मोदींनी नाव बदललेल्या संग्रहालयात कॉंग्रेसने ७० वर्षात काय केलंय ते दाखवलंय

एप्रिल २०२२ मध्ये पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेल्या नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीचे नाव बदलण्यात आले आहे. नेहरूंचं निवासस्थान तीन मूर्ती भवन हे आता पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय म्हणून ओळखले जाईल. नेहरू स्मारकाच्या नामांतरावरून काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. संकुचित वृत्ती आणि सूडबुद्धीमुळे मोदी नेहरूंच्या गोष्टींचं नाव बदलत आहेत अशी टीका होतेय.

मोदींनी नाव बदललेलं पंतप्रधान संग्रहालय कसं असणारे आणि त्यात कॉंग्रेसने ७० वर्षात काय केलंय ते दाखवलंय आधी जाणून घ्या म्हणजे कसंय तुम्ही दिल्लीत कधी चक्कर मारलीच अन हे म्युजियम बघण्याचा प्लॅन झालाच तर आधीच याबाबत तुम्हाला माहिती असलेली बरी. 

थोडक्यात हे संग्रहालय उभारण्याचं उद्दिष्ट असं की, 

स्वातंत्र्यलढ्यापासून ते राज्यघटनेच्या निर्मितीपर्यंत, तसेच विकसनशील भारताच्या पंतप्रधानांपर्यंत सर्व पंतप्रधानांवर संपूर्ण माहिती येथे देण्यात आली आहे.

भारताच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीत प्रत्येक पंतप्रधानांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागले आणि नवीन भारताची पायाभरणी करण्यासाठी त्यांनी त्यावर मात कशी केली हे यात वेग-वेगळ्या स्वरूपात दाखवल्यामुळे पंतप्रधान संग्रहालय भारतीय तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरणार आहे. 

देशाच्या १४ माजी पंतप्रधानांचे देशासाठीचे योगदान लोकांपर्यंत पोहचवणे मग त्यांची विचारधारा कोणतीही असोत, ते कोणत्याही पक्षाचे आणि सरकारचे असोत. त्या -त्या सरकारचा सामायिक वारसा हे संग्रहालयामध्ये दाखवला जाणार आहे हाच महत्वाचा उद्देश यामागे आहे.

हे संपूर्ण संग्रहालय कसं आहे ?

  • संग्रहालयात एकूण ४३ गॅलरी आहेत.
  • या संग्रहालयात माजी पंतप्रधानांची जुनी छायाचित्रे, वर्तमानपत्रे, व्हिडीओ क्लिप्स, त्यांच्या मुलाखती, भाषणे अशा अनेक या संग्रहालयात पाहायला मिळतील.
  • त्यांची महत्त्वाची पत्रे, दैनंदिन वापरातील वस्तू, भेटवस्तू, सन्मान, पदके, शिक्के आणि त्यांच्या नावाने छापलेली नाणीही येथे पाहायला मिळणार आहेत.
  • संग्रहालयाच्या तळमजल्यावर दोन नवीन गॅलरी, कॉन्स्टिट्यूशन गॅलरी आणि ‘इंडिया अॅट इंडिपेंडन्स: ब्रिटिश लेगसी’ जोडण्यात आल्या आहेत.
  • नवीन संग्रहालयाच्या मुख्य संकुलाचा ब्लॉक -२ अशोक चक्राच्या आकारात बांधला गेला आहे. येथून पर्यटक विविध गॅलरीमध्ये जाऊ शकतात.
  • या मजल्यावर गुलझारीलाल नंदा, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, पी.व्ही नरसिंह राव, एचडी देवेगौडा, आय.के गुजराल, अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांच्यासंबंधित गॅलरी आहेत.
  • पहिल्या मजल्यावर राजीव गांधी, व्हीपी सिंह, चंद्रशेखर, मोरारजी देसाई आणि चरणसिंग यांच्या गॅलरी आहेत.

याशिवाय संग्रहालयाची काही खास वैशिष्ट्ये अशी की…

पंतप्रधानांच्या संग्रहालयात दाखविल्या जाणार्‍या माहितीचा संदर्भ प्रसार भारती, चित्रपट विभाग, संसद टीव्ही, दूरदर्शन, मीडिया हाऊस, संरक्षण मंत्रालय, परदेशी वृत्तसंस्था इत्यादी संस्थांकडून घेण्यात आला आहे.

