भारतात पहिल्यांदाच सरकारी ई-कॅब सुरु होतीय, तीही पुण्याच्या PMPML मध्ये…
ट्रॅफिकच्या झंझटीत पुणे – पिंपरी चिंचवडकरांचा प्रवास सुखकर करणारी पीएमटी. गेल्या कित्येक वर्षांपासून नागरिकांच्या सेवेत आहे. पुणे महानगरपालिका परिवहन महामंडळ पुणे (PMPML) ने हळू- हळू या बस सेवेत विस्तार केला सोबतचं नवनवीन बस ताफ्यात आणल्या. ज्यात डिझेल मग सीएनजी, आणि इलेक्ट्रिक बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली. त्यासोबत नवनवीन उपक्रमही या माध्यमातून सुरू करण्यात आले.
त्यात आता पीएमटी आपल्या ताफ्यात ई – कॅब सेवा सुरु करणार असल्याचं समजतंय. ज्यासाठी पहिल्या टप्प्यात १०० ते २०० ई-कॅब सेवा सुरु कारण्याचे पीएमटीचे नियोजन आहे. दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात ठरावीक अंतरासाठीचं प्रवाशांना या इलेक्ट्रिक कॅबची सुविधा मिळणार आहे.
हा या कॅबचे भाडे बस एवढे जरूर नसेल पण इतर कंपन्यांच्या कॅबच्या मानाने त्या स्वस्त असणार आहेत, एवढच नाही तर रिक्षाच्या तुलनेत देखील पीएमटीची ही कॅब सेवा स्वस्त असणार असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे ओला- उबेर या कॅब सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांना टक्कर मिळणार एवढं मात्र नक्की.
भारतात पहिल्यांदाच पब्लिक ट्रान्स्पोर्टच्या माध्यमातून ई-कॅब सर्व्हिस देण्यात येत आहे
टाटा कंपनीची नेक्सन आणि ई-वेरिटो या मॉडेल्समार्फत पीएमटी ही कॅब सर्व्हिस सुरु करणार असल्याचे समजते. पीएमपीच्या ९ डेपोंमध्ये या कॅबसाठी चार्जिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. जिथून या कॅब चार्ज होतील आणि शिवाजीनगर, पुणे रेल्वे स्टेशन, स्वारगेट, डेक्कन, पूलगेट आणि शहराच्या महत्वाच्या ठिकाणांवर या कॅब उपलब्ध होतील. ज्या सुरुवातीला दररोज १५० किलोमीटर अंतर धावतील. सुरुवातीला जरी १००- २०० कॅब सुरु झाल्या तरी नंतर त्याची मागणी पाहता त्यांच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे या कॅबच्या भाड्याचे दर बेस फेअरनंतर १० रुपये प्रति किलोमीटर असतील. म्हणजे उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर स्वारगेट ते लोहगाव विमानतळ हे १३ किलोमीटरचं अंतर आहे, या प्रवाससाठी तुम्हाला इतर कंपन्यांच्या कॅबसाठी २८० ते २९० रुपये द्व्यावे लागतील. पण तुम्ही जर पीएमपीची ई-कॅबची सुविधा घेतली तर या अंतरासाठी तुम्हला फक्त १३० रुपये मोजावे लागतील.
तसेच महिला सुरक्षेसाठी ज्याप्रमाणे पीएमटीच्या ताफ्यात तेजस्विनी ही बस सेवा उपलब्ध करण्यात आली, त्याच प्रमाणे या ई- कॅब सर्व्हिसध्येही महिलांसाठी पिंक कॅब सुरु करण्यात येणार आहे.
पुणेकरांना आपल्या गंतव्यस्थानावर जाण्यासाठी कमी वेळेत, कमी खर्चात आणि आरामदायी प्रवासासाठी आणि ते ही पर्यावरण रक्षण लक्षात ठेवून ही सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमा मागचा हेतू आहे. सोबतच यामुळे खासगी वाहनांची संख्या तर कमी होईलचं, ज्यामुळे पुण्यातील प्रदूषण कमी होण्यास हातभार लागेल.
पीएमटीच्या या ई- कॅब एसटी स्टॅन्ड, रेल्वे स्टॉप, विमानतळ, मार्केट अश्या गर्दीच्या ठिकाणी उपलब्ध असतील. जेणेकरून प्रवाश्यांना बस स्टॉपवर जाणून बसची वाट पाहावी लागणार नाही. महत्वाचं म्हणजे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त असणारा आहे.
पीएमपीच्या या ई-कॅबच्या मदतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड दर्शन सुविधाही सुरु करणार असल्याचे समजते. या बाबतचा संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला आहे. जो लवकरच पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल. आणि या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर हा उपक्रम प्रत्यक्षात राबवणार असल्याचे समजते.
आता पीएमटीच्या बस सेवेबद्दल बोलायचं झालं तर, सध्या कोरोना महामारीमुळे पीएमटी प्रवांशाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झालीये. आकडेवारीवरून सांगायचं झालं तर पीएमटीने दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या ६ लाखांच्या आसपास आहे. जी कोरोनाच्या आधी ११ लाखांच्या वर होती. ज्यातून रोज १.५ कोटी रुपये उत्पन्न मिळायचं. जे आता घटून ९८ लाखांवर आलंय.
दरम्यान, यामागचं कारण महानगपालिकेनं बसेसच्या संख्येत केलेली कमतरता असल्याचे समजते. मात्र आता जेव्हा सर्व गोष्टी पूर्वपदावर येत आहेत. अश्यावेळी पीएमटी सर्व्हिस पुन्हा पुर्ववत करण्यात यावेत अशी मागणी नागरिकांकडून होतेय.
हे ही वाच भिडू :
- पुणेकरांनो ट्रॅफिकची समस्या संपणार कारण आता रिंग रोडला फायनल मंजुरी मिळालीय
- पुण्यात बस सुरु झाली तेंव्हा एकही प्रवासी मिळणार नाही म्हणून पैजा लागल्या होत्या..
- आजही बस ड्रायव्हर संतोष मानेने बसखाली चिरडल्याच्या आठवणी पुणेकर विसरू शकत नाहीत