मी दररोज एक ते दोन किलो शिव्या खातो- नरेंद्र मोदी

ऐका हो ऐका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दीर्घकालीन कार्यशैलीमागचं  ‘सिक्रेट’ आता सिक्रेट राहिलेलं नाहीये. खुद्द प्रधानमंत्र्यांनीच ते जाहीर करून टाकलंय. “गेल्या २ दशकात आपण दररोज १ ते २ किलो ‘शिव्या’ खात असल्यानेच दीर्घकाळ काम करण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळते” असा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडनच्या वेस्टमिन्सटर सेन्ट्रल हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘भारत की बात सबके साथ’ या कार्यक्रमात केला. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष आणि गीतकार प्रसून जोशी यांनी या कार्यक्रमाचं संचालन केलं.

कार्यक्रमास उपस्थित असलेल्या एका प्रेक्षकाने मोदींना ते इतक्या दीर्घकाळासाठी काम कसं करू शकतात, यामागचं रहस्य काय..? असा प्रश्न विचारला यावर उत्तर देताना नरेंद्र मोदी म्हणाले की, “खरं तर या प्रश्नाची अनेक उत्तरं असू शकतील, पण या वातावरणात मला एकंच उत्तर द्यायचं असेल तर मी एवढंच सांगेन की गेल्या वीस वर्षात मी दररोज साधारणतः १ ते २ किलो शिव्या खातोय” प्रधानमंत्र्यांच्या या उत्तरावर संपूर्ण सभागृहात एकंच हशा पिकला.

आता प्रधानमंत्र्यांनी हे उत्तर उपरोधिकपणे दिलं की प्रामाणिकपणे हे वाचकांनी आपापल्या विवेकानुसार ठरवावे. मोदी समर्थक यात उपरोधाचा शोध घेऊन विरोधकांना कशी सणसणीत चपराक हाणलीये म्हणून आनंद साजरा करू शकतात, तर विरोधक प्रथमच मोदींनी ग्राउंड रीअॅलिटीचं भान ठेऊन प्रामाणिकपणे हे उत्तर दिलं म्हणून खुश होऊ शकतात. आम्ही फक्त तुमच्यापर्यंत बातमी पोहचवण्याचं पुण्यकर्म पार पाडलं.

Leave A Reply

Your email address will not be published.