कोरोना आटोक्यात आणता न येणं हे पंतप्रधान मोदींचे २ वर्षातील सर्वात मोठे अपयश : सर्वेचे मत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील दुसरं सरकार सत्तेत येऊन २ वर्ष पूर्ण होतं आहेत. त्याच पार्श्वभूमीवर या काळातील त्यांच्या यशा-अपयशाचा आढावा घेणं गरजेचं आहे. यात मग त्यांनी कोणती उल्लेखनीय कामे केली तसेच कोणत्या गोष्टींमध्ये ते अपयशी ठरले, किती लोक त्यांच्या कामामुळे समाधानी आहेत, अशा अनेक गोष्टी पाहाता येतील.

याबाबतीत अनेक विश्वासार्ह संस्थांनी वेगवेगळे सर्वे केले आहेत. असाच एक विश्वासार्ह सर्वे केला तो म्हणजे एबीपी न्यूज-सी वोटर या संस्थांनी.

नेमकं काय आहे सर्व्हेमध्ये?

या सर्व्हेत विचारलेल्या प्रश्नांना देशभरातील लोकांनी आपली मत व्यक्त केली आहेत. यातील काही मत पुढील प्रमाणे,

१. केंद्र सरकारच्या कामाशी किती टक्के लोक समाधानी?

या प्रश्नाला उत्तर देताना ३१ टक्के लोक म्हणाले आम्ही समाधानी आहोत. तर २८ टक्के लोकांनी साधारण असं मत व्यक्त केलं आहे. सोबतच ३७ टक्के लोकांनी केंद्र सरकारच्या कामावर असमाधान व्यक्त केलं आहे. तर ४ टक्के लोकांनी “सांगू शकत नाही” असं उत्तर दिलं आहे.

२. सरकारचं आजवरचं सर्वात उल्लेखनीय काम कोणते? :

या सर्वेनुसार, ५४ शहरी आणि ४५ टक्के ग्रामीण भागातील लोकांच्या मतानुसार नरेंद्र मोदींचे आजवरचे सर्वात उल्लेखनीय काम म्हणजे कलम ३७० हटवणं. यातून जम्मू काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढून घेतल्यामुळे लोक समाधानी आहेत.

तर २० टक्के शहरी आणि २५ टक्के ग्रामीण लोकांच्या मते राम मंदिर उभारणीला सुरुवात हे पंतप्रधान मोदींचं दुसरं मोठं उल्लेखनीय काम आहे. ६ टक्के लोकांच्या मते ट्रिपल तलाख बंदी हे उल्लेखनीय काम आहे. सोबतच ५ टक्के शहरी लोकांच्या आणि ६ टक्के ग्रामीण लोकांच्या मते नागरिकत्व कायदा हे देखील मोदी सरकारचे उल्लेखनीय काम आहे.

३. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामकाजाशी किती टक्के लोक समाधानी? :

सर्व्हेत विचारलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामकाजाशी किती टक्के लोक समाधानी होते, या प्रश्नावर अनेक लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत याआधीचे सर्व्हे बघितल्यास मोदींचा चेहरा कायमच ६० टक्क्यांच्या वर राहिला आहे. पण यावेळी मात्र यात घट झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामकाजाशी केवळ ३७ टक्के लोक चांगले समाधानी आहेत, तर २५ टक्के लोकांनी साधारण मत व्यक्त केलं आहे. तर ३६ टक्के जनता असमाधानी आहे.

४. अमित शाह यांच्या कामकाजाशी किती टक्के लोक समाधानी? :

गृहमंत्री अमित शहा यांच्या कामकाजाशी २८ टक्के लोक चांगले समाधानी आहेत. तर २२ टक्के लोकांनी साधारण मत व्यक्त केलं आहे. दुसऱ्या बाजूला ३७ टक्के लोक अमित शहा यांच्या कामाशी असमाधानी होते.

तर १३ टक्के लोकांनी “सांगू शकत नाही असं उत्तर दिलं आहे”

५. सर्वात अपयशी काम कोणते? 

या प्रश्नावर उत्तर देताना लोकांनी सांगितलं कि, कोरोना परिस्थिती आटोक्यात आणता न येणं हे मोदींचे आजवरचे सर्वात मोठे अपयश आहे. सर्व्हेत भाग घेणाऱ्या लोकांच्या मते ४४ टक्के शहरी लोकांनी मोदींचे सगळ्यात मोठे अपयश आहे, तर ४० टक्के ग्रामीण लोकांच्या मते देखील कोरोना आटोक्यात न आणता हे मोदींचे अपयश आहे.

तर कृषी कायद्यांच्या मुद्द्याला २० टक्के शहरी आणि २५ टक्के ग्रामीण लोकांनी पंतप्रधान मोदींचे सर्वात मोठे अपयश असं सांगितलं आहे. नागरिकत्व कायदा आणि दिल्ली दंगल या मुद्दयाला ९ टक्के शहरी आणि ९ ग्रामीण लोकांनी मोठे अपयश म्हंटले आहे. 

सोबतच भारत-चीन सीमावाद हा देखील ७ टक्के शहरी लोकांना तर १० टक्के ग्रामीण लोकांना सरकारचे अपयश वाटत आहे.

६. राहुल गांधी यांच्या कामाशी किती टक्के लोक समाधानी?

या सर्व्हेत राहुल गांधी यांच्यावर देखील लोकांना प्रश्न विचारण्यात आले होते. तर यानुसार, राहुल गांधी यांच्या कामाशी १८ टक्के लोक चांगले समाधानी आहेत. तर २२ टक्के लोकांनी साधारण मत व्यक्त केलं आहे. तर ४१ टक्के लोक अजूनही राहुल गांधी यांच्या कामकाजाशी असमाधानी आहेत.

कोरोना संकटाला कोणी जास्त चांगल्या पद्धतीनं हाताळलं असते?

या सर्व्हेत भारतातील सध्याची कोरोनाची परिस्थिती नरेंद्र मोदी कि अमित शहा या दोघांपैकी कोणी जास्त चांगल्या पद्धतीने हाताळली असती असा प्रश्न विचारण्यात आला होता. या उत्तर देताना ६६ टक्के शहरी लोकांनी सांगितलं कि मोदी अत्यंत चांगल्या पद्धतीनं सांभाळत आहेत. तर ६२ टक्के ग्रामीण लोकांच्या मते मोदी चांगली परिस्थिती सांभाळत आहेत.

दुसरीकडे २० टक्के शहरी आणि २३ टक्के ग्रामीण भागातील लोकांनी सांगितले कि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जागी राहुल गांधी यांनी कोरोनाची परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीनं हाताळली असती. 

पण आता कसं आहे ना भिडू, किती झालं तरी भारतात प्रत्येकाच्या मताला अर्थ आहे. त्यामुळे या सर्वे व्यतिरिक्त तुम्ही देखील तुमचं मत कमेंटमध्ये मांडू शकता.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.