कोल्हापूर घराण्याच्या या उपकारांची जाणीव ठेवून संभाजीराजेंचा पोलंडने सन्मान केला..

काल छत्रपती संभाजीराजे यांचा पोलंड देशाकडून बेने मेरितो पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. पोलंडच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे हा पुरस्कार प्रदान सोहळा दिल्लीत आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात पोलंडचे परराष्ट्र मंत्री झ्बिग्नीव राऊ यांच्या हस्ते संभाजी महाराजांचा पुरस्कार देवून सत्कार झाला…
पण या सन्मानाचं कारण इतिहासात लपलं आहे.
ही गोष्ट सुरू होती ती दुसऱ्या महायुद्धाच्या काळात.
१९४१ च्या दरम्यान हिटलरने तत्कालीन USSR अर्थात रशियावर हल्ला केला. या हल्ल्याच्या पूर्वी USSR ने पोलंडमधील नागरिकांना शरणार्थी म्हणून जागा दिली होती. मात्र हिटलरच्या हल्ल्यानंतर USSR ने पोलिश नागरिकांना बळजबरीने आपल्या सैन्यात सहभागी करून घेण्यास सुरवात केली. अशा वेळी काही पोलीश नागरिक USSR मध्ये गेले.
मात्र उरलेल्या अनेकांनी शरणार्थी म्हणून वेगवेगळ्या देशात जाण्याचा निर्णय घेतला.
यावेळी निर्वासित असणाऱ्या पोलीस सरकारच्या पंतप्रधानांनी ब्रिटीश पंतप्रधान विस्टन चर्चिल यांना पत्र लिहलं. पोलीश पंतप्रधानांनी अशीच पत्र जगभरातल्या विविध देशात असणाऱ्या आपल्या दूतावासांकडे देखील सोपवली. त्यातलच एक पत्र मुंबईच्या पोलीश दुतावासात आलं.
या पत्रात किमान आपल्या येणाऱ्या पिढ्यांना तरी वाचवा म्हणून साद घालण्यात आली.
पण भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लिनलिथगो यांनी मात्र या पत्राला केराची टोपली दाखवली. त्यांच म्हणणं होतं की महायुद्धामुळे आर्थिक संकट निर्माण झालं आहे. अशा वेळी शरणार्थी संभाळण्यास आर्थिकदृष्ट्या शक्य नाही.
दूसरीकडे नवानगरचे राजे दिग्विजयसिंह हे युद्ध मंत्रीमंडळाचे सदस्य होते. हे मंत्रीमंडळच दुसऱ्या महायुद्धात संस्थानांनी ब्रिटीश सरकारला मदत करण्यासाठी उभारण्यात आले होते. त्यांना आपल्या एका पोलीश मित्राकडून पोलीश मुलांच्या संदर्भात असणारा हा प्रश्न समजला. त्यास व्हाईसरॉय यांचा विरोध असल्याची बातमी देखील समजली.
पण व्हाईसरॉय यांच्या विरोधात जावून पोलीश मुलांना भारतात आणण्यासाठी त्यांनी योजना आखण्यास सुरवात केली.
विरोधाचं कारण फक्त आणि फक्त आर्थिक होतं.
दिग्विजय सिंह यांनी हा प्रश्न सोडवायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी बडोदा आणि पटियाला संस्थानासोबत संपर्क केला. आपल्या माहितीतल्या व्यापाऱ्यांसोबत संपर्क केला आणि मोठी आर्थिक मदत या योजनेला मिळवून घेतली. आर्थिक प्रश्न मिटल्याने व्हाईसरॉय यांचा असणारा विरोध देखील मावळला होता.
फेब्रुवारी १९४२ साली एक हजार पोलीश मुलं भारतीय भूमीवर उतरली. या मुलांच भविष्य देखील नव्हतं. ईराण, क्वेटा करत ही मुले दिल्लीत आली व दिल्लीतून या मुलांना मुंबईत आणण्यात आलं. इथं या मुलांना तीन महिने ठेवण्यात आलं.
पुढे या मुलांना जामनगर व कोल्हापूर येथे पाठवण्यात आलं आणि त्याकामी कोल्हापूर संस्थानने पुढाकार घेतला
कोल्हापूरच्या वळीवडे गावात हळुहळु ५ हजार पोलीस लोकांची वसाहत उभारण्यात आली. पाण्यासाठी हौद बांधण्यात आला होता. एक छोटे हॉस्पिटल आणि एक शाळा सुद्धा उभारण्यात आली होती.
