नीती आयोग ते गतिशक्ति योजना; आपल्या ८ भाषणांमध्ये पंतप्रधानांनी हे मुद्दे मांडले आहेत…

आज ७५ वा स्वातंत्रदिन सगळ्या देशभरात मोठया उत्साहाने साजरा केला जातोय. ठिकठिकाणी राष्ट्रगीत गाऊन ध्वजारोहन केलं जातंय. प्रत्येक भारतीयासाठी हा दिवस खास असतो, पण या दिवशी लाल किल्ल्यावर पंतप्रधानांचं होणार भाषण देखील तितकचं महत्वाचं असत.

लाल किल्ल्यावर स्वातंत्रदिनाचा सोहळा काही औरच असतो. देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते इथं राष्ट्रध्वज फडकावला जातो. त्यानंतर त्यांनी देशाला संबोधून केलेलं भाषण हे अत्यंत महत्वाचे असते. त्यावेळी मंत्रिमंडळातील मंत्री, संरक्षण दलातील अधिकारी, एनसीसीचे कॅडेट, हजारो देशवासी उपस्थित असता.

आजही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या कार्यकाळातल्या आठव्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्राला संबोधित केलं. त्यात त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भर दिला. हे मुद्दे तर आपण पाहणारच आहोत, पण त्यासोबतच त्यांनी आजपर्यंत केलेल्या भाषणांमधील प्रमुख मुद्दे देखील पाहणार आहोत. 

२०१४ :

भारताच्या ६८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त २०१४ मध्ये लाल किल्ल्यावरील आपल्या पहिल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी परंपरेपासून दूर जात भारताबद्दलच्या त्यांच्या दृष्टिकोनावर भरभरून बोलले.

सोबतच त्यांनी योजना आयोग रद्द करण्याची घोषणा करत, एक नवीन संस्था अर्थात नीति आयोगाची घोषणा केली होती. जी देशाच्या संघराज्य संरचनेला अधिक बळकट करणारी ठरेल असा आशावाद व्यक्त करण्यात आला होता. 

आपल्या पहिल्या भाषणात त्यांनी स्वच्छतागृह आणि स्वच्छतेचा मुद्दाही उपस्थित केला आणि वर्षभरात सर्व सरकारी शाळांमध्ये मुलींसाठी स्वतंत्र शौचालये देण्याचे आश्वासन दिले होते.

२०१५ :

२०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्रदिनाच्या आपल्या दुसऱ्या भाषणात गेल्या वर्षभराचं आपल्या सरकारचं रिपोर्ट कार्ड आणि दिलेल्या आश्वासनाचा आढावा जनतेसमोर मांडला.

आपल्या पूर्वीच्या “मेक इन इंडिया” आणि “डिजिटल इंडिया” प्रमाणे, पीएम मोदींनी “स्टार्ट-अप इंडिया, स्टँड अप इंडिया” हा नवीन नारा दिला. लोकांना नवीन उपक्रम आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी विशेषत: दुर्बल घटकांशी संबंधित लोकांना पाठिंबा देण्याचा हा यामागचा हेतू होता.

आपल्या भाषणात त्यांनी बँकांना त्यांच्या प्रत्येक शाखेतून किमान एक आदिवासी किंवा दलितांना कर्ज देण्याचे आवाहन केले. सोबतच पुढच्या एक हजार दिवसात देशातील प्रत्येक गावात विद्युतीकरण होईल, असे आश्वासन दिले.

२०१६:

आपल्या तिसऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी नव्याने आणलेल्या वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) प्रशंसा केली. त्यांनी जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेला बळ मिळाल्याचं सांगत सर्व पक्षांचं जीएसटी पारित केल्याबद्दल आभार मानले.

यावेळी त्यांनी पाकिस्तानवर हल्ला करण्याची संधी सोडली नाही. पेशावरमध्ये निष्पाप शाळकरी मुलांच्या हत्येचा त्यांनी निषेध व्यक्त केला. आणि दहशतवाद्यांचा गौरव कारण्याबाबदल पाकिस्तानवर निशाणा साधला होता.

२०१७:

आपल्या ५६ मिनिटांच्या भाषणात, पंतप्रधानांनी “नवीन भारत” आणि भ्रष्टाचार विरोधी उपाय निर्माण करण्यावर भर दिला. पंतप्रधान त्यावेळी म्हणाले होते की, देशाच्या जनतेला एकत्र येऊन एक असा देश बनवायचा आहे, जिथे देशाच्या लोकांबरोबर शासन चालेल .

