नरेंद्र मोदी हे देहू संस्थानला भेट देणारे पहिले पंतप्रधान असणार आहेत..

काहीही झालं तर यंदा माघार नाही. गेल्या दोन वर्षांपासून रखडेलेली पंढरपूर वारी यंदा होणारच… 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली आणि एकच उत्साह अक्ख्या महाराष्ट्रात संचारला. आषाढ आलाय आणि पांडुरंगाच्या पायाचं दर्शन नाही, अशी दोन वर्ष गेली. नाईलाज होता. पण आता विठुरायाने बोलावलंय, जाया लागतंय…

असं म्हणत जोरदार तयार सुरु झालीये. 

१० जुलैला यंदा आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे. पंढरपूर सज्ज झालंय. वारकरी सज्ज झालेत. गण गण गणात बोते म्हणत श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं शेगावमधून ६ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान झालंय. १० जूनला श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या मानाचा अश्व बेळगावातून श्री क्षेत्र आळंदीकडे निघालाय.

२० जूनला अश्व आळंदीला पोहोचेल आणि मग २१ जूनला माउलींचा पालखी सोहळा आळंदीतून पंढरपूरकडे जाणारेय. त्या अगोदर संत तुकाराम महाराजांची पालखी २० जून रोजी देहूमधून प्रस्थान ठेवणार आहे.

दरम्यान देहूमध्ये इतिहासात नमूद केली जाईल, अशी मोठी घटना घडणार आहे. ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूला भेट देणार आहेत. 

 देहू संस्थानाला भेट देणारे ते पहिले पंतप्रधान ठरणार आहेत.. 

कारण याआधी कोणत्याही पंतप्रधानांनी देहूला भेट दिल्याची नोंद नाही, असं देहू मंदिर ट्रस्टी आणि तुकाराम महाराजांचे वंशज भानुदास महाराज मोरे यांनी बोलभिडू सोबत बोलताना सांगितलं आहे. 

१४ जून ही तारीख ठरवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार म्हणून जोरात तयारी सुरुये. पण भेट देण्याचं कारण काय?

उत्तर आहे ,

शिळा मंदिराचं उदघाटन.

धार्मिक स्थळांवर काही ठिकाणं असतात ज्यांचं माहात्म्य आणि पावित्र्य मोठं असतं. भाविकांची श्रद्धा त्या ठिकाणांशी जास्त जोडलेली असते. देहू ही संत तुकारामांची कर्मभूमी. त्यांनी त्यांच्या अनेक साहित्यिक रचना इथेच रचल्या. गाथा देखील रचली. या गाथेचा देखील मोठा प्रसंग आहे. 

असं सांगितलं जातं, तुकाराम महाराजांना अडवणारे, त्यांच्या मार्गात अडथळे आणणारे अनेक लोक होते. सगळ्याच संतांना अशा कर्मठ लोकांना तोंड द्यावं लागलंय. तुकाराम महाराजांवर देखील असाच प्रसंग उद्भवला होता. महाराजांनी गाथा लिहिली होती, ईर्षा भावनेतून काही लोकांनी ती इंद्रायणी नदीत विसर्जित केली होती. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांची ती गाथा होती.

तेव्हा आपला संसार आणि परमार्थ दोन्ही बुडालं आहे, या भावनेतून तुकाराम महाराजांनी इंद्रायणी काठी बसूनच गाथा परत वर येण्याची वाट बघण्याचा निर्णय घेतला. 

सलग १३ दिवस महाराज अन्न पाण्याशिवाय नदीतीरी बसून होते. अखेर १३ दिवसांनंतर अगदी चमत्कारिक रित्या गाथा पाण्यातून वर आल्या… अनेकांनी आजी-आजोबांकडून, प्रवचनकारांकडून ऐकलेला हा प्रसंग. महाराष्ट्राच्या धार्मिक ग्रंथांतही याचा उल्लेख करण्यात आला आहे.  