पूर्ण कॅम्पच्या सभोवताली कुंपण उभारण्यात आले होते. त्याच्या रखवालीसाठी शस्त्रधारी सैनिक चोवीस तास तैनात असायचे. प्रत्येक कुटूंबाला दोन खोलींची बराक राहण्यासाठी देण्यात आली होती. सर्व पोलीश लोकं कधीतरी युद्ध थांबेल व आपण मायदेशात जावू अस वाटतं असे. पण पोलीश लोकांनी कॅम्पवर असताना काम करणं सोडलं नव्हतं कोणी नर्सचं काम करत असे तर कोणी कपडे शिवून देत असे.
हळुहळु कॅम्पमधील लोकांची आणि कोल्हापूरच्या स्थानिक लोकांचे व्यवहार हावू लागले. दुधवाले, किराणावाले यांचा पोलीश लोकांसोबत संपर्क वाढला आणि ते महाराष्ट्राच्या संस्कृतीत मिसळून गेले.
टेड आणि सॅमच्या आईने मारियाने त्यांना एक खूप हृद्यस्पर्शी आठवण सांगितली होती.
सॅमचा जन्म नुकताच झाला होता. आणि कॅम्प मध्ये एक ओली बाळंतीण साफसफाईच्या कामाला आली होती. ती जवळपासच्याच कुठल्यातरी खेड्यातली असेल. त्या आईचे दुध आटले होते. आणि तीच बाळ दुधाविना रडत होते. हे बघून मारियामधल्या आईचा पान्हा फुटला. तिने त्याबाळाला आपल्या छातीशी धरून त्याला दुध पाजले.
कोल्हापूरच्या मातीने केलेल्या उपकाराची परतफेड त्या माउलीने आपलं दुध पाजून केली. आठवड्यातून एकदा कोल्हापूर शहरातून पद्मा स्काउट पथकातील मुलं खास या कॅम्प मधल्या मुलांशी फुटबॉल खेळण्यासाठी जायची. पिटूरा बंधूना कोल्हापूरच्या महावीर उद्यानातल्या पोलिश स्मारकाजवळ या पद्मा स्काउट मधले बापू शिंदे आणि ज्ञानदेव जाधव हे जुने सवंगडी खास भेटीसाठी आले होते.
नव्वदीच्या घरात पोहचलेली ही सगळी मंडळी मात्र जुन्या उत्साहाने एकमेकांना भेटली.साऱ्यांनी मिळून पोलिश गीत गायली. सुखादुखाच्या गोष्टी शेअर केल्या.
कॅम्प मधली पोलिश वांडा कोल्हापूरच्या तरुणाच्या प्रेमात पडून वांडा काशीकर झाली.
नऊवारी नेसून गंगावेस जवळच्या आपल्या अत्तराच्या दुकानात मालकीणबाईच्या थाटात कोल्हापुरी मराठी बोलत लक्ष ठेऊन बसायची. काही वर्षापूर्वी तिचं निधन झालं.
१९४७ ला भारत स्वतंत्र झाल्यावर आणि दुसरे महायुद्ध संपल्यावर हे पोलंडवासी आपल्या देशी परत गेले. त्याच कॅम्प मध्ये भारत सरकारने पाकिस्तानातून फाळणी नंतर भारतात आलेल्या सिंधी लोकांची राहण्याची सोय केली.
निर्वासितांना आश्रय देण्याची कोल्हापूरची परंपरा चालूच राहिली. आज या कॅम्पच्या जागी गांधीनगर म्हणून मोठे कपड्यांचे सिंधी मार्केट उभे आहे. तरीही कॅम्प चे छोटे अवशेष पहावयास मिळतात.
तरीही या सगळ्या दुव्यांना जोडून ठेवणारा हात म्हणजे कोल्हापूरचे कर्नल विजयसिंह गायकवाड. इंडोपोलिश असोसीएशनचे ते अध्यक्ष आहेत. पोलंड मधून आपल्या आश्रयभूमीकडे येणाऱ्या प्रत्येक पोलिश व्यक्तीचा ते पाहुणचार करतात.
याच उपकारांची जाणीव ठेवत कोल्हापूरच्या पुरावेळी पोलीश नागरिकांनी मदत केली होती. दूसरीकडे २०१९ साली या घटनेस ७० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेऊन या कॅम्प मध्ये राहिलेल्यापैकी हयात असणाऱ्या नागरिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना राज्य अतिथी म्हणून याठिकाणी निमंत्रित करून वळीवडे पोलंड कॅम्पच्या स्मृती जगविण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते
हे ही वाच भिडू.
- पाकिस्तानमधील हिंगलाज भवानी कोल्हापूरच्या गडहिंग्लजला कशी आली?
- कोल्हापूरचा दूध कट्टा म्हणजे काय रं भावा !!!
- आणि जगज्जेता गामा पहिलवान कोल्हापूरात हरला !
- अस काय झालं की, आचार्य अत्र्यांनी कोल्हापूरच्या म्हादबा मिस्त्रीं वर अग्रलेख लिहला.