आपल्या भाषणात, पीएम मोदी म्हणाले की, “नवीन भारत ‘ही लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात सरकारची लढाई सुरूच राहील. सोबतच नोटाबंदीचे पाऊल यशस्वी झाले आणि नोट बंदीनंतर बँकांमध्ये १.७५ लाख कोटी रुपये जमा झालेत असं सांगत त्यांनी नोट बंदीच्या निर्णयाचं समर्थन केलं होते.

२०१८:

आपल्या पहिल्या कार्यकाळातील शेवटच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी एनडीए सरकारच्या गेल्या चार वर्षातील कामगिरीवर प्रकाश टाकला. ज्यात, स्वच्छ भारत, पीएमएफबीवाय, मुद्रा कर्ज, जीएसटी सारख्या निर्णयांची त्यांनी माहिती दिली.

भाषणादरम्यान, त्यांनी आपले प्रमुख आरोग्य धोरण ‘आयुष्मान भारत’ ची देखील घोषणा केली. महत्वाकांक्षी अश्या आयुष्मान भारत किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजनेचे लक्ष्य १० कोटी अतिसंवेदनशील कुटुंबांना (अंदाजे ५०कोटी लाभार्थी) आणि प्रति कुटुंब ५  लाख रुपयांपर्यंत आरोग्य संरक्षण प्रदान करणार असल्याचे त्यांनी यावेळी संगितले.

२०१९:

यांनतर मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं. एनडीएच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात, पंतप्रधान मोदींनी सत्तेवर आल्यानंतर १० आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत आपल्या नव्याने स्थापन झालेल्या सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकला.

यात कलम ३७० रद्द करणे, अनुच्छेद ३५ ए, तीन तलाक विधेयक पारित करणे या निर्णयांचा त्यांनी उल्लेख केला. कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय हे सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल असल्याचेही ते म्हणाले होते. 

यासोबतच सैन्यामधील समन्वय अधिक तीव्र करण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) तयार करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

२०२०:

भाजप सरकारच्या आताच्या लोकप्रिय ‘मेक इन इंडिया’ अॅडेजसाठी भारताची ओळख करून देण्याची ही पहिलीच वेळ होती. पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाने केवळ ‘मेक इन इंडिया’ नाही तर ‘मेक फॉर द वर्ल्ड’ देखील केले पाहिजे.

भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी ‘आत्मनिर्भर’ भारत हा महत्त्वाचा संदेश दिला . ते म्हणाले की,  हा फक्त शब्द नाही तर भारतीयांनी एक मंत्र पाळला पाहिजे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा वाढण्यास मदत होईल.

२०२१ :

गेल्या महिन्याच्या अखेरीस, पंतप्रधानांनी सोशल मीडियावर त्यांच्या यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी माहिती मागवली होती. पीएमओ इंडिया या ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून त्यांनी म्हंटल कि,  “लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तुमचे विचार पुन्हा उमटतील. १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणासाठी तुमच्या सूचना काय आहेत? mygovindia वर शेअर करा.”

आज स्वातंत्र्याच्या अमृतमहोस्तवानिमित्त  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाला किल्ल्यावर ध्वज फडकवत देशाला संबोधित केलं. आपल्या भाषणात त्यांनी फाळणीच्या कटू आठवणींचा उल्लेख केला.

सोबतच, म्हंटल कि, ‘या अमृतमहोत्सवाचं लक्ष्य आहे की एका असा भारत निर्माण केला जाईल जिथे सुविधा सर्वसमावेशक असतील आणि  नागरिकांच्या जीवनात सरकार विनाकारण दखल घेणार नाही.’

यावेळी त्यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचं नाव उज्वल केल्याबाबदल खेळाडूंचं कौतुक केलं. या सर्व खेळाडूंचा विशेष सत्कार यावेळी केला गेला, हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्समधून या खेळाडूंवर फुलांचा वर्षाव करण्यात आला.

देशभरात ७५ वंदे भारत ट्रेन सुरू करणार असल्याचं पंतप्रधांनी यावेळी जाहीर केलं.

याव्यतिरिक्त पंतप्रधानांनी भाषणादरम्यान नॅशनल हायड्रोजन मिशनची घोषणा केली. ‘यामुळे ऊर्जा क्षेत्रात भारत आत्मनिर्भर बनेल आणि ग्रीन जॉब्सच्या संधी निर्माण होतील’ असंही त्यांनी यावेळी सांगितलं. आजच्या भाषणात त्यांनी १०० कोटी रुपयांच्या गतीशक्ती योजना, सबका साथ – सबका प्रयास अशा योजनांची देखील घोषणा केली. सोबतच मुलींसाठी सैनिकी शाळांची दार खुली करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी आज केली.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.