संग्रहालयातल्या एकूण ४३ गॅलरी असून त्या बांधण्यासाठी तब्बल ३०६ कोटी रुपये खर्च आला आहे.

तंत्रज्ञानाचा अवलंब करत संग्रहालयाच्या बांधकामादरम्यान त्या परिसरातले एकही झाड तोडण्यात आलेले नाही. तसेच कोणत्याही झाडाचे स्थलांतर देखील करण्यात आलेले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे संग्रहालय बनवण्यासाठी विशेष प्रयत्न केले, परंतु त्यांचा स्वतःचा कार्यकाळ त्यात दाखवला गेलेला नाही. जरी वर्तमान काळातले पंतप्रधान असले तरी २०१४ ते २०१९ या काळातील  त्यांचा कार्यकाळ दाखवला गेलेला नाही.  

या ४३ गॅलरींपैकी शेवटची गॅलरी ही डॉ. मनमोहन सिंग यांचा कार्यकाळ दाखवते. 

ज्या तीन मूर्ती संकुलात हे पंतप्रधानांचे संग्रहालय बांधण्यात आले आहे, ते १६ वर्षे देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे निवासस्थान होते.

आता थोडा याला पॉलिटिकल टच द्यायचा झाला तर… 

सोशल मीडियावर अशी चर्चाय की, मोदींनी कितीही म्हणू देत की गेल्या ७० वर्षांत काँग्रेसने काय केलं? काय कमावलं ? वैगेरे वैगेरे. ते सगळं या गॅलरीत असलेल्या फोटो, व्हिडीओ क्लिप्समध्ये दाखवलेलं आहेच ज्याचं उद्घाटन स्वतः मोदींनी केलंय..

या संग्रहालयात ज्या पंतप्रधानांच्या गॅलरी आहेत त्यात त्यांच्या कार्यकाळातील महत्वाच्या निर्णयांवर आणि भूमिकांवर प्रकाश टाकला आहे. ज्यात निम्मे पंतप्रधान हे काँग्रेस पक्षाचे आहेत.

जसं की, नेहरूंच्या गॅलरीत त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते पंतप्रधान पदावर असे पर्यंतचे सर्व निर्णय, त्यांनी मांडलेल्या आणि अंमलात आणलेल्या पायाभूत सुविधा, योजना, धोरणं या सगळ्यांची यादीच त्यांच्या गॅलरीत असणार आहे.

तसेच शास्त्रीजींच्या गॅलरीत, 

हरित क्रांतीबाबतीतची माहिती दाखवण्यात आली. हि हरित क्रांती म्हणजे काँग्रेसची देण आहे. त्याचमुळे भारत अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण बनलाय हे कोणीच नाकारू शकत नाही. याशिवाय शास्त्रीजींच्या १९६५ च्या भारत-पाक युद्धातील भूमिकेवर प्रकाश टाकला गेला आहे.

तसेच इंदिरा गांधींची गॅलरी जिथे,

इंदिरा गांधींच्या नेतृत्वात झालेल्या बांगलादेश मुक्तीवर प्रकाश टाकलाय. याशिवाय इंदिरा गांधींनी बँकांच्या राष्ट्रीयीकरणात घेतलेल्या भूमिकेवर देखील या गॅलरीत प्रकाश टाकला आहे.

मनमोहन सिंग यांच्या गॅलरीमध्ये,

त्यांच्या योगदानाबाबत वर्णन करणाऱ्या गोष्टी आहेत. त्यात महत्वाचं म्हणजे, १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला झालेल्या आर्थिक सुधारणा आणि अमेरिकेसोबतचा नागरी अणुकरार याचा त्यात समावेश आहे.

काँग्रेसचे पंतप्रधान सोडले तर येथे, वाजपेयी गॅलरी आहे. 

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याबाबत वर्णन केले आहे की ते कसे महान संसदपटू आणि वक्ते होते. तसेच त्यांचे कारगिल युद्ध आणि पोखरण अणुचाचण्यांमध्ये भारताचा विजय याबाबत या गॅलरीमध्ये प्रकाश टाकला आहे.

असो उद्दिष्ट जरी असं असेल कि पंतप्रधान कोणत्याही विचारधारेचे/पक्षाचे असोत त्यांचं योगदान महत्वाचं आहे आणि ते नाकारून चालत नाही. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.