देशात फक्त ६ जणांना ठाऊक होतं, इंदिरा गांधी अणुचाचणी करणार आहेत..

आजपासून बरोबर ४७ वर्षांपूर्वी  १८ मे १९७४ रोजी राजस्थानातील पोखरण मधल्या अणुशास्त्रज्ञांनी पहिली अणुचाचणी यशस्वी करून भारताची अणवस्त्रक्षमता सिद्ध केली. भारतीय अणुशास्त्रज्ञांच्या आणि तंत्रज्ञांच्या दिर्घकालीन मेहनतीच हे यश होतं. भारताच्या अणुस्फोट चाचणीमुळे जगाला आश्चर्याचा धक्का बसला आणि भारताला टीकेलाही सामोरं जावं लागलं.

पण भारताने ‘शांतता व स्वयंपूर्णतेसाठी अणुऊर्जेचा उपयोग याबाबतच आपलं धोरण जाहीर करून आंतरराष्ट्रीय समुदायाच्या टीकेची धार कमी केली.

या काळात भारतात सामाजिक आणि राजकीय आंदोलनामुळे तापलेल्या वातावरणाला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या अणुचाचणीच्या धाडसी निर्णयामुळे एकदम कलाटणी मिळाली. 1971 च्या बांग्लादेश मुक्तीयद्धातील विजयामुळे इंदिरा गांधी यांची कणखर आणि गंभीर जी प्रतिमा तयार झाली होती, ती या निर्णयामुळे अधिक उंचावली.

अणुचाचणीची आवश्यकता

1962 ते 1972 या दहा वर्षांच्या काळात भारताला चीन आणि पाकिस्तान या शेजारच्या देशांच्या आक्रमणाचा सामना करावा लागला होता. त्यापैकी 1962 च्या चीनच्या आक्रमणात भारताला हार पत्करावी लागली होती. 1964 मध्ये चीन अण्वस्त्रसज्जतेच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती. अशा परिस्थितीत स्वसंरक्षणाच्या दृष्टीने भारताला अण्वस्त्रसज्ज होण्याची आवश्यकता निर्माण झाली होती.

भारतात डॉ. होमी भाभा यांच्या पुढाकारातून 1945 साली ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ या संस्थेची स्थापना होऊन अणुऊर्जेच्या संबंधी संशोधनास सुरूवात झाली होती.

जवाहरलाल नेहरू यांच्या काळात भारताने आण्विक नि : शस्त्रीकरणाच्या भूमिकेचा सातत्याने पुरस्कार केलेला असला, तरीही देशाच्या विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संशोधनाला प्राधान्य देताना त्यामध्ये आण्विक संशोधनाचाही सामावेश करण्यात आला होता. त्यानूसार 1948 मध्ये भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली होती.

4 ऑगस्ट 1956 रोजी मुंबई जवळच्या तुर्भे इथली भारताची पहिली अणुभट्टी कार्यान्वित झाली. यानंतर पुढच्या पाच वर्षातच भारताच्या आणखी दोन अणुभट्ट्या कार्यान्वित झाल्या होत्या.

अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. होमी सेठना आणि भाभा आण्विक संशोधन केंद्राचे संचालक डॉ. राजा रामण्णा यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या अणुशास्त्रज्ञांनी आणि तंत्रज्ञांनी आण्विक संशोधनात भरीव प्रगती केली होती. डॉ. रामण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचा पहिला अणुबॉम्ब विकसित झाला होता. त्यामुळे आण्विक चाचणीसाठी शास्त्रज्ञ उत्सूक होते.

‘पोखरण’ ची निवड

या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अणुस्फोट चाचणीचा निर्णय घेतला. या निर्णयाविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. स्वत: इंदिरा गांधी, त्यांचे सचिव पी. एन. हक्सर, आणि पी. एन. धर , संरक्षण मंत्रालयाचे विज्ञान विषयक सल्लागार डॉ. नाग चौधरी, डॉ. होमी सेठना आणि डॉ. राजा रामण्णा या सहा जणांनाच याची माहिती होती.

ही चाचणी भूर्गभात करण्याच निश्चित झाल्यानंतर राजस्थानमधल्या वाळवंटी प्रदेशातील भारतीय लष्कराच्या शस्त्रास्त्रचाचण्यांच केंद्र असलेल्या पोखरण या स्थानाची निवड करण्यात आली. याचं कारण म्हणजे इथं दूरपर्यंत मानवी वस्ती नव्हती. शिवाय वाळवंटी प्रदेश असल्याने भूर्गभात पाणीसाठा असण्याची शक्यता शास्त्रज्ञांना वाटतं नव्हती.

मात्र, या परिसरात जेव्हा खड्डा खणला, तेव्हा तिथं पाणी लागलं. अणुस्फोटातून होणाऱ्या किरणोत्सर्गामुळे जलस्त्रोत बाधित होण्याचा आणि पर्यायाने मानव हानी होण्याचा धोका असतो. त्यामुळे पोखरण परिसरात जिथे भूर्गभात पाणी नाही अशा ठिकाणचा शोध घेण्यात सुरू झाला.

