लोक म्हणायलेत मोदी ड्रेस घालताना पण पुढच्या निवडणुकीचा विचार करतात
आज प्रजासत्ताक दिनाचा सोहळा. सर्व भारतीयांसाठी हा सणचं म्हणाना. या दिवशी लवकर आवरून नवे कपडे परिधान करून त्यावर आपल्या देशाचा झेंडा लावून मिरवण प्रत्येक भारतीयाला आवडतं. त्यात आणि या दिवशी लोकांच्या आवडीचं काय असेल तर दूरदर्शनवर प्रत्येक राज्याचे चित्ररथ बघणं.
या कार्यक्रमात अधून मधून आपले नेते, मंत्री, पंतप्रधान सुद्धा दिसतात. नेहमीप्रमाणे आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमा दरम्यान दिसले. आणि त्यांनी परिधान केलेला पोशाख पाहून सगळीकडे एकच बातमी फ्लॅश व्हायला लागली.
ती म्हणजे, पंतप्रधान मोदींचे मिशन इलेक्शन ? प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात उत्तराखंडची टोपी आणि मणिपूरचं उपरणं
म्हणजे काय तर, आगामी उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील पारंपारिक पोशाखाची प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी निवड केली आहे असं म्हंटल जातंय.
पण २०१५ पासून आतापर्यंतच्या प्रत्येक प्रजासत्ताक दिनाला मोदींनी खास प्रकारच्या पगडी किंवा फेटा परिधान केल्याचं दिसलं होतं. प्रजासत्ताक दिनी राजपथावरील परेड जेवढी चर्चेत असते तेवढाच मोदींचा लूकही चर्चेत असतो.
मोदी दरवर्षी प्रजासत्ताक दिनाला वेगवेगळ्या पगडी किंवा फेटा परिधान केल्याचे दिसतात. २०२० मध्ये मोदींनी बांधणीचा फेटा बांधला होता. केशरी रंगाच्या या फेट्यात पिवळा रंगही होता.
मागच्या वर्षी नरेंद्र मोदींनी गुजरातच्या जामनगरची खास पगडी परिधान केली होती. जामनगरच्या राजघराण्याकडून त्यांना ही पगडी भेट म्हणून दिली होती.
तर यावर्षी मोदींनी ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी उत्तराखंडमध्ये वापरत असलेली पारंपारिक टोपी परिधान केली आहे. पंतप्रधान मोदी यांना ब्रह्मकमळ जास्त आवडतं. त्यामुळे त्यांनी ब्रह्मकमळाच्या आकाराचा मास्क घातला आहे. ब्रम्हकमळ हे उत्तराखंडचे राज्य फूल असून केदारनाथमध्ये पूजा करताना हे फुल वापरतात. याशिवाय पंतप्रधान मोदी यांनी गळ्यात मणिपूरमध्ये वापरत असलेला गमछा घातला आहे.
उत्तराखंडची पारंपरिक टोपी म्हणजे मूळची गांधी टोपीचं आहे.
ही टोपी जुन्या काळात खेड्यांपासून शहरापर्यंत परिधान केली जायची. ही टोपी कोट किंवा बनियानच्या उरलेल्या कापडापासून सेम रंगाची बनवली जायची. मात्र बदलत्या काळात येथील संस्कृतीचे प्रतीक असलेली गांधी टोपी जास्त वापरली जात नव्हती. म्हणूनच या टोपीला आधुनिक स्वरूप देण्यात आलं. आणि ही टोपी नव्याने तरुणाईपुढे आणि जगासमोर सादर करण्यात आली. यात उत्तराखंड संस्कृतीची मूळ ओळख असलेल ब्रह्मकमळ ब्रोच असलेली आधुनिक पारंपरिक गांधी टोपी पुढं आली.
आता मणिपुरी गमछा बघू…
खरं तर लोक याला मोदींचा गमछा असं म्हणून पण ओळखतात.
मणिपूर त्याच्या खास कापडांसाठी प्रसिद्ध आहे जसे की मोइरिंग फे, लेइरम आणि फानेक मायेकनाईबी. पूर्वी विणकाम सगळीकडेच व्हायचे. पुन्हा आले यंत्रमाग. आणि यंत्रमाग हा जीवनाचा भाग बनून गेले. विणकामावर धर्म आणि प्रेमाची आभा होती.
या मणिपुरी गमछावर तिथली स्थानिक दंतकथा आणि सण समारंभाचा पगडा दिसतो. निंगथू फी, अकोईबी फी आणि समिलामी फी यांचे आकृतिबंध आणि विहीर अशी या फॅब्रिकची रचना आहे.