पंतप्रधानांनी गुजरातला पॅकेज जाहीर केलं, इतर राज्यांच्या मदतीचे काय?

देश मागच्या काही दिवसांपासून कोरोना संकटासोबतच तौक्ते या चक्रीवादळाचा देखील सामना करत आहेत. यात प्रामुख्याने प्रभाव जाणवला तो कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र्र आणि गुजरात या चार राज्यांमध्ये. त्यामुळे या चारही राज्यांच्या किनारपट्टी भागाला प्रचंड नुकसान सहन करावं लागलं आहे.

याच सगळ्या नुकसानीचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई पाहणी दौरा केला, आणि प्रशासनासोबत आढावा घेतला. यानंतर त्यांनी विशेष पॅकेजची देखील घोषणा केली आहे. मात्र आता याच प्रकरणावरून सध्या त्यांच्यावर टीका होतं असून महाराष्ट्रात राजकीय वातावरण देखील तापलं आहे.

त्याला कारण ठरलं आहे नरेंद्र मोदी यांनी केवळ गुजरात राज्याचा केलेला पाहणी दौरा आणि गुजरातला केलेली मदत.

मोदींच्या या कृतीवर राज्यातील सत्ताधारी पक्षातील मंत्री नवाब मलिक यांच्यापासून ते अगदी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यापर्यंत सगळ्यांनी मोदींवर टिका केली आहे, आणि नुकसानग्रस्त झालेल्या इतर राज्यांच काय अशा प्रश्न उपस्थित केला आहे.

नरेंद्र मोदींनी गुजरातला काय मदत जाहीर केली आहे? 

फक्त गुजरात राज्याचा दौरा आणि आढावा :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या गुजरात आणि दिव-दमनच्या नुकसानीचा पाहणी दौरा केला. यात त्यांनी प्रभावित भागाची हवाई पाहणी करत प्रशासनासोबत झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी नुकसानीच्या पार्श्वभूमीवर अहमदाबाद येथे एक बैठक देखील घेतली. या बैठकीत गुजरातचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते.

२. केवळ गुजरातला मदत : 

या सगळ्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातसोबत असल्याचे सांगत राज्यासाठी १ हजार कोटींच्या तातडीच्या मदत पॅकेजची घोषणा केली.

३. गुजरातला पाठवणार केंद्रीय पथक :

सोबतच केंद्र सरकारकडून एक अंतर-मंत्रालयीन पथक नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पाठवण्याची घोषणा केली आहे. सोबतच या पथकाच्या अहवालानुसार आणखी भक्कम मदर करणार असल्याचं सांगितलं आहे.

गुजरातमध्ये किती नुकसान झाले आहे?

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील किनारपट्टी जवळील भागातील १६ हजार पेक्षा जास्त घरांचे नुकसान झाले आहे. तर ४० हजार पेक्षा जास्त झाड उन्मळून पडली आहेत. तर ७० हजार पेक्षा जास्त विजेचे खांब पडले आहेत त्यामुळे ५ हजार ९५१ गावांमधील विजेवर परिणाम झाला आहे.

जवळपास ४५ जण मृत्युमुखी पडले असून आता पर्यंतचे हे सर्वात भयावह चक्रीवादळ असल्याचे रूपणी यांनी सांगितले आहे.

इतर राज्यांसाठी काय मदत जाहीर केली आहे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात वगळता ज्या राज्यांना तडाखा बसला आहे त्या राज्यातील मृतांना २ लाख आणि जखमी रुग्णांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. सोबतच इतर प्रभावित राज्यांच्या सोबत सतत संपर्कात असून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.

तर या राज्यांकडून नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारला प्राप्त झाल्यानंतर त्यांना देखील मागणीनुसार आर्थिक देण्यात येईल अशी देखील घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.

इतर राज्यांमध्ये किती आणि कसे नुकसान झाले आहे?

महाराष्ट्र :

महाराष्ट्रामध्ये या चक्रीवादळामुळे २ हजार ५०० घरांची अंशत: तर ६ घरांची पूर्णतः पडझड झाली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा  अशा जिल्ह्यांना फटका बसला आहे. सोबतच किनारपट्टी भागातील हजारो एकर शेतीला देखील फटका बसला असल्याचे सांगण्यात आले आहे.

आता पर्यंत या चक्रीवादळामध्ये महाराष्ट्रात ६ जणांचा मृत्यू तर ९ जण जखमी झाले आहेत, सोबतच १२ हजार ५०० प्रभावित लोकांना सुरक्षितस्थळी हलण्यात आले होते.

मुख्यमंत्र्यांनी संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी चर्चा करून सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तर शुक्रवारी ते नुकसानग्रस्त भागांचा दौरा करण्यासाठी कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. तर सध्या प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यानंतर तात्काळ मदतीची घोषणा केली जाईल असे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज कोकणचा दौरा केला. यात त्यांनी एकट्या रायगडमध्ये जवळपास ८ ते १० हजार घरांचं नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर तब्बल ५ हजार हेक्टरमध्ये फळपिकांचं नुकसान झालं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. यानंतर त्यांनी राज्य सरकारने तातडीने आणि भरगोस मदत करावी अशी मागणी केली आहे.

२. कर्नाटक :

कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड, उडपी, उत्तर कन्नड, कोडागु, शिवमोगा, चिकमंगलुरू, हासन या जिल्ह्यांना फटका बसला आहे. या भागातील ७३ गाव आणि १७ तालुके वादळामुळे प्रभावित झाले आहेत. तर ११२ घरांची पडझड झाली आहे. यात शेकडो लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे.

३. गोवा :

तर या चक्रीवादळामुळे गोव्यात सुमारे ४० कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे. सोबतच राज्यात २४ मे ला सकाळी ७ ला कर्फ्यूची मुदत संपत आहे त्यापूर्वी शनिवारी कोरोनाच्या स्थिती संदर्भात आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

आज राज्याच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर बार्देश तालुक्याला सर्वात मोठा फटका बसला असल्याचं देखील मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितलं आहे. त्यानंतर त्यांनी राज्यातील मृतांना आणि जखमींना मदतीची घोषणा केली आहे.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.