जवळपास दोनशे वर्षांपूर्वी सुरू झालेलं पु ना गाडगीळ सातासमुद्रापार पोहचलंय

गोष्ट आहे अठराव्या शतकाची. पेशवाईला उतरती कळा लागली होती. दुसऱ्या बाजीरावाच्या कारभारामुळे मराठी सत्तेत प्रचंड मोठी फुट पडली होती. सगळे सरदार स्वतःचा सवता सुभा मांडत होते. याचा फायदा इंग्रजांनी उठवला आणि मराठ्यांशी युद्ध सुरु केलं.

याच काळात पेशव्यांचे प्रमुख सरदार आणि मिरजेचे संस्थानिक परशुरामभाऊ पटवर्धन यांच्या घराण्यातील चिंतामणराव उर्फ आप्पासाहेब पटवर्धन यांनी स्वतःची वाटणी घेऊन सांगली येथे नवीन संस्थान वसवले. गणेशदुर्ग हा भुईकोट किल्ला बांधला, सांगलीचे सुप्रसिद्ध गणेश पंचायतन मंदिर उभारले.

ही बातमी कोकणातील मालवण जवळच्या त्रिंबक या गावी छोटा मोठा व्यापार करणारे, नारायणराव वासुदेव गाडगीळ यांच्या कानावर गेली. पटवर्धन हे देखील कोकणातीलच असल्यामुळे त्यांच्या राज्यात आपल्या व्यवसायाचा जम बसवण्यासाठी नारायणराव गाडगीळ १८१५ साली सांगली येथे आले. 

सांगलीत रोडवरील कोल्हटकर वाड्यात त्यांनी आपले बस्तान बसवले. श्रीमंत सरकार धुंडिराज चिंतामणराव पटवर्धन यांनी त्यांना आश्रय दिला. नारायणराव सुरुवातीला राजापुरी पंचाचा किरकोळ व्यापार करत असत. मात्र त्यांचे सुपुत्र गणेशपंत यांनी सराफी शिकायचं ठरवल.

त्यांच्याप्रमाणेच त्रिंबकहुन आलेल्या व सांगली येथे स्थायिक झालेल्या, मोडक यांच्याकडे काही महिने राहून सावकारी व सराफी शिकून घेतली. पुरेसा अनुभव आल्यावर स्वतःचा व्यवसाय सुरु केला.

मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी, नंदननाम संवत्सरे, शके १७५४, गुरुवार दिनांक २९ नोव्हेंबर १८३२ साली सराफी व्यवसायाचा पाया घातला. त्यावेळी गणेश नारायण गाडगीळ नावाने सुरु केलेल्या दुकानच्या जमा खर्चाची वही आजही गाडगीळ घराण्याकडे आहे.

चिंतामणराव पटवर्धन सरकारांनी गणपती मंदिराजवळ बाजारपेठा वसवल्या, यात सोनारांच्या सराफ कट्ट्याचा समावेश होता. 

गाडगीळांच्या व्यवसायाचे सुरुवातीचे स्वरूप म्हणजे एका पडशीत सोन्या चांदीचे जिन्नस दागिने भरून सराफकट्ट्यात आणून मांडायचे व सायंकाळी पुन्हा पडशी भरून घरी न्यायचे. दुकानातील पहिली तिजोरी येईपर्यंत सराफी व्यवसायाचा याप्रमाणेच दिनक्रम असे.

या गणेशपंतांची ३ तीन मुले. यातील मधले नारायणराव तथा बाळनाना यांनी घराण्यातील सराफी व्यवसाय पुढे नेला. त्यांचे इतर दोन बंधू रामचंद्रपंत व गोपाळराव यांनी पुढे अनुक्रमे तुपाचा व कापडाचा व्यवसाय सुरु केला. नारायणराव गाडगीळ यांनी आपला सराफीचा व्यवसाय वाढवला. त्यांना भुलूकाका अभ्यंकर व दुसरा सेवक शिदू यांची मोठी मदत झाली.

यातील शिदू हा मारुतीसारखा धिप्पाड व अतिशूर होता. सोने आणण्यासाठी तो बऱ्याचदा सांगलीहून मुंबईस कमरेला सुरती रुपये बांधून चालत अनेक खेपा केल्या.

