पंतप्रधानांनी रॉच्या मदतीने छुप्या कॅमेऱ्याची टेक्नॉलॉजी शिकून घेतली होती..

मध्यंतरी भारतात स्टिंग ऑपरेशनची लाट आली होती. मोबाईल कॅमेऱ्याचा तर वापर व्हायचाच शिवाय सीसीटीव्ही कॅमेरे, पेनमध्ये कॅमेरा, शर्टच्या बटनात कॅमेरा, बॅगमध्ये कॅमेरा बरंच काय काय. या कॅमेऱ्याचा वापर करून कित्येकांचे पोल खोलले गेले. मॅच फिक्सिंगचं प्रकरण उघडकीस आलं, शक्ती कपूर सारख्या गड्याने दारू पिऊन बॉलिवूडमधल्या कास्टिंगची माहिती सांगून टाकली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष लाच घेताना रंगेहाथ सापडले. अगदी कालपरवा सुद्धा काही सेलिब्रिटी पैसे घेऊन राजकीय नेत्यांची पब्लिसिटी करायचं काम घेताना दिसले.

तस बघायला गेलं तर या छुप्या कॅमेऱ्याचा अनेकांनी गैरवापर देखील केला. कित्येकजण ब्लॅकमेलिंगसाठी याचा वापर करताना  दिसतात. शेवटी टेक्नॉलॉजी कशी वापरावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सरकार देखील याबाबतीत अनेक अटी नियम घालून या पद्धतीवर काही निर्बंध आणता येईल का याचे प्रयत्न करताना दिसत आहे. 

पण एकदा स्वतः पंतप्रधान छुपे कॅमेरे कसे सेट करतात हे शिकत होते. काय घडलं होत नेमकं?

हा काळ होता नव्वदच्या दशकातला. भारतात रामजन्मभूमी आंदोलनाने जोर पकडला होता. भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी रामरथ यात्रा काढून संपूर्ण देश हादरवून सोडला होता. बच्चा बच्चा राम का अशा घोषणा देत कारसेवकांचे जथ्थेच्या जथ्थे  अयोध्याचे दिशेने रवाना होत होते. बाबरी मशिदीची वीट देखील ठेवणार नाही अशा घोषणा केल्या जात होत्या.

राज्यात भाजपचं सरकार होत तर केंद्रात पी.व्ही.नरसिंहराव यांचं काँग्रेस सरकार. भाजप कार्यकर्ते तर खुल्या पद्धतीने बाबरी पडून राम मंदिर बांधावं अशा घोषणा करत होते. पण काँग्रेसची भूमिका ठरत नव्हती.

खरं तर रामजन्म भूमीचा प्रश्न माजी पंतप्रधान कै. राजीव गांधींनी वादग्रस्त जागेवरील कुलूप काढल्यामुळे पुन्हा चर्चेत आला होता. राम मंदिर बनावे हीच काँग्रेसची देखील इच्छा होती पण त्यासाठी बाबरी मशीद पाडली जाऊ नये असं त्यांच्या नेत्यांचं म्हणणं होतं. मुस्लिम मतांवर परिणाम होऊ नये व कट्टर हिंदूंची मते देखील मिळावी अशा दोन्ही दगडांवर पाय देण्याची पंतप्रधान नरसिंहराव यांची भूमिका होती.

दिवसेंदिवस अयोध्येतील वातावरण प्रचंड स्फोटक बनत चाललं होत. लवकरातल्या लवकर यावर उपाय काढला नाही तर कधीही दंगे सुरु होतील अशी शक्यता होती. वादग्रस्त जागेवरचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता.

रिसर्च अँड अॅनालिसिस विंग उर्फ रॉ या गुप्तचर संघटनेचे नामवंत अधिकारी बी. रमण, ज्यांनी १९९२ साली राव यांच्या टीमबरोबर अतिशय जवळून काम केले, त्यांनी अयोध्येची समस्या राव यांनी कशी हाताळली याबद्दल जरा वेगळ्या स्वरूपात आपले मत माडले आहे. 

आपल्या पुस्तकात (काऊ बॉईज ऑफ रॉ : डाऊन द मेमरी लेन, रमण) ते म्हणतात, अयोध्या प्रकरण सुरू असताना राव सतत द्विधा मन:स्थितीत होते. कधी बाबरी मशिदीला बिलकुल धक्का बसणार नाही, या भाजप नेते लालकृष्ण अडवाणींच्या आश्वासनावर त्यांना विश्वास वाटायचा, तर कधी हा विश्वास अनाठायी तर नाही हा प्रश्न पडायचा.

पंतप्रधान नरसिंहराव यांनी ६ डिसेंबर १९९२ च्या अगोदर एकदा रमणना विचारले,

रॉ कडे एखादे गेस्ट हाऊस आहे काय, जिथे अडवाणींशी मी गोपनीय चर्चा करू शकतो ? 

रॉच्या अधिकाऱ्यांनी ल्यूटन्स दिल्लीमध्ये असे एक गेस्ट हाऊस शोधून काढले, जे राजीव गांधींनी १९८४ साली ऑपरेशन ब्ल्यु स्टार अगोदर अकाली नेतृत्वाशी चर्चा करण्यासाठी वापरले होते. नरसिंहराव यांना अडवाणींच्या सोबत तिथे चर्चा करायची होती आणि या गोपनीय चर्चेचं शूटिंग करून ठेवायचं होतं. 

 मग काही कारणांनी पंतप्रधानांनी जागा निवडण्याचा बेत रद्द केला आणि रॉ ला गुप्त रेकॉर्डिंगची व्यवस्था आपल्याच निवासस्थानी करायला सांगितली. ही यंत्रणा कशी वापरायची, ते स्वतः देखील शिकून घेतले. 

वय झालं असलं तरी नरसिंहराव हे टेक्नॉलॉजी शिकण्याच्या बाबतीत प्रचंड उत्साही होते. वयाच्या सत्तरीत त्यांनी संगणक कसा हाताळायचा हे शिकून घेतलं होतं. ते स्वतः कॉम्प्युटर लॅपटॉपच्या खरेदीसाठी दुकानात जायचे. त्यांच्यासाठी हि आधुनिक डिजिटल टेक्नॉलॉजीडाव्या हातचा मळ होती.   

आता कुठल्याही गुप्त जागी नाही तर थेट पंतप्रधान निवासात अडवाणींशी होणाऱ्या चर्चेचे रेकॉर्डिंग ते करू इच्छित होते. रॉ ने ही यंत्रणा नरसिंहरावांना पुरवली. पंतप्रधानांनी ती शिकून देखील घेतली. 

पण दुर्दैवाने नरसिंहरावांची अडवाणी यांच्याशी राम जन्मभूमी बद्दलची चर्चा झालीच नाही. बाबरी मशिदीचा विध्वंस झाल्यानंतर मात्र त्यांनी त्या छुप्या कॅमेऱ्याची यंत्रणा रॉ ला परत केली. आपण या यंत्रणेचा वापर केला का नाही, केला असल्यास रेकॉर्डिंग कसे झाले, याविषयी राव स्वत: कधी बोलले नाहीत आणि रॉ ने देखील त्यांना त्याविषयी कधी विचारले नाही.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.