं जाळं आणखी वाढणार आहे.

मुंबईतलं मेट्रोचं हे जाळं आणखी १४ मेट्रो लाईन्स सुरू करून संपुर्ण मुंबईसह ठाणे आणि मिरा-भाईंदरपर्यंत वाढवलं जाणार आहे. त्यामुळे, भविष्यात मुंबईअंतर्गत प्रवासासाठी मेट्रो हा एक उत्तम पर्याय म्हणून समोर येईल असं बोललं जातंय.

उद्याच्या उद्घाटनासाठी जय्यत तयारीही झालेली आहे.

मुंबईमध्ये ठिकठिकाणी पंतप्रधान मोदी यांच्यासह शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे मोठ मोठाले कटआऊट्स लावण्यात आले आहेत. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी पंतप्रधानांसोबत मुंबईत असणार आहेत. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा दावोसचं वर्ल्ड इकोनॉमिक फोरम अर्धवट सोडून मुंबईत येणार असल्याचं बोललं जातंय.

वांद्रे कुर्ला काँप्लेक्स इथे पंतप्रधान मोदी भाषण करण्याचीही शक्यता आहे. तर, या भाषणातून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक नजरेसमोर ठेऊन आणखी काही घोषणा करतील अशी चर्चाही आहे.

उद्घाटन कार्यक्रमासोबतच मोदी आणखी काही घोषणा करतायत का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.