म्हणूनच मुलगी बघायला गेल्यानंतर पोहे खाण्याची प्रथा आहे…

आज पासन डी मार्टमध्ये पोह्याचा रेट वाढणार आहे. का काय विचारताय?काल तुळशी विवाह नाही का झाला? लग्नाळू भिडू पोरी बघायला बाहेर पडणार. शनिवार रविवार कांदा पोह्याचा फडशा पडणार.

म्हणून म्हटल आपण पण पोह्याचा इतिहास सांगू. म्हणजे कस उद्या पाहुण्यांच्यात गेल्यावर आपलं जनरल नॉलेज सांगून तुम्हाला पण इम्प्रेस करता येईल. (पण ही माहिती सांगून लग्न ठरेल या भ्रमात राहू नका)

कांदे पोहे. अख्ख्या महाराष्ट्राचा सार्वजनिक नाश्ता.

अहो महाराष्ट्र काय गुजरात मध्यप्रदेश मध्ये सुद्धा सकाळी सकाळी आई पोरांना कांदे, मिरची, कोथिंबीर चिरायला लावून पोहे फोडणीला टाकते. बनायला मॅगी पेक्षा फक्त दोन मिनिट जास्त वेळ घेणारा पदार्थ. पण खिसलेले खोबर, चिरलेल्या कोथिंबीरीने सजून गरमागरम पोहे आपल्या समोर आला की भलेभले आउट होतात.

तर काही जाणकार म्हणतात की पोह्याचा शोध महाराष्ट्रातच लागला. तस म्हटल तर गुजरात आणि मध्यप्रदेशवाले पण दावा करतात. तज्ञांना विचारलं तर ते म्हणतात की पोहे हा पदार्थ तांदळापासून बनतो. मग तांदूळ पिकते अशा ठिकाणीच त्याचा शोध लागला असेल नां !

म्हणून महाराष्ट्रातच पोह्याचा शोध लागला असेल ही शक्यता आहे.

पण पोह्याचा शोध लागला कधी?

याच उत्तर आहे लई वर्षांपूर्वी शोध लागला. अगदी महाभारतात जाऊन बघितल तरी पोह्याचा उल्लेख आढळतो. कृष्णाला भेटायला गेलेल्या सुदाम्याला त्याच्या बायकोने पुरचुंडीत पोहेच बांधून दिलेले आणि मुरलीधर कृष्णाने ते अगदी आवडीने खाल्ले देखील होते. महाभारतात उल्लेख आहे म्हणजे त्याच्या आधी देखील हा पोहे बनवले जात होते हे नक्की. फक्त तेव्हा त्यात कांदा मिरची घालत नव्हते.

महाभारतातच नाही तर पुराणातल्या बऱ्याच कथांमध्ये पोहे खाल्ल्याचा उल्लेख येऊन जातो. 

म्हणजे काय भारताचा पुरातन नाश्ता पोहे हाच आहे. फक्त इथे पोहे बनवायची पद्धत ठिकठिकाणी वेगवेगळी आहे. कोणी त्यात बटाटा घालत तर कोणी साखरेऐवजी गुळ घालत.

पुण्याच्या पेठांमध्ये एमपीएससी करणाऱ्या पोरांना मात्र आजही पुराणातल्या काळाप्रमाणे कांदा, मिरची नसलेले फक्त हळद वाले पोहे खाण्याच भाग्य मिळत. तरी त्यातील काही संस्कृतीला विसरणारे विद्यार्थी महाभारतकालीन पोहे खाताना त्यावर तर्री मागुन घेतात. हेच पोहे खाऊन महाराष्ट्रातले अधिकारी तयार झालेत हा इतिहास आहे.

फक्त भारतच नाही तर कंबोडिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स व्हिएतनाम या देशांमध्ये देखील पोह्यासारखा पदार्थ बनवला जातो. तिकडे आणखी वेगळ्या स्वरुपात पोहे खातात. त्याच नावही वेगळ आहे. पण आहे ते पोहेच. तिकडेही लोक रामाचे, बुद्धाचे भक्त आहेत. भारतीयांचे जीन्स त्यांच्यात आहेत म्हटल्यावर ते पण पोह्याचे फॅन्स असणे सहाजिक आहे म्हणा.

इंडोनेशिया सोडा अगदी ब्रिटीशसुद्धा पोह्याचे फॅन्स होते.

ते जेव्हा पहिल्यांदा भारतात आले तेव्हा त्यांच्या सैनिकांना भारतातल्या वातावरणात टिकण्यासाठी त्यांना पोटाला झेपेल असा पदार्थ म्हणून त्यांनी पोह्याची निवड केली होती. पोहे टिकायचेही जास्त दिवस. म्हणूनच जेव्हा भारतातून त्यांचं जहाज इंग्लंडला परत जायचं तेव्हा प्रत्येक सैनिकाला सुदाम्याप्रमाणे पोहे पॅक करून दिले जायचे, प्रवासात खाण्यासाठी.

अठराव्या शतकात तर एकदा एका युद्धासाठी सायप्रसमध्ये गेलेल्या इंग्लिश सैनिकांनी आम्हाला पोहे पाहिजेत म्हणून आंदोलन केलेल.

अनेकजण दावा करतात की अमेरिकेत केलॉग बंधूनी भारतातल्या तांदळापासून पोहे बनवण्याच्या प्रोसेसचा अभ्यास करून आपले कोर्नफ्लेक्स बनवले. खर खोट काय माहित नाही पण भारतात पोह्याचा जर कोणी ब्रांड करून विकला असता तर आज चार मॅकडोनाल्ड खिशात घेऊन हिंडला असता.

महाराष्ट्रात नाही पण मध्यप्रदेशच्या इंदोरी पोह्यांनी मात्र स्वतःचा ब्रँड निर्माण केलाय. तिथले जिलेबी पोहे हळूहळू अख्ख्या भारतात फेमस होत चालले आहेत. तस बघायला गेल तर आपल्या होळकरांच्या बरोबरच पोहे इंदूरला गेले असतील. पण पोह्याची जन्मदात्या मराठी मातीतील पोहे अजून हवं त्या प्रमाणात आपली हवा निर्माण करू शकले नाहीत.

बिचाऱ्या पोह्याच नाव जोडलं गेल ते लग्नाच्या बोलणीसाठीच. 

आता तुमच्या पैकी काही भिडू प्रश्न विचारतील की पोरगी बघायच्या कार्यक्रमात पोहेच का बनवतात?

तर आम्हाला याचा अनुभव नाही. तरी एक अंदाज म्हणून सांगतो की पोहे बनवायला सोपे असतात, खूप झंझट कराव लागत नाही, गंडण्याची शक्यता कमी असते. आणि जावई झाल्यावर लाड करायचेच असतात आधी कशाला त्याच्यावर भरपूर खर्च करा.

आणि पोहे केले की ते आमच्या पोरीने केलेत ही थाप खपून सुद्धा जाते, बाकी अवघड पदार्थाला ही थाप खपत नाही. आणि ही पोहे करण्याची प्रथा कधीपासून आली तर त्याच उत्तर आहे पोह्यांच्या इतिहासापासूनच. पोहे हाच मुख्य नाश्ट्याचा प्रकार असल्याने पोह्यास पसंती देण्यात आली इतकच.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.