मोदींच्या लसीच्या राजकारणामुळे मेहुल चोक्सी भारताच्या ताब्यात येणार…?

पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार ५०० कोटींचा चुना लावून पसार झालेल्या मेहुल चोक्सीचा अखेर बाजार उठला आहे. काही दिवसांपूर्वी अँटिग्वामधून फरार झालेल्या चोक्सीला काल डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे.

चोक्सीची माहिती मिळाल्यानंतर तिथल्या गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीने कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

त्यानंतर माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार अँटिग्वा सरकारनं डोमिनिका सरकारला विनंती केली आहे कि, “मेहुल चोक्सीला अँटिग्वा सरकारच्या ताब्यात न देता थेट भारताकडे प्रत्यार्पण करावं”. साहजिकच भारतासाठी ही खूप मोठी बातमी होती.

एका बाजूला हा सगळा सीन सुरु असताना भारतात मात्र दुसराच सीन सुरु झाला होता. भारतात हि बातमी पसरल्यानंतर सगळ्यांनीच अँटिग्वा सरकारच्या भूमिकेचं स्वागत केलं. मात्र त्याच वेळी भाजपच्या समर्थकांकडून या सगळ्या कारवाईच क्रेडिट दिलं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि त्यांच्या वॅक्सीन मैत्रीला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून फेब्रुवारी महिन्यामध्ये वॅक्सीन मैत्री अंतर्गत डोमिनिकाला ७ फेब्रुवारी रोजी ७० हजार आणि २७ फेब्रुवारी रोजी अँटिग्वा-बारमुडाला ४० हजार लसींच्या कुप्या पाठवल्या होत्या.

याच वैक्सीन मैत्रीमुळे आता मेहुल चोक्सीचं भारतात प्रत्यार्पण होणार असल्याचं सांगितलं जातं आहे.

पण या दाव्यात कितपत तथ्य आहे?

साधारण २०१८ पासून मेहुल चोक्सी अँटिग्वा-बारमुडाला राहत आहे. मात्र त्यापूर्वीच त्याने म्हणजे २०१७ मध्ये त्याने अँटिग्वाचं नागरिकत्व घेतलं होतं.

मात्र त्यानंतर चोक्सीचं नागरिकत्व रद्द करून त्याला भारताच्या ताब्यात देण्यासाठी अँटिग्वा सरकारवर सातत्यानं भारताकडून दबाव वाढवला जात होता. यातूनच जून २०१९ मध्ये एक दिवस अचानक बातमी आली कि अँटिग्वाकडून मेहुल चोक्सीचं नागरिकत्व रद्द करण्यात येणार आहे आणि त्याला भारताकडे सोपवण्यात येणार आहे.

अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राउन यांनी त्यावेळी सांगितलं होतं कि,

नागरिकत्व देण्यापूर्वी चोक्सीनी त्यांचं कोणतंही क्रिमिनल रेकॉर्ड सादर केलं नव्हतं. त्यामुळे त्यांना नागरिकत्व दिलं गेलं. पण आता त्यांना सगळ्या कायदेशीर संधी देऊन अखेरीस त्यांचं नागरिकत्व रद्द करणार आहोत आणि लवकरच भारताकडे सुपूर्द करू. 

यानंतर अँटिग्वामधील न्यायालयात मेहुल चोक्सीची केस सुरु झाली. याचा अर्थ स्पष्ट होता आहे की २०१९ पासूनच अँटिग्वा सरकार चोक्सीला भारताकडे सोपवण्यासाठी सकारात्मक होतं. यानंतर इकडे भारतात ED ने देखील न्यायालयात माहिती दिली कि, चोक्सीला एयर अँब्युलन्समधून आणण्याची तयारी केली जातं आहे.