शास्त्रज्ञांनी आसपासच्या गावांमधील ग्रामस्थांकडे या परिसरात कोरड्या पडलेल्या विहीरींविषयी चौकशी केल्यानंतर एका वृद्ध ग्रामस्थाने त्यांना तशी एक कोरडी विहीर दाखवली. अशा प्रकारे पोखरणच्या अणुचाचणीचं स्थान निश्चित करण्यात एका अडाणी ग्रामस्थाची मदत झाली.

अणुबॉम्बचा अंत: स्फोट

अणूचाचणीसाठी सुमारे 100 फूट खोल व तीन ते सहा फूट व्यासाचं इंग्रजी एल (L) सारख्या आकाराचं विवर खणण्यात आलं. या विवराच्या तळाशी अणुबॉम्ब ठेवण्यात आला. हा बॉम्ब इम्प्लोजन म्हणजे अंत: स्फोट या प्रकारचा होता. या प्रकारच्या अणुबॉम्ब मध्ये युरेनियम आणि प्लूटेनियम या द्रव्यांचा वापर केला जातो. या चाचणीसाठी बनविलेल्या अणुबॉम्ब मध्ये सुमारे 20 किलोग्रॅम युरेनियमचा वापर केला गेला.

या बॉम्बची क्षमता साधारणपणे दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमा शहरावर टाकलेल्या अणुबॉम्ब इतकीइतकी, म्हणजे सुमारे 15 ते 20 किलोटन टी. एन. टी. स्फोटकाच्या समान होती.

अशा बॉम्बमधील अंत: स्फोटाची प्रक्रिया गुतांगुतीची असते. अणुस्फोट यशस्वी होण्यासाठी सर्व ट्रीगर्स एकाच वेळी कार्यान्वित होणं आवश्यक असतं. म्हणूनच अणुबॉम्बच्या ट्रीगर्सची रचना ज्यांनी केली, त्या डॉ. दस्तगीर यांच्याकडेच ट्रीगर्सची बटणं दाबण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

18 मार्च 1974 रोजी सकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी डॉ. दस्तगीर यांनी ट्रीगर्सची बटणं दाबल्या नंतर केवळ सहा सेकंदातच अणुबॉम्बचा प्रचंड स्फोट घडला.

या स्फोटाने जमीन उसळून वर आली. स्फोटाच्या ठिकाणी मोठं विवर तयार होऊन त्याच्या मध्यभागी वाळूची छोटी टेकडी तयार झाली. या स्फोटाच नियंत्रण सुमारे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या नियंत्रण कक्षातून शास्त्रज्ञांनी केलं.

स्फोटानंतर होणाऱ्या भूकंपाचे प्रमाण, निर्माण झालेली उष्णता, दाब, किरणोत्सर्जन इत्यादी गोष्टींची नोंद करण्यासाठी अणुबॉम्बबरोबर सुमारे 10 केबल्स खड्ड्यांमध्ये सोडण्यात आल्या. अणुस्फोटानंतर वातावरणातील किरणोत्सर्जनाच्या प्रमाणाची पाहणी हेलीकॉप्टर मधून करण्यात आली. हवेमध्ये किरणोत्सर्जन आढळलं नाही. त्याचप्रमाणे स्फोटातून 200 मीटर अंतरावर शास्त्रज्ञांनी तपासणी केली असता, तिथंही किरणोत्सर्जन आढळलं नाही.

एकूणच ही पहिली अणुचाचणी अचूकपणे पार पडली. त्यातून भारतीय शास्त्रज्ञांची स्वयंसिद्धता स्पष्ट झाली. इंदिरा गांधी यांनी शास्त्रज्ञांच अभिनंदन करून भारताच्या यशस्वी अणुचाचणीची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी संरक्षण मंत्री के. सी. पंत आणि शास्त्रज्ञांबरोबर पोखरणचा दौरा करून स्फोटाच्या ठिकाणाची पाहणी केली.

परदेशात कौतूक, तर देशातून पाठिंबा

या चाचणीची बातमी कळाल्यानंतर जगभरातून भारताच्या या धाडसी पावलाबद्दल प्रतिक्रिया उमटल्या. अमेरिका आणि इतर बड्या देशांनी भारतावर निर्बंध लादले. मात्र, भारताने अणवस्त्रक्षमता संपादन केली असली तरी भारत अणुऊर्जेचा उपयोग शांततामय मार्गाने प्रगतीसाठी करणार असल्याची ग्वाही इंदिरा गांधी यांनी जगाला दिली.

यी पहिल्या अणुचाचणीच्या काळात प्रचंड राजकीय आणि सामाजिक अस्थिरता निर्माण झाली होती.

‘गरिबी हटाव’ या लोकप्रिय घोषणेवर आरूढ होऊन 1971 मधील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भरघोस यश मिळवून इंदिरा गांधी पून्हा सत्तेवर आल्या. इंदिरा गांधी यांची घटलेली लोकप्रियता अणुचाचणीमुळे पुन्हा उंचावली. इंदिरा गांधींनी गरीबी सारख्या गंभीर समस्येकडून जनतेचं लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी अणुचाचणी सारखा डावपेच खेळला, अशी टीकाही तेव्हा झाली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.