चिकाटी आणि प्रामाणिकपणा यामुळे सांगलीत गाडगीळांचे नाव झाले. अशातच सांगली शहराला १९१४ साली कृष्णेच्या महाभयंकर पुराने फटका दिला.गावात पाणी शिरले. अनेकांचे संसार वाहून गेले. उद्योगधंद्याचे, शेतीवाडीचे प्रचंड नुकसान झाले.

महापुराचे पाणी सांगलीत घुसल्यावर कित्येकांनी गावाबाहेर आसरा शोधला. जाताना आपले गुंज गुंज साठवून जमवलेलं सोनं कुठे ठेवायचा प्रश्न आला तेव्हा त्यांच्या समोर एकच नाव होतं,

“मे. पु. ना. गाडगीळ”

गाडगीळ सराफांच्याकडे लोकांनी आपल्याकडील सोने नाणे आणून दिले. तेंव्हा बाळनानांनी त्यांना, आपापल्या पिशवीला, आपापल्या नावाची चिठ्ठी लावून ठेवण्यास सांगितले. पुढे पुर ओसरल्यावर लोकांनी आपापले जिन्नस परत नेले व कुणाचा एक तुकडाही गमावला नाही.

या बाळनानांना ३ सुपुत्र व २ कन्या होत्या. जेष्ठ पुत्र पुरुषोत्तम, मधले गणेशपंत व सर्वात लहान वासुदेव तथा बापुकाका. १८८० ते १९२० या कालावधीत तिसऱ्या पिढीतील या तिघा बंधुंनी सराफी व्यवसाय नावलौकिकास आणला.

पुरुषोत्तम गाडगीळ यांच्या काळात फक्त गाडगीळ सराफांचा नाही तर अख्ख्या सांगलीच्या पेढीचा उत्कर्ष झाला. ते उपजतच रत्नपारखी होते. त्यांना गिऱ्हाईकाचीही चांगलीच पारख होती. त्यांचे कर्तृत्व थोर व दानतही मोठी होती.

पु.ना.गाडगीळ सराफी व्यवसायाबरोबर सावकारी देखील करायचे. त्यांचा हा व्यवहारदेखील अत्यंत सचोटीचा व प्रामाणिकपणाचा होता. तशी दुकानची ख्यातीच होती. आजोबांनी खरेदी केलेला जिन्नस दुर्दैवाने नातवास विकायची जरी वेळ आली तरी जुन्या पावतीवर विश्वासपुर्ण व्यवहाराची पुर्तता केली जाई.

त्यांनी १९१० साली, गाडगीळांच्या सराफी दुकानात पहिल तिजोरी आणली. हि तिजोरी मुंबईतील भायखळामधील गोदरेज यांच्या कारखान्यातील होती. सांगलीत या तिजोरीची सुद्धा अपूर्वाई झाली होती.

दि सांगली बँके असो किंवा सांगली सराफ असोसिएशन, या संस्थांच्या स्थापनाही  पु.ना.गाडगीळ यांच्याच नेतृत्वाखाली झाल्या.

त्यांचे कनिष्ठ बंधु गणेशपंत तथा दादा यांना सराफी व्यवसायाबरोबर शेतीचीही आवड होती. त्यांना सामाजिक कार्यातही विशेष रस होता. धाकटे बंधु वासुदेव तथा बापुकाका हे मुंबईबरोबर इतर पेठांचाही व्यवहार पहात असत. व्यापारी देवी घेवी मध्ये ते अत्यंत निष्णात होते. या तिघा बंधुंनी, सांगलीबरोबरच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जावून प्रदर्शनात सहभाग घेतला.

१९२० च्या दशकात विदर्भातील अमरावती येथे दागिन्यांचे मोठे प्रदर्शन भरले होते. त्यामध्येही गाडगीळांनी ठेवलेल्या दागिन्यांना विशेष मागणी होती. या प्रदर्शनात दागिन्यांची भरपूर विक्री झालीच शिवाय नावही गाजले. सांगली कोल्हापूर भागात साडे तीन मुहूर्तावर गाडगीळ सराफांच्या पेढीवर जाऊन मुहूर्ताने अगदी गुंजभर का असेना सोने खरेदी करायची प्रथाच पडली.

त्या काळात, एका चैत्री पाडव्यास, दुकानात रु.२०००० चा धंदा झाल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे त्यावेळी सोन्याचा दर २० रुपये तोळा एवढा असेल.