वैक्सीन मैत्री

या सगळ्या दरम्यान सगळं जग कोरोनामुळे ठप्प झाले. पुढे त्यावरील लस आल्यानंतर भारताने विविध देशांना ‘वैक्सीन मैत्री’ या योजनेतून विविध देशांना लस निर्यात केली. यात काही लसी विकत दिल्या तर काही भेट म्हणून. अँटिग्वा आणि डोमिनिका या गरीब राष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशांना देखील भारताने लसी भेट दिल्या.

त्यावेळी डोमिनिकाचे पंतप्रधान रूजवेल्ट स्केरिट यांनी भारताचे आभार मानले होते. सोबतच सगळे प्रोटोकॉल तोडून दाखल झालेली लस ताब्यात घेण्यासाठी स्वतः विमानतळावर दाखल झाल्याचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राउन यांनी देखील भारताच्या या मदतीबद्दल आभार मानले होते.

मेहुल चोक्सीची अटक… 

२५ मे रोजी मेहुल चोक्सी अँटिग्वामधून गायब असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. या बातम्यांबद्दल माध्यमांनी गॅस्टन ब्राउन यांना विचारलं असता “या बातमीबाबत खात्रीलायक माहिती सांगता येणार नसल्याचं ते म्हणाले होते”

मात्र चोक्सी गायब झाल्यानंतर अँटिग्वाकडून त्याच्या नावाने इंटरपोल यलो नोटीस जारी केली. हि नोटीस म्हणजे फरार व्यक्तीला पकडण्यासाठी ग्लोबल पोलिसांना अलर्ट देण्यात आला होता. याच नोटिसीमुळे चोक्सीबद्दलची माहिती डोमिनिका पोलिसांना मिळाली. तो ज्यावेळी डोमिनिका मधून क्युबाला पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळी पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आली. 

स्थानिक माध्यमांच्या बातम्या नुसार डोमिनिका पोलिस अँटिग्वाच्या रॉयल पोलिस फोर्सला सोपवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

पण अँटिग्वा सरकारने डोमिनिकाला विनंती केली आहे कि,

मेहुल चोक्सीचं सरळ भारताकडे प्रत्यार्पण केलं जावं. अँटिग्वा आता चोक्सीला परत घेणार नाही. त्याने इथून पळून जाऊनच खूप मोठी चूक केली. तो इथं होता तेव्हा आमच्या देशासाठी केवळ अपमानच देत होता. आमच्यासाठी तो एक प्रकारचं अतिरिक्त ओझं होतं. त्यामुळेच आता आम्हाला तो काडीचा देखील महत्वाचा राहिलेला नाही.

त्यामुळे आता सगळ्यात मुख्य प्रश्न म्हणजे खरंच वॅक्सीन मैत्री उपयोगाला आली आहे का? 

तर गॅस्टन ब्राउन यांनी याबाबत स्पष्ट केलं आहे कि,

लस पाठवणं आणि मेहुल चोक्सीच प्रत्यार्पण या दोन्ही गोष्टींचा काहीही संबंध नाही. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. भारत एक नवीन सत्ताकेंद्रित देश म्हणून उभा राहत आहे आणि आपली ताकद वाढवत आहे. मोदी आणि माझे वैयक्तित पातळीवर देखील मैत्रीपूर्ण संबंध आहेत. 

पण भारताने जी लस पाठवली आहे त्या बद्दल आभाराचं. कॅरेबियन क्षेत्रात या ५ लाख लसी पाठवल्यामुळे लाखो रुग्णांचे जीव वाचले आहेत. या मदतीमुळे आम्ही खूप प्रभावित झालो आहोत.

आणखी एक गोष्ट बघितल्यास अँटिग्वा सरकारकडून २०१९ मध्ये मेहुल चोक्सीवर न्यायालयीन कारवाईला सुरुवात झाली आहे. त्यात आता तो स्वतः पळून गेला आणि इंटरपोलची यलो नोटीस देखील मिळाली. त्यामुळेच चोक्सीची अटक शक्य झाल्याचं दिसून येतं आहे.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.