पंतप्रधान मोदींच्या मते क्वाडमुळे जगात शांतता नांदेल… पण त्यांचा इशारा चीनकडे देखील होता

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांचा हा दौरा भारतासाठी अनेक दृष्टीने महत्वाचा मानला जातोय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी क्वाड शिखर परिषद २०२१ मध्ये भाग घेतला. त्यामुळे आता अमेरिका दौरा आणि त्यात ही क्वाड बैठक चर्चेचा विषय बनलीये.

तर QUAD म्हणजे क्वाडिलेटरल सिक्युरिटी डायलॉग.

२००४ मध्ये हिंदी महासागरातल्या त्सुनामीनंतर भारत, जापान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या चौघांनी मिळून याची स्थापना केली. ज्याला आधी ‘त्सुनामी कोर ग्रुप’ असं नाव देण्यात आलं होतं.  

याचा उद्देश, त्सुनामीमध्ये अडकलेल्या लोकांना मदत पुरवणं, त्यांना सुरक्षा प्रदान करणं, पुनर्वसन करणं होत. पण मिशन संपलं आणि हे देशही वेगळे झाले. पण अमेरिकेन हि संघटना एका नव्या स्वरूपात पुढे आणण्याचा प्रस्ताव मांडला ज्याच नाव होतं क्वाडिलेटरल सिक्युरिटी डायलॉग अर्थात QUAD. 

या संघटनेचे उद्दिष्ट आधी सुरक्षेचा संवाद साधणं होता, पण हळू हळू हा सुरक्षा संवादाचा उद्देश चीन विरुद्ध गेला. कारण हिंदी महासागरात चीनचा प्रभाव वाढत होता. त्यामुळे चीनच्या प्रभुत्वाला कमी करायचं, त्यांच्या विस्तारवादी धोरणांना आळा घालायचा आणि हिंदी महासागराला कोणत्याही देशाच्या प्रभावापासून मुक्त ठेवायचं हे या क्वाडच नवीन उद्देश बनलं.  

आता या १७ वर्षात क्वाडच्या अनेक बैठक झाल्या. अनेक मुद्द्यावर चर्चा झाली. अनेक निर्णयही त्यादृष्टीने घेण्यात आले. 

आता याच साखळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात ही क्वाड शिखर परिषद घेण्यात आली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचं समजतयं. यात कोरोनावरील व्हॅक्सिन आणि पुरवठा यासोबतच अफगाणिस्तानमधील पाकिस्तानची भूमिका आणि दहशतवादामध्ये त्याच्या सहभागाचा हा मुद्दा देखील उपस्थित केला गेलाय. 

भारताबरोबरच अमेरिकेनेही यावर भर दिला. कारण दोन्ही देशांना अफगाणिस्तानातील दहशतवादाचा सामना करण्याचे महत्वाचे वाटत आहे.

यात भारताची डोकेदुखी पाकिस्तान आहे आणि अमेरिकेची तालिबान. या क्वाड बैठकीत अफगाणिस्तानच्या तालिबान आणि पाकच्या दहशतवादी कारवायांवर देखील चर्चा करण्यात आली. या क्वाड बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,

QUAD एक ‘फोर्स फॉर ग्लोबल गुड’ म्हणून काम करेल. सोबतच मला विश्वास आहे की,

QUAD मधील आमचे सहकार्य हिंद-प्रशांत महासागरात तसेच संपूर्ण जगात शांतता आणि समृद्धी सुनिश्चित करेल.

आता पंतप्रधान आणि QUAD चा इशारा हा चीनकडे देखील होता. यामागे दोन महत्त्वाची कारणे असल्याचे बोलले जातयं. पहिलं म्हणजे हिंदी महासागरात चीन आपल्या हालचाली वाढवतयं. आणि दुसरे म्हणजे अफगाणिस्तानातल्या तालिबान्यांना खूलं समर्थन देत आहे. त्यामुळे चीनच्या या कुरघोड्यांना वेळीचं लगाम घातला गेला पाहिजे, असं या चारही देशांचे मत आहे.

क्वाड देश नौदल आणि इतर बाबींमध्ये त्यांच्या कौशल्याचा लाभ घेऊ शकतात. याद्वारे दक्षिण चीन सागर प्रदेशातील चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल.

आता या चारही देशांच्या बैठकीमुळे चीनला एक प्रकारे धास्तीचं बसली असल्याचं तज्ज्ञांचे मत आहे. तर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी माध्यमांना सांगितले की,

चार गटांनी कोणत्याही तिसऱ्या देशाला आणि त्याच्या हितांना लक्ष्य करू नये. चीन जागतिक शांततेचा निर्माता आहे, जागतिक विकासात योगदान देणारा आणि जागतिक सुव्यवस्था राखणारा देश आहे.’

आता या वक्तव्यानंतर चीन क्वाड बैठकीला घाबरलयं ते स्पष्ट दिसतयं. पण यात पुढे काय होणार हे देखील तितकचं महत्त्वाचं आहे. 

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.