म्हणूनच त्यांना स्वतःच्या मालाची जाहिरात कधी करावी लागली नाही. ती गिऱ्हाईकाकरवी परस्परच होत असे.

सन १९३२ च्या सुमारास मे. पु. ना. गाडगीळ, सांगली या पेढीने शताब्दी साजरी केली.

याच काळात गाडगीळ घराण्याची ४थी-५ वी पिढीदेखील या व्यवसायात आली. गाडगीळांचे नातू शंकरराव, अनंत, सदाशिव, रामचंद्र, लक्ष्मण, विश्वनाथ, हरिभाऊ अशी एकूण ७ भावंडे बापूकाकांच्या हाताखाली आली.

यातील अनंत म्हणजेच दाजी काका गाडगीळ यांनी १९५८ साली पुण्यात मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ आणि कंपनी’ या नावाने दुकान थाटले.

सांगलीहून आणलेले कुशल कारागीर आणि दाजीकाका व त्यांच्या पत्‍नी कमलाताई यांच्या आपुलकीमुळे पुणेकरांनी दाजीकाकांना आपलेसे केले. संपूर्ण कुटुंबाला व्यवसायात जोडून घेण्याचा धडा देत दाजीकाकांनी सोन्या-चांदीप्रमाणे हिरे-माणके आणि कालानुरूप ज्वेलरीच्या व्यवसायाचे कौशल्यही आत्मसात करून घेतले. हिरे व रत्‍नांचा स्वतंत्र विभागही सुरू केला.

सांगलीत जे विश्वासाचं नाव पु.ना. गाडगीळांनी कमावल होत ते दाजीकाकानी व पुढच्या पिढ्यांनी पुण्यात देखील राखलं, इतकच नाही तर वाढवल. 

‘ ब्रॅंड ॲम्बॅसिडर ‘ नियुक्त करण्याची दाजीकाकांची कल्पना सराफी व्यवसायात चमकून गेली.

बारकोड सिस्टिम, कॉम्प्युटराइज्ड रेकॉर्ड अशा आधुनिक माध्यमातून दाजीकाकांनी व्यवसायातील कालानुरूप व्यवस्थांशी लीलया जुळवून घेतले. गाडगीळांची आता सहावी पिढी या व्यवसायात आहे. पीएनजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पु.ना.गाडगीळ ॲन्ड सन्स या दुकानाच्च्या आज पुण्यात अनेक शाखा आहेत.

दाजीकाकांनी आपल्या व्यवसाय बंधूंना यशस्वीरीत्या एकत्र आणले. सराफ असोसिएशनचे ते १९८७ साली अध्यक्ष झाले.

सराफांतील मतभेद दूर करून सभासदसंख्या वाढविण्याबरोबरच जिल्ह्यांच्या ठिकाणी सभा घेऊन त्यांनी सराफांना एकजुटीचे महत्त्व पटवून दिले. ‘सुवर्णपत्र’ या नावाने त्यांनी संघटनेचे मुखपत्रही सुरू केले. बदलणारे कायदे- करप्रणालीविषयी सराफांना माहिती करून दिली. व्यवसायात महिलांना नोकरी देऊन त्यांना ‘कस्टमर रिलेशन्स’ चे प्रशिक्षणही दिले.

अंबाजोगाईत भक्तनिवासाची उभारणी, लातूर भूकंपग्रस्तांच्या आयुष्याची फेरउभारणी, बुद्धिबळाच्या प्रसारासाठी संस्था आदींच्या माध्यमांतून कला-क्रीडा-संस्कृतीसह सामाजिक आघाडीवरील अनेक सेवाभावी संस्थांना ते अखेरपर्यंत मदत करीत होते.

आज जवळपास १८८ वर्षे झाली पुरुषोत्तम गाडगीळ यांचे अनेक वारसदार आपल्या पूर्वजांनी जपलेली  सुवर्ण विश्वासाची परंपरा जपताना दिसत आहेत. मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय ज्वेलर्स ब्रांडला गाडगीळांनी फाईट दिली आणि त्यांच्या पुढे पाय रोवून उभे देखील राहिले.

आज सलमान खान, माधुरी दिक्षित सारखे मोठे सेलिब्रिटी गाडगीळांच्या दागिन्यांची जाहिरात करतात तेव्हा मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून येतो.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.