पीएनां सुद्धा फसवंल आणि पंतप्रधान हट्टाने नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात सामील झाले.

नवरात्र म्हटलं कि संपुर्ण देशभरात अतिशय उत्साहाचे वातावरण असते. दुर्गेच्या नऊ अवतारात स्त्री शक्तीला पुजलं जातं. कुठे गरबा तर कुठे दुर्गापूजा च्या माध्यमातून नवरात्र साजरी केली जाते. देशाच्या सामान्य नागरिकाप्रमाणे पंतप्रधानांना देखील या नवरात्र उत्सवाचं आकर्षण असणे साहजिक आहे.

पण एक किस्सा असाही जेव्हा पंतप्रधान आपल्या सचिवाची नजर चुकवून नवरात्र उत्सवात सामील होण्यासाठी गेले होते.

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. पंतपधानपदी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष पी.व्ही.नरसिंह राव बसले होते. नरसिंहराव यांची ओळख जागतिकीकरणाचे उद्गाते, अनेक भाषा जाणणारे विद्वान, राजनीतीमधले चाणक्य, कंप्यूटर लॅपटॉपच सखोल ज्ञान असणारे आधुनिक विचारांचे नेते अशी असली तरी त्यांचा पिंड धार्मिक होता.

नरसिंह राव यांचे तेव्हाचे खाजगी सचिव राम खांडेकर यांचे त्यांच्याशी अगदी जिव्हाळ्याचे नाते होते. पंतप्रधान होण्याच्या खुपवर्षे आधीपासून राम खांडेकर नरसिंहराव यांच्या सोबत काम करत होते. दोघे एकमेकांच्या स्वभावाला अगदी जवळून पारखायचे.

राम खांडेकर यांच्याशिवाय नरसिंह राव यांचे पान देखील हलायची नाही. एकदा रात्री एकच्या सुमारास नरसिंह रावांचा खांडेकरांना फोन आला. दिल्लीसह उत्तर भारतातील एका प्रमुख हिंदी वर्तमानपत्राच्या संपादकांकडे मुलाच्या जावळ व नामकरण कार्यक्रमाचे निमंत्रण त्यांनी स्वीकारले असल्याचे त्यांनी खांडेकरांना सांगितले. 

राम खांडेकर सांगतात,

दुसऱ्या दिवशी मी कार्यालयात गेल्यानंतर त्या संपादकांशी संपर्क साधून कार्यक्रमाची वेळ व स्थळ याबाबत चौकशी केली. कार्यक्रमाची तिथी व स्थळ ऐकून मला धक्काच बसला. कारण कार्यक्रम होता दिल्लीतील कुतुबमिनारजवळील छतरपूर मंदिरात आणि तिथी होती नवरात्रीतील अष्टमीची. 

दिल्लीत देवीची तीन प्रमुख देवळे आहेत. त्यातील छतरपूर हे एक होते. नवरात्रीत पहिले दोन-तीन दिवस सोडले, तर या तिन्ही देवळांत सकाळी चार वाजेपासून रांगा लागतात. बायका सहा-आठ महिन्यांच्या मुलांनासुद्धा घेऊन रांगेत तासन् तास उभ्या असतात. अष्टमीचा दिवस तर विचारूच नका. देवळातच नव्हे, तर घरोघरी अष्टमी साजरी होते.

पंतप्रधानांनी अष्टमीच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत तिथे जाऊ नये असे राम खांडेकर यांचे स्पष्ट मत होते. कारण तास-दीड तास सुरक्षेच्या दृष्टीने मंदिरातील प्रवेश बंद करावा लागणार होता. त्यानंतर गर्दीला नियंत्रित करणे जोखमीचे होते. सुरक्षा पथकांचासुद्धा नकार आला होता.

खांडेकरांनी  नरसिंह रावांना स्पष्ट शब्दांत हा कार्यक्रम घेणे योग्य नसल्याचे सांगून परिस्थितीची कल्पना दिली. पुढे चार-पाच दिवस ते ‘‘कसेही करा, आपण या कार्यक्रमाला जाऊ’’ असे म्हणत होते आणि खांडेकर तितक्याच स्पष्टपणे नकार देत होते.

नरसिंहरावांना त्या नामकरण समारंभापेक्षा छतरपुरच्या नवरात्रीच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची जास्त उत्सुकता लागली होती.

शेवटी सप्तमीच्या दिवशी राम खांडेकर जेवण्यासाठी घरी गेलो हे पाहून नरसिंह रावांनी त्यांच्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या खासगी सचिवांना बोलावून- ‘‘कसेही करा, पण मला या कार्यक्रमाला जायचे आहे. कार्यक्रमाची आखणी करा.’’ अशा सूचना दिल्या.

महत्त्वाचे म्हणजे, ‘‘खांडेकरांना कळू देऊ नका. नाही तर ते रद्द केल्याशिवाय राहणार नाहीत!’’ असेही त्यांनी सांगितले.

दुपारी राम खांडेकर कार्यालयात परतल्यानंतर खासगी सचिवांनी साहेबांचा निरोप सांगितला. पंतप्रधानांचा हट्टीपणा पाहून खांडेकरांनी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. दुसऱ्या दिवशी- म्हणजे कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी विशेष सुरक्षा दलाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आटोपून पंतप्रधान शेवटी या कार्यक्रमाला गेलेच. राम खांडेकर म्हणतात,

” मी मात्र सकाळी कार्यालयात गेलो नाही. माझ्या अनुपस्थितीमुळे नरसिंह राव व इतर समजायचे ते समजले होते!”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.