इम्रान हाश्मी नाही तर ‘हा’ आहे खराखुरा ‘सीरिअल किसर’ !
जगाच्या पाठीवर जर ‘सुपरमॅन’ ‘स्पायडरमॅन’ ‘हल्क’ असले ‘सुपर पॉवर’ असणारे कार्यकर्ते असतील तर आपल्याकडे ही अशा ‘नररत्नां’ची काही कमी नाही. जगाच्या पाठीवर कुठेही घडणार नाहीत अशा अनेक अजब आणि गजब गोष्टी आपल्या देशात सर्रास होत असतात. आपल्याकडे ‘सुपर पॉवर’ असल्याचा दावा करत लोकांना मूर्ख बनवणारे अनेक कार्यकर्ते आपल्याकडे बघायला मिळतात.
तर भिडू बातमी अशी आहे की परवा अशाच एका ‘सुपर पॉवर’ असणाऱ्या बाबाला पोलिसांनी पकडलय. या कार्यकर्त्याचं नाव ‘किसिंग बाबा’ किंवा ‘चुंबन बाबा. एका गोष्टीची इथे आधीच नोंद घ्या की हा ‘चुंबन बाबा’ म्हणजे कुणी चित्रपटाला ‘इम्रान हाश्मी’ नाही तर हा आहे खरोखरचा ‘किसिंग बाबा’
आसाममधल्या मोरीगांव जिल्ह्यातल्या ‘भोरात्लूप’ गावात हा बाबा पोलिसांना सापडला. तसं तर हा भाग गेली शेकडो वर्षे काळ्या जादू साठी प्रसिद्ध आहे. या गावात असे जादूटोणा करणारे अनेक बाबा राहतात. मात्र हा चुंबन बाबा पहिलाच.
या बाबाचं खरं नांव रामप्रकाश चौहान. काही महिण्यापुर्वी म्हणे याच्या स्वप्नात भगवान विष्णू आले आणि त्यांनी त्याला दैवी शक्ती दिली. दैवी शक्ती कसली तर त्याच्या चुंबनाने आणि आलिंगनाने स्त्रियांचे शारीरिक आणि मानसिक रोग दूर करण्याची.
हो तुम्ही बरोबर वाचलंत!
फक्त स्त्रियांचेच रोग बरं करण्याची ही ‘सुपर पॉवर’ या बाबाला मिळाली असल्याचा दावा त्याने केला. फक्त रोगच नाही तर हा बाबा कौटुंबिक वाद सुद्धा ‘कीस’ करून सोडवायचा म्हणे. साधारणतः तीन महिन्यापूर्वी या बाबाने स्वतःच्याच घरात स्वतःचेच मन्दिर बनवले होते.
विशेष म्हणजे त्याच्या या दैवी शक्ती बद्दलची अफवा पसरवण्यात त्याच्या आईचाच सहभाग होता. त्याची आईच आपल्या मुलाच्या या ‘दैवी शक्ती’ बद्दल जगाला ओरडून सांगायची. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा देवभोळ्या भक्तांनी या अफवेवर विश्वास ठेऊन त्याच्या घराबाहेर रांगा लावायला सुरुवात केली.
या बाबाने कितीतरी महिलांना रोग बरे करण्यासाठी आणि कौटुंबिक कलह सोडविण्यासाठी त्याच्या चुंबनाचा ‘कृपा प्रसाद’ दिला. एका लोकल टीव्ही पत्रकाराने त्याची मुलाखत घेऊन या बाबाची ही अजब उपचार पद्धती सुद्धा जगासमोर आणली. त्या मुलाखतीमध्ये सुद्धा हा बाबा आपल्या ‘चुंबनाचे महात्म्य’ आणि त्या मागचे ‘विज्ञान’ सांगताना दिसतो.
या मुलाखतीनंतर जेव्हा ही बातमी पोलिसांपर्यंत पोहोचली त्यावेळी त्यांनी या ढोंगी बाबाला आणि या कृत्यातील त्याची साथीदार असणाऱ्या त्याच्या आईला त्याच्या राहत्या घरातून उचललं. आता या ढोंगी बाबाला महिलांचं शोषण केल्याबद्दल व्हायची ती कठोर शिक्षा कायदेशीर तरतुदीनुसार होईलच. पण या निमित्ताने देव आणि धर्माच्या नावावर लोकांना मूर्ख बनवणं किती सोप्पं आहे, हे पुन्हा एकवार सिद्ध झालंय.
- तुमच्या भागात प्रेयसीला काय म्हणतात ?
- भारतातील सर्वात रागीट माणूस -परमजीत सिंह पम्मा.
- धनाड्य पण कंजूष.