WhatsApp Image 2022 06 11 at 6.09.26 PM

आता ही आख्यायिका आहे की सत्य, हा विषय वेगळा. मात्र वारकरी संप्रदायातील भाविकांची ही श्रद्धा आहे.

या कथेनुसार तुकाराम महाराज गाथा वर येण्याची वाट बघताना ज्या शिळेवर बसले होते, तीच ही शिळा आहे, जिचं मंदिर बांधण्यात आलंय.

इतक्या वर्षांनी आता मंदिर बांधण्याचं कारण काय?

२००८ सालची गोष्ट आहे. देहू संस्थानातून तुकाराम महाराजांचा चांदीचा मुखवटा चोरीला गेला होता. काही दिवसांतच तो परत मिळाला होता. ते ठिकाण म्हणजे इंद्रायणी नदीचा तीर. या घटनेनंतर ही जागा संरक्षित करण्याचं संस्थानाने ठरवलं होतं. त्याच ठिकाणी ही पवित्र शिळा देखील आहे. 

तेव्हा संस्थानाने ही शिळा आत आणत तिचं मंदिर उभारण्याचा देखील निश्चय केला, जेणेकरून अजून सुरक्षा होईल आणि भाविकांना देखील दर्शन सुलभ होईल. 

१८ आक्टोबर २००८ साली जेव्हा प्रतिभाताई पाटील देशाच्या राष्ट्रपती होत्या तेव्हा त्यांनी देहूला भेट दिली होती. त्याचवेळी त्यांच्या हस्ते या शिळा मंदिराची पायाभरणी करण्यात आली होती. 

अनेक अडचणीनंतर आता २०२२ साली अखेर हे मंदिर बांधून तयार झालं आहे. तुकाराम महाराजांचं आयुष्य हे ४२ वर्षांचं होतं म्हणून या मंदिराची उंची देखील ४२ फूट ठेवण्यात आली आहे, तर मंदिरातील महाराजांची मूर्ती देखील ४२ इंचाची आहे. 

या मंदिराचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रित करण्यात आलं होतं. मोदींनी देखील निमंत्रण स्वीकारत येण्याची घोषणा केली आहे. तुकाराम महाराजांच्या सन्मानार्थ पंतप्रधान मोदी हे शिळा मंदिर देशाला अर्पण करणार आहेत. तसंच पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या भाविकांशी देखील पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहेत.

WhatsApp Image 2022 06 11 at 6.08.50 PM

तसं बघितलं तर यामागे राजकीय दृष्टिकोन देखील आहेच. 

या वर्षी राज्यात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. भाजपची राज्यात सध्या काय स्थिती आहे, हे देखील सर्वश्रुत आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असून भाजप विरोधी पक्ष आहे. आघाडी सरकारचं कार्य देखील असं सुरु आहे की ते भाजपला काट्याची टक्कर देत आहेत. 

मोदी लाट आली तेव्हा फडणवीसांचं आणि सेनेचं युतीचं सरकार स्थापन झालं. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत झालेल्या वादाने युती झाली नाही आणि परिणामी महाविकास आघाडी सत्तेत आली. तेव्हापासून भाजप परत महाराष्ट्रावर सत्ता मिळवण्यासाठी धडपडत आहे. 

प्रत्येक निवडणुकीत हे दिसून येतंय. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीचं सगळं चक्र हे ताजं उदाहरण आहे. महाराष्ट्रातील मोठा जनसमुदाय वारकरी संप्रदायाचा आहे. त्यामुळे सगळेच पक्ष त्यांच्याशी बांधिलकी ठेवण्याच्या प्रयत्नात असतो. हेच राजकारण आहे. 

मोदींची ही महाराष्ट्र भेट आणि तीही महाराष्ट्राचं श्रद्धा स्थान असलेल्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर, तेही देहू सारख्या महत्वाच्या ठिकाणी…

हे विचार करायला लावणारं आहे. नवीन स्थापन झालेल्या देहू नगर पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. अशात मोदींची ही देहू भेट भाजपसाठी औचित्य ठरू शकतं, असं जाणकारांचं म्हणणं आहे. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.