टूलकिट प्रकरणात दिशा रवी विरोधात सुरू असलेला तपास का बंद करण्यात येतोय?

जानेवारी महिन्यात देशात शेतकरी आंदोलन आणि हिंसेचा मुद्दा चांगलाच पेटला होता. यावेळी जगभरातले सेलिब्रेटी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी देशातल्या परिस्थितीबाबत भाष्य केलं होतं. पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गनं एक टूलकिट ट्विट केलं होतं. हे टूलकिट प्रकरण चांगलंच गाजलं आणि हे टूलकिट एडिट केल्याच्या आरोपातून पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवी हिला अटक करण्यात आली होती.

काय होतं टूलकिट प्रकरण?

शेतकरी आंदोलनावेळी जगभरातल्या अनेक सेलेब्रिटींनी भारतातल्या परिस्थितीबाबत ट्विट केलं होतं. जगप्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनं शेतकरी आंदोलनासंदर्भात एक टूलकिट ट्विट केलं. हे टूलकिट म्हणजे एक गुगल डॉक्युमेंट होतं. यात शेतकरी आंदोलनावेळी भारत सरकारचा निषेध कसा करायचा, सरकारला घेराव कसा घालायचा, अंबानी आणि अदानींच्या कार्यालयाबाहेर निषेध कसा करायचा, ट्विटरवर कसा प्रचार करायचा हे स्पष्ट केलं होतं. ग्रेटानं हे ट्विट लगेचच डिलीट करत सुधारित टूलकिट अपलोड केलं. या प्रकरणात पोलिसांनी टूलकिट बनवणाऱ्यांविरोधात एफआयआर नोंदवली.

दिशा रवीला अटक का झाली?

दिशा ही टूलकिटची संपादक आणि मुख्य सूत्रधार असल्याचा दावा पोलिसांनी केला. त्यांच्या दाव्यानुसार, शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली देशाची प्रतिमा मलीन करण्यासाठी हे टूलकिट तयार करण्यात आलं. दिशावर खलिस्तान समर्थक गट पोएटिक जस्टिस फाऊंडेशनसोबत काम केल्याचा आरोपही करण्यात आला. दिशानं याबाबत, ‘आपण टूलकिटच्या फक्त दोन ओळी एडिट केल्या आहेत.’ असं सांगितलं. पोलिसांनी दिशाला बंगळुरू इथून अटक केली, पण तिला १० दिवसांनी जामीन मिळाला.

तपास करणारे पोलिस काय म्हणतात?

पोलिसांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातले संशयित दिशा रवी आणि निकिता जेकब हे पोएटिक जस्टिस फाउंडेशनच्या धालीवालसोबत झूम कॉलवर असल्याचा संशय आहे. त्याबद्दल तपशील मिळवण्यासाठी आम्ही झूमला पत्र लिहिलं होतं. मात्र आम्हाला त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. कंपनी भारताची नसल्यानं आम्ही त्यांना नोटीसही पाठवू शकत नाही. झूम सोबतच आम्ही गुगललाही काही प्रश्न विचारले होते, मात्र आम्हाला उत्तर मिळू शकलं नाही.

दिशासोबत वकील निकिता जेकब आणि इंजिनीअर शंतनू यांनीही टूलकिट तयार आणि एडिट केल्याचा आरोप आहे. निकिता आणि शंतनू इंग्लंडमधल्या ‘एक्सटीन्क्शन रिबेलियन’ या संस्थेत काम करतात. पोलिसांनी त्यांच्या संस्थेशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला, पण तिकडूनही उत्तर मिळवण्यात अपयश आलं.

जवळपास साडेआठ महिने तपास करूनही काहीच निष्पन्न झालं नाही. तपासाला दिशा न मिळाल्यानं चार्जशीटही दाखल करण्यात आलेली नाही, त्यामुळं पोलिस या केसचा तपास बंद करण्याच्या विचारात आहेत.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.