जे.आर.डी. टाटांमुळेच नेहरूंनी पंतप्रधान रिलीफ फंडची सुरवात केली.

जेआरडी टाटा यांना भारताच्या औद्योगिक क्रांतीचे आद्य पुरुष असं म्हटलं जातं. जवळपास साठ वर्षे त्यांनी टाटांचे हे विशाल साम्राज्य सांभाळले, इतकंच नाही तर त्याला यशाच्या शिखरावर नेऊन पोहचवलं. अगदी इंग्रज सरकारपासून ते पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ते राजीव गांधी, नरसिंह राव अशा अनेक पंतप्रधानांच्या राजवटी त्यांनी अनुभवल्या. मात्र कुठल्या सरकार पुढे झुकले नाहीत.

पंडित जवाहरलाल नेहरू तर त्यांचे अगदी चांगले मित्र होते. दोघांनी मिळून देशात अनेक नव्या उद्योगसमूहांना सुरवात केली होती. नेहरूंच्या काळात जेआरडी यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला होता.

मात्र एअर इंडियाच्या राष्ट्रीयीकरणावरून दोघांचे मतभेद झाले.

एअर इंडिया हे जेआरडी यांनी पाहिलेलं स्वप्न होतं.  त्यांनी स्वतः लावलेलं रोपटं त्या क्षेत्रातील कोणताही अनुभव नसलेल्या सरकारी अधिकाऱ्याकडे सोपवणे हे जे आरडी यांच्या मनाला पटत नव्हतं, तरी देशाच्या भल्यासाठी जर हा त्याग करावा लागत असेल तर तो करायचा म्हणत त्यांनी टाटांच्या या एअरलाईन्सचे राष्ट्रीयीकरण होऊ दिले.

नेहरूंनी एअर इंडियाचे चेअरमन पद त्यांच्याकडेच देऊ केले.

जे.आर.डी. व नेहरू यांच्या वयात खूप अंतर होतं. ते नेहरूंपेक्षा खूप लहान होते मात्र नेहरू त्यांच्या सल्ल्याचा नेहमी आदर करायचे. असाच एक प्रसंग स्वातंत्र्याच्या वेळी आला होता.

जवळपास दीडशे वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामीनंतर भारत स्वतंत्र झाला खरा पण जाताना ब्रिटिश सत्तेने भारताला एक शाप दिला. तो शाप म्हणजे फाळणी. मुस्लिम बहुसंख्य असणाऱ्या भागाला वेगळा देश बनवावे अशी मागणी मोहम्मद अली जिना व त्यांच्या मुस्लिम लीगने केली होती. लॉर्ड माउंटबॅटनने त्याला होकार दिला. रॅडक्लिफ नावाच्या वकिलाने इंग्लडमध्ये बसून फाळणी केली.

१४ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांनी भारताला तोडून पाकिस्तान नावाच्या नवीन देशाची निर्मिती केली. लाखो लोक अचानक बेघर झाले. इतकी वर्षे ज्या गावात वाढले ती माती आपली घरे शेती मालमत्ता सोडून त्यांना जावं लागलं. जगाच्या आजवरच्या इतिहासात इतके लोक एकावेळी स्थलांतरित होत आहेत असं कधी घडलं नव्हतं. 

पाकिस्तानातून हातात मिळेल तो संसार गोळा करून लोक भारतात येत होते. मात्र या दरम्यान हिंदू मुस्लिम दंगलीस प्रारंभ झाला. दोन्ही समाज एकमेकांशी भिडले. विशेषतः पाकिस्तानात सरकारने या दंगली आटोक्यात आणण्यास कोणतेही प्रयत्न केले नाहीत. जाळपोळ कत्तली रक्तपात सुरु झाला. आया बहिणींचे बलात्कार करण्यात आले.

पाकिस्तानातून येणाऱ्या रेल्वे मृतदेह आणि रक्ताने भरून गेलेल्या होत्या. भारत सरकारने विक्रमी वेळेत निर्वासितांच्या छावण्या उभारल्या. त्यांच्या राहण्यापासून ते वैद्यकीय मदतीपर्यंत प्रत्येक गोष्टीची सोय करावी लागणार होती. 

स्वातंत्र्याच्या आनंदाला या दुःखाची झालर होती. सर्व सरकारी यंत्रणा यात गुंतल्या होत्या.

१९४७ सालच्या ऑक्टोबर महिन्यात नेहरूंची जे.आर.डी.टाटांशी भेट झाली. ते एक मोठी रक्कम सरकारकडे जमा करण्यासाठी ते आले होते. त्यांनी पंतप्रधानांना सुचवलं की अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी सरकारने वेगळा निधी काढला पाहिजे व ज्यात जनतेकडून देखील मदत जमा करता येईल. ते नेहरूंना म्हणाले,

पंतप्रधानांच्या नावे हा निधी गोळा केला जावा.

नेहरूंना हा सल्ला तर प्रचंड आवडला पण आपल्या सहकाऱ्यांच्या सल्ल्याशिवाय काही करणे त्यांना पटत नव्हते. त्यांनी २५ नोव्हेंबर रोजी कॅबिनेट मिटिंग पुढे हा प्रस्ताव मांडला. त्यानं नोट मध्ये नेहरू म्हणाले होते,

“गेल्या काही काळापासून सरकारकडे मोठी मदत जमा होत आहे.  पंतप्रधान म्हणून आणि काहीजण वैयक्तिकरित्या देखील ही मदत माझ्याकडे पाठवत आहेत. ही रक्कम मी रिलीफ कार्यासाठी पाठवत आहे पण आता यासाठी एक वेगळा निधी बनवावा या निर्णयाप्रत मी आलो आहे.”

 कॅबिनेट मिटिंगमध्ये या रिलीफ फंडला मान्यता देण्यात आली. नेहरूंनी जेआरडी टाटांना पत्र पाठवून याची माहिती दिली व निर्णय घेण्यासाठी दोन महिने उशीर झाला याबद्दल खेद व्यक्त केला.

 जानेवारी १९४८ साली पंतप्रधान राष्ट्रीय रिलीफ फंडची स्थापना करण्यात आली. या फंडच्या ट्रस्टींमध्ये स्वतः पंडित नेहरू, उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल, अर्थमंत्री, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असे गणमान्य व्यक्ती होते. यात उद्योग जगताचे प्रतिनिधी म्हणून जे.आर.डी.टाटांची नियुक्ती करण्यात आली होती.   

नेहरू म्हणतात,

जे आर डी यांनी सुचवल्यामुळे हा रिलीफ फंड उभा राहिला, आता पंजाबमधील निर्वासितांच्यासाठी व भारतात अन्यत्र देखील हा निधी लोकांच्या मदतीसाठी वापरता येईल.

या निधीसाठी सर्वात सुरवातीची मोठी रक्कम टाटा समूहानेच दिली.

भारतात महापूर, चक्रीवादळ, भूकंप, दुष्काळ असे कसलेही नैसर्गिक संकट येऊ दे देशाच्या मदतीसाठी हा पंतप्रधान राष्ट्रीय रिलीफ फंड उपयोगी पडतो. देशाच्या निर्माणात असे द्रष्टे नेते व उद्योगपती होते म्हणून भारत देश घडला